आपल्याला संपूर्ण आयुष्य जोडीदारासोबत राहायचे असते. त्यामुळे नवरा-बायकोचे नाते आनंदी असेल तर जीवन हा उत्सव होतो, नाहीतर सतत त्याच त्या कटकटी आणि भांडणं यांमुळे आपण, समोरचा आणि कुटुंबातील इतर व्यक्तीही वैतागून जातात. अशाने सगळेच वातावरण खराब होते. तुमचे जोडीदारासोबत असणारे नाते आनंदी असावे असे वाटत असेल तर नात्यात काही गोष्टींची आवश्यकता असते. आता चांगले आणि आनंदी नाते म्हणजे काय तर, एकमेकांबद्दल असणारी सहानुभूती, सकारात्मकता, मजबूत भावनिक संबंध हे आनंदी आणि आरोग्यदायी नात्यासाठी गरजेचे असतात असे रिसर्च सांगतो.
तुमचा जोडीदार तुमचा वेळ मागत असेल किंवा तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावे इतकी त्याची किमान अपेक्षा असेल तर तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता हे पाहणे महत्त्वाचे आहे. जोडीदार तुमच्याकडून एखाद्या प्रतिक्रियेची अपेक्षा करत असेल आणि त्यावेळी तुम्ही त्याला मला माझ्या कामातून किंवा मी करत असलेल्या गोष्टीतून डिस्टर्ब करु नकोस असे म्हणालात तर तो खट्टू होतो. यातून तुम्ही त्याचा आदर करत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करता हे सिद्ध होते. अशा प्रसंगांमधून तुमच्या भावनिक गरजांची पूर्तता होत नसल्याचे दिसते आणि नात्यामध्य तणाव निर्माण व्हायला सुरुवात होते. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमन यांनी याविषयी अभ्यास केला आणि वरील निष्कर्ष मांडले.
चांगल्या नातेसंबंधांबाबत बोलत असताना एखादी चांगली बातमी असेल तर तुमचा जोडीदार त्यावर कसा प्रतिसाद देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. कठिण प्रसंगात जोडीदार कशी प्रतिक्रिया देतो हे त्याच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असते. परंतु आनंदी क्षणांच्यावेळी त्याने दिलेली प्रतिक्रिया नात्यात लक्षणीय फरक निर्माण करते. याबाबत २००६ मध्ये एक रिसर्च करण्यात आला, त्यामध्ये डेट करणाऱ्या ७९ कपल्सला एकमेकांशी सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी बोलायला सांगण्यात आले. त्यानंतर ज्याने एखादी गोष्ट सांगितली त्यावर दुसऱ्या व्यक्तीने कशी प्रतिक्रिया दिली त्यावर त्यांच्यातील नात्यातील बंध तपासण्यात आला. ज्या जोडीदाराने बोलणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारले, काही प्रतिक्रिया दिली त्यांना जास्त रेटींग देण्यात आले. तर हे किती छान आहे, ऐकून छान वाटले अशा अतिशय सामान्य प्रतिक्रिया देणाऱ्यांना कमी रेटींग मिळाले. त्यामुळे एखाद्या वाईट घटनेवरुन सहानुभूती दाखवण्यापेक्षा सकारात्मक बाबतीत जोडीदाराने दिलेली प्रतिक्रिया अधिक महत्त्वाची असते हे यातूनसमोर आले.
पैसे, मुले, सासु-सासरे या गोष्टींवरुन जोडीदारांमध्ये भांडणे होण्याचे प्रमाण जास्त असते. पण त्या गोष्टींवर उत्तर शोधण्याचा अॅपरोच असेल तर तुमचे भांडण लवकर मिटू शकते. जे प्रश्न चर्चेने सोडवले जाऊ शकतात ते वेळच्या वेळी सोडवणे हीच दिर्घकाळ टिकणाऱ्या आणि आनंदी नातेसंबंधांची गुरुकील्ली असल्याचे चाइल्ड अँड फॅमिली स्टडीजचे प्राध्यापक आणि लेखक असलेले अॅमी रोर म्हणतात. याप्रमाणे इतरही अनेक रिसर्च करण्यात आले ज्यामध्ये वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे नात्यांतील बंध तपासण्यात आले. बहुतांश नात्यात जोडीदारांना एकमेकांशी भावनिकरित्या बांधलेले असणे महत्त्वाचे वाटते. पण आनंदी नात्याचे असे कोणतेही एक सिक्रेट असू शकत नाही. कारण प्रत्येक नाते हे वेगळे असते आणि त्या नात्याच्या आनंदाचे सिक्रेटही वेगवेगळे असतात.