Join us  

आलियाच्या जन्मानंतर मलाही करायचं होतं काम, पण नवरा.... मनातली सल सांगतेय आलिया भटची आई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2021 5:20 PM

प्रत्येक बाईच्या मनातली सल व्यक्त केली आहे अभिनेत्री आलिया भटची आई साेनी राजदान यांनी. त्यांनाही बाळ झाल्यानंतर काम करायचं होतं, पण......

ठळक मुद्देसोनी राजदान आता अभिनयातली त्यांची दुसरी इनिंग जबरदस्त पद्धतीने खेळत असून वेबसिरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्या सातत्याने कार्यमग्न आहेत. 

जेव्हा पहिलं मुल होतं तेव्हा प्रत्येक नव्या आईला या अवस्थेतून जावं लागतं. मग ती एखादी सर्वसामान्य घरातली गृहिणी असो किंवा मग बॉलीवूडची अभिनेत्री. असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर आयुष्य जेवढं बदलत नाही, तेवढं अमुलाग्र ते पहिलं मुल झाल्यावर बदलतं. हे वाक्य अगदी १०० टक्के खरं आहे, हे तेव्हाच पटतं, जेव्हा आपण एका अपत्याची आई होतो. बाळ होण्यापुर्वी अगदी स्वच्छंदीपणे वावरणारी ती मग अगदी लहान- लहान गोष्टीत अडकून पडते. बाळाच्या वेळा सांभाळण्यात  आणि त्याला काय हवं- नको ते पाहण्यातच आईचा सगळा वेळ जातो. मग करिअर काय किंवा अन्य गोष्टी काय, सगळंच मागे पडत जातं, असं खुद्द एकेकाळची नामवंत अभिनेत्री असणाऱ्या सोनी राजदान यांनी सांगितलं आहे. 

 

आज नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या निश्चितच वाढलेली आहे. पण त्यापैकी अशा अनेक महिला आहेत, ज्यांना अपत्य  झाल्यानंतर त्यांच्या कामातून काही काळासाठी निश्चितच ब्रेक घ्यावा लागतो. यानंतर ज्यांना कुटूंबाची भक्कम साथ मिळते, अशा काही जणी पुन्हा एकदा कामासाठी बाहेर पडून त्यांचे करिअर सुरु करतात. पण ज्यांना कुटूंबातून सहकार्य मिळत नाही किंवा अपत्याची जबाबदारी घेण्यासाठी जवळ दुसरा कोणताचा पर्याय नसतो, तेव्हा नाईलाजाने अशा महिलांना करिअरवर पाणी सोडावं लागतं.

 

अशीच काहीशी गत झाली होती आलिया भटच्या आई सोनी राजदान यांची. सोनी राजदान या एकेकाळच्या गाजलेल्या अभिनेत्री. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान नुकत्याच त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्या म्हणाल्या की मला जेव्हा आलिया झाली, तेव्हा तिच्या जन्मानंतर काही काळाने मी मला पुन्हा एकदा काम मिळावे म्हणून धडपड करायला, घराबाहेर पडायला सुरुवात केली. मी माझ्या एका मित्राला, जो एक निर्माता होता, त्याला भेटले आणि मला पुन्हा एकदा काम करायचं आहे, असं सुचवलं. पण त्यावेळी नवरा महेश भट हे काय म्हणतील किंवा या गोष्टीला कसा प्रतिसाद देतील हे मला माहिती नव्हतं. त्यामुळे आधी हातात काम मिळवायचं आणि मग त्यांना सांगायचं असं मला वाटत होतं. त्यामुळे त्या निर्मात्याला मी हे आधीच स्पष्ट केलं होतं की माझ्यासाठी काम शोध पण ही गोष्ट महेश भट यांना कळू देऊ नको.

 

यानंतर जेव्हा माझा तो मित्र मला काम करायचं आहे, असा प्रस्ताव घेऊन इतर ठिकाणी जायचा, तेव्हा सोनीला आता का काम करायचं आहे, ती तर लग्न होऊन दोन मुलींची आई झाली आहे, असे प्रश्न त्याला विचारले जायचे. अनेक ठिकाणाहून मला सातत्याने नकार येत गेला. काही काळ मी यामुळे खूप अस्वस्थ झाले होते. लग्न झालं, मुलं झाली म्हणजे आता माझं करिअर संपलं की काय, असंच मला वाटू लागलं होतं. पण ही सगळी निराशा पचवून मी पुन्हा उभी राहिले, अशा भावना सोनी राजदान यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आजच्या आई झालेल्या प्रत्येक वर्किंग वुमनशी निगडीत आहे. लग्न झालं, आई झालात म्हणून निश्चितच तुमचं आयुष्य बदलेल. करिअरमध्ये मोठा ब्रेक येईल. पण हा ब्रेक म्हणजे करिअरमधला फक्त एक पॉझ आहे की करिअरला लागलेला पुर्णविराम आहे, हे जिचं तिने ठरवावं. पण इच्छा असेल तर नक्कीच काम शोधता येईल आणि करता येईल, याचेच बोलके उदाहरण आज सोनी राजदान यांच्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत. सोनी राजदान आता अभिनयातली त्यांची दुसरी इनिंग जबरदस्त पद्धतीने खेळत असून वेबसिरिज आणि चित्रपटांच्या माध्यमातून त्या सातत्याने कार्यमग्न आहेत. 

 

टॅग्स :रिलेशनशिपआलिया भटसेलिब्रिटीमहेश भट