Join us  

काय ताई, लग्न करायचंय का? दादा, काय माहिती देऊ?- झटपट लग्न लावून देणाऱ्या एका अजब दुनियेची फिरस्ती

By सायली जोशी-पटवर्धन | Published: February 14, 2023 4:09 PM

झटपट लग्न लावून देणारी एक बाजारपेठच आळंदीत उभी राहिली आहे, पळून जाऊन लग्न करणारी जोडपी इथं भेटतात पण..

सायली जोशी-पटवर्धन

एसटी थांबली. आळंदीत उतरले. इंद्रायणीचा काठ, माऊलींची समाधी आणि दर्शनाला येणारे भाविक असं चित्र. आळंदीत फिरताना माऊलींच्या दर्शनाला मंदिरात जायचं का असं विचारणारे रीक्षावाले भेटतातच. पण तुम्ही तरुण असाल आणि तुमच्यासोबत कुणी तरुण पुरुषच असेल तर कुणीही थांबून बेधडक विचारतं, काय ताई लग्न करायचं का? दादा काय माहिती देऊ? धक्काच बसतो की असं भर रस्त्यात परका माणूस लग्न करायचं का असं कुणालाही कसं विचारु शकतो? पण तसं होतं. कारण  माऊलींची आळंदी असलेल्या आळंदीची आता एक नवीन ओळखही तयार झाली आहे. झटपट लग्न करता येतं अशी जागा, आणि तिथं एक मोठी बाजारपेठच उभी आहे जी सहज लग्न लावून देते.

ऐकायला हे कदाचित विचित्र वाटेल पण प्रत्यक्षात याठिकाणी गेल्यावर लक्षात येतं की इथं येऊन लग्न करणं ही फारशी अवघड नाही तर सोपी गोष्ट आहे. इथल्या गल्ल्यांमध्ये विवाहनोंदणी करुन मिळेल, आंतरजातीय विवाह होतील, रजिस्टर लग्न लावून देण्यात येईल अशा पाट्या जागोजागी नजरेस पडतात. याठिकाणी  चौकशी करायला गेलं तर ते आधी वय विचारतात आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला अशी काही किमान डॉक्युमेंटस मागतात. ती आपल्याकडे असतील तर बाकी विशेष चौकशी न करता लग्नाची पद्धत आणि दर सांगितला जातो आणि अगदी पुढच्या काही तासांत जोडप्याचं लग्न लागलेलंही असतं.

(Image : Google)

 

याठिकाणी आलेल्या जोडप्यांसोबत एकतर त्यांचे मित्रमंडळी असतात नाहीतर बहिण भाऊ किंवा आणखी कोणी. बरीचशी जोडपी याठिकाणी पळून येऊन लग्न करत असल्याने घरच्यांना त्याबाबत माहिती असतेच असे नाही. मग गुरुजीही नेहमीप्रमाणे साग्रसंगीत विधी न करता थोडक्यात विधी करतात. आपल्या जोडीदाराच्या भरवशावर याठिकाणी लग्नगाठ बांधण्यासाठी आलेल्या मुली, महिला आपल्याला दिसतात. यावेळी घरच्यांचा विरोध असल्याने किंवा आणखी काही कारणाने याठिकाणी येऊन लग्न करत असल्याचा ताण या महिलांच्या चेहऱ्यावरुन लपत नाही.

(Image : Google)

पण या सगळ्यांना धीर देत, त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारी आणि लग्नासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देणारी बाजारपेठीय यंत्रणा याठिकाणी अगदी व्यवस्थित उभी असल्याचे आपल्याला दिसते. याबरोबरच बाजुच्या एखाद्या धर्मशाळेतून मोठ्या जल्लोषात बॅंडचा आवाज येतो. आत डोकवून पाहिल्यावर शे पाचशे लोक याठिकाणी गावाहून लग्नासाठी नटून थटून आल्याचे दिसते. 

झटपट लग्न लावून देणारं एक जग असं आपल्याला भेटतं.. आणि दिसतात नुकतंच लग्न झालेली तणावग्रस्त चेहऱ्याची नवी जोडपी. त्यातही नवरीच्या चेहऱ्यावरचा भयाण ताण लपता लपत नाही. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलग्न