सायली जोशी-पटवर्धन
प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे, तिचं अलिकडेच लग्न झालं. आता चर्चा अशी की तिचा नवरा विकी जैन हा घरजावई म्हणून तिच्याच घरी राहतो आहे. त्यानेच अलिकडे एका मुलाखतीत सांगितलं की, आमच्या नव्या घराचं रिन्यूएशन लांबलं आहे. त्यामुळे सध्या मी अंकिताच्या घरीच घरजावई म्हणून राहतोय. हा विषय निमित्त झाला आणि चर्चा सुरु झाली की म्हणायला इतका मोठा उद्योगपती आणि मग तो का बायकोच्या घरी का राहतो? त्याला काय कमी आहे, भाड्यानं घर घेऊन पण राहता आलं असतं. समाजमाध्यमात तर याविषयाची बरीच चर्चा झाली. लोकांनी नावं ठेवली, टर उडवली. कुणी म्हणालं लग्न झालं तरी अजून अंकिता माहेरीच राहतेय, मग काय लग्न केलं. कुणी म्हणे, दोन वर्षे झाली विकी घरजावई म्हणून अंकिताकडेच राहतोय, काय मग लग्नानंतर बदललं.
या चर्चेवरुन एक दिसतं की, सोय- व्यक्तिगत अडचणी-निर्णय-पसंती किंवा निवड यापैकी काहीही म्हणून का असेना लग्नानंतर जर नवरा बायकोच्या घरी रहायला गेला तर आपला समाज नावं ठेवतोच. त्यातून भलतेसलते अर्थ काढले जातात. टोमणे मारले जातात. मग ती माणसं सामान्य असोत नाहीतर सेलिब्रिटी. मुलाने अगदी स्वखुशीनेही मुलीच्या घरी येऊन राहणे याला आपल्या समाजात अद्याप पुरेशी मान्यता मिळालेली नाही. जावई आपल्या मुलीला सांभाळणार, त्याचं घर म्हणजेच तिचं घर, तो तिच्या माहेरी अडचणीचाच, जावयाचा मान चार दिवस त्यानंतर तो सासूरवाडीत बरा नाही, त्याला अदबीने, आदराने वागायला हवे असा समज आजही आपल्या समाजात दिसून येतो.
पण प्रश्न असा आहे की, मुलगी ज्याप्रमाणे सून म्हणून सासरी गेल्यावर त्या घरातील होते तसाच जावई का नाही मुलीच्या घरातला होऊ शकत? जावई म्हणजे आमचा मुलगाच आहे असे म्हणणारे कित्येक जण ८ दिवस जावई त्यांच्या घरी राहिला तर लोक काय म्हणतील, जावयाकडे काही कमी आहे म्हणून तो सासरी राहायला आला का असा विचार करताना दिसतात. आता अंकिता लोखंडेच्याच बाबतीत बोलायचे झाले तर विकी जैन हा मूळचा रायपूरचा असून त्याच्या व्यवसायानिमित्त तो मुंबईत राहत आहे. अंकिता अभिनेत्री असल्याने तीही मुंबईतच राहते. या दोघांचे डिसेंबर २०२१ मध्ये लग्न झाले असून त्यांनी मुंबईमध्ये अलिशान घर खरेदी केले आहे. पण या घराचे रिनोव्हेशनचे काम सुरू असल्याने ते सध्या अंकिताच्या घरी राहत आहेत. अशाचप्रमाणे कधी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने, कधी मुलीच्या पालकांना सोबत म्हणून तर कधी कोणतेही कारण नसताना मुलीच्या घरी राहतो म्हणून एखाद्या मुलाला कमी लेखले जाणार असेल तर ते कितपत बरोबर आहे हा विचार करण्याची गरज आहे.
घरजावई म्हणजे त्याच्याकडे काहीतरी कमी असेल किंवा मुलीच्या घरच्यांनी कसा जावयाला आपल्या ताब्यात घेतला असा विचार करणाऱ्यांची संख्या भारतात आजही कमी नाही. आणखी कित्येक वर्ष ही विचारसरणी बदलणार नाही. पण मुलीच्या घरी अडीअडचणीच्या वेळी, एखाद्या समारंभाच्या वेळी मुलाप्रमाणे उभा असणारा जावई घरी राहायला आला की मात्र आजही दोन्ही घरातील लोकांचे आणि समाजातील इतरांचेही डोळे मोठे होतात. प्रत्येक कुटुंबाच्या अडचणी, सोयी आणि पसंती याप्रमाणे त्या त्या जोडप्याला आपल्या आयुष्याचे निर्णय घेऊ देण्याचा खुलेपणा असणं ही खरंतर महत्त्वाची गोष्ट आहे.