प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील एक हॉट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांमधील प्रेम आणि त्यांचे नाते याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण नेहमी वाचत असतो. आता नवरा बायको म्हटल्यावर एकमेकांच्या साथीने आयुष्यातील सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करणे आलेच. अनेकदा आपल्या सोबत आपला जोडीदार आहे म्हणून आपले जगणे बऱ्याच प्रमाणात सुसह्य झालेले असते. असे असताना समोरच्याच्या असण्यामुळे आपल्या आयुष्यात खूप फरक पडतो हे मान्य केलं तर कुठं बिघडलं. पण अशाप्रकारे बायकोचं जाहीरपणे कौतुक करणे ही बाब सगळ्यांसाठीच वाटते तितकी सोपी नाही. अनेक पुरुषांसाठी आजही बायकोचं कौतुक करणे ही गोष्ट कमीपणाची वाटू शकते. खिलाडी कुमारने मात्र मोठ्या मनाने आपली पत्नी ट्विंकल खन्ना हीचे नुकतेच कौतुक केले आहे. अक्षयने इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टला हजारो लाइक्स आणि कमेंटस आल्या आहेत.
नुकताच ट्विंकल हिचा वाढदिवस झाला. या निमित्ताने अक्षय कुमार आणि कुटुंबिय मालदिव येथे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी गेले होते. त्यावेळी अक्षयने ट्विंकलचे मनापासून कौतुक करत तिला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर ट्विंकलसोबतचे काही फोटो शेअर करत अक्षय म्हणाला, “तुझ्या सोबतीमुळे आयुष्यातील प्रत्येक कठिण प्रसंगाशी सामना करणे माझ्यासाठी सोपे होते, जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा टीना.” अनेकदा आपल्या पत्नीला जी गोष्ट म्हणायला पुरुषांना कमीपणा वाटेल ती गोष्ट सोशल मीडियाच्या माधमातून सांगत अक्षयने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. बर असे जाहीर कौतुक अक्षयने पहिल्यांदा केले नसून याआधीही त्याने ट्विंकलचे अशाप्रकारे बऱ्याचदा कौतुक केले आहे. त्यामुळे अक्षयच्या आयुष्यात ट्विंकलचे स्थान किती आहे आणि तो तिचा किती आदर करतो हे दिसून येते.
पुरुष पत्नीचा सन्मान का करु शकत नाहीत?
अनेकदा महिलांना तसेच त्या आपल्या पतीला देत असलेल्या पाठिंब्याला गृहित धरले जाते. ‘बायको आहे ना, मग ते तिचे कामच आहे’ अशा भावनेतून महिलांना कमीपणाची वागणूक दिली जाते. पण नाते चांगल्या पद्धतीने पुढे न्यायचे असेल तर प्रेमाबरोबरच एकमेकांचा आदर करणेही तितकेच महत्त्वाचे असते. महिला कुटुंबात बऱ्याच पातळ्यांवर लढत असताना त्यांचे कौतुक करायचे सोडून त्यांना टोमणे मारण्यातच अनेकांना भूषण वाटते. पण यामुळे ती स्त्री आपल्याला खूश वाटत असली तरी ती मनातून खट्टू झालेली असते. बायकोचा सतत अपमान करणे यातच अनेकांना भूषण वाटते. यामुळे आपल्या पत्नीचे योगदान तर सोडाच पण तिचे आयुष्यातील स्थानही लक्षात घेतले जात नाही. पत्नीला सन्मानाची वागणूक देणे हे आपले नाते नक्कीच अधिक मजबूत करणारे असते.
बायकोची तारीफ केली तर पुरुष का होतात असुरक्षित
महिलांची किंवा बायकोची तारीफ करणे अनेकदा पुरुषांसाठी असुरक्षित वाटणारे असू शकते. आपल्या पत्नीचे यश त्यांना पचत नाही आणि आतल्या आत ते जळत असतात. एका संशोधनानुसार आपली पत्नी आपल्यापेक्षा अधिक यशस्वी असल्यामुळे नवरे वैतागलेले असतात. त्यामुळे त्यांच्यात कमीपणाची भावना निर्माण होते आणि ते पत्नीमध्ये काही ना काही चुका शोधायला लागतात. मात्र असे करणे त्यांच्या नात्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे पत्नीचे कौतुक करायला मागेपुढे पाहू नका तर अभिमानाने तिची प्रशंसा करा.