Join us  

कोरोनांनतर पुरुषांना शरीरसंबंधात येतात ५ अडचणी; तज्ज्ञ सांगतात कोरोनाचा लैंगिक जीवनावरही परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2022 4:52 PM

शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करणारा कोरोना लैंगिक जीवनावरही परीणाम करतो.

ठळक मुद्देमानसिक ताणाचा यामध्ये मोठा वाटा असल्याने अनेक पुरुषांना शरीरसंबंधांमध्ये अडचणी येतात. आजार बरा झाल्यावरही टेस्टेस्टेरॉन संप्रेरक वाढू शकले नाही तर शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी निर्माण होतात.

कोरोना विषाणूने मागील २ वर्षात जगभरात थैमान घातले. सातत्याने त्याच्या येणाऱ्या वेगवेगळ्या व्हेरीयंटमुळे सगळे समाजजीवन ढवळून निघाले. या आजारामुळे आरोग्यदृष्ट्या, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच स्तरावर नुकसान झालेय. या आजाराचा फटका लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच बसला असून श्रीमंत-गरीब असा कोणीही यातून सुटू शकला नाही. अनेकांचे या आजारामुळे प्राण गेले तर काहींना या विषाणूमुळे आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी निर्माण झाल्या. कोरोनातून बरे झाल्यावरही रुग्णांना काही ना काही तक्रारी भेडसावत राहिल्या. यामध्ये शारीरिक संबंधांबाबतच्या तक्रारींचाही समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना झालेल्या पुरुषांना याचा जास्त फटका बसल्याचे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के सांगतात. 

(Image : Google)

पुरुषांच्या लैंगिकतेवर काय परिणाम होऊ शकतो

१. संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, अल्प मुदतीचे किंवा दिर्घ मुदतीचे परिणाम रुग्णांवर होत आहेत. ताप, अंगदुखी, अशक्तपणा यांसारख्या तक्रारी उद्भवतात. याबरोबरच पुरुषांमध्ये कोरोना झाल्यानंतर लिंगाचा ताठरपणा कमी होण्याची शक्यता असते. 

२. कोरोनाचा विषाणू पुरुषांच्या अंडकोशावरही परिणाम करतो. हा विषाणू अंडकोशाच्या कार्यक्षमतेवर हा विषाणू परीणाम करतो. यामुळे वीर्यनिर्मिती किंवा टेस्टेटेरॉन या संप्रेरकाचे उत्पादन कमी होऊ शकते. प्रजननासाठी ही गोष्ट अतिशय आवश्यक असल्याने ज्यांना अशाप्रकारचा त्रास होत असेल त्यांना प्रजननात अडचणी येण्याची शक्यता असते.  

३. कोरोनाचा विषाणू शरीरातील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो. त्यामुळे शरीरातील संरक्षणप्रणाली कार्यरत होते, त्यावेळी रक्तवाहिन्यांना सूज येण्याची शक्यता असते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनतात. या सगळ्यामुळे लिंगाला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि लिंग ताठरतेमध्ये अडचणी निर्माण होतात. लिंग ताठरता नसेल तर शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी निर्माण होतात. 

(Image : Google)

४. एखाद्या व्यक्तीला आधीपासून हृदयरोग असेल तर कोरोनामुळे शारीरिक संबंधात जास्त अडचणी येतात. तसेच कोरोनाचे औषधोपचार काही जणांच्या शरीरावर जास्त परिणाम करतात आणि त्यामुळे शारीरिक संबंधांवर त्याचा परिणाम होतो. 

५. कोरोनामध्ये आलेल्या शारीरिक आणि मानसिक ताणामुळे टेस्टेस्टेरॉन हे संप्रेरक शरीरात कमी होते आणि इतर संप्रेरके वाढतात. आजार बरा झाल्यावरही टेस्टेस्टेरॉन संप्रेरक वाढू शकले नाही तर शारीरिक संबंध ठेवण्यात अडचणी निर्माण होतात. या संप्रेरकाची निर्मिती कमी झाली की ताठरपणा कमी होण्याबरोबरच अशक्तपणा येणे, कामवासना कमी होणे अशा समस्या निर्माण होतात. मानसिक ताणाचा यामध्ये मोठा वाटा असल्याने अनेक पुरुषांना शरीरसंबंधांमध्ये अडचणी येतात. 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक जीवनकोरोना वायरस बातम्या