पी टाऊन बेबी, हक से पटेल, अस्सी हजार के शूज है, अशी वाक्य बिग बॉस पर्व १६ या शोमध्ये गाजली. पुण्याचा देसी रॅपर म्हणजेच एम सी स्टॅनने अल्पावधीतच आपलं नाव गाजवलं. त्याने बिग बॉस १६ या पर्वात बाजी मारली आणि विजेता ठरला. त्याची बोलण्याची शैली, ड्रेसिंग सेन्स, रॅपिंग स्टाईल सर्व काही हटके होते. एम.सी. स्टॅन या शोमध्ये बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणानं बोलला. मुख्य म्हणजे त्याच्या मुखी नेहमी एकच नाव असायचं ते म्हणजे ''बुबा''. तर ही बुबा ही नेमकी कोण? बुबा आणि एम.सी. स्टॅनचे नेमकं नातं काय?
ती त्याची गर्लफ्रेण्ड
बुबाचे खरे नाव अनम शेख आहे. तो तिला लाडाने बुबा म्हणतो. अनम मुंबईची. ती आता २४ वर्षांची युवती आहे. अनमसाठी स्टॅटने पहिल्या गर्लफ्रेंडला सोडले असे त्यानेच बिग बॉसमध्ये सांगितले. तिने त्याला त्याच्या पडत्या काळात बरीच साथ दिली.
जेव्हा स्टॅनने बुबाला मागणी घातली..
बिग बॉसच्या घरात एकदा प्रपोज केल्याचा किस्सा आपल्या स्पर्धक मित्रांसह शेअर केला. तो किस्सा सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला होता. त्यावेळी तो म्हणाला,'' बुबाला मागणी घालण्यासाठी आम्ही जवळपास ३०-४० गँगस्टर लोकं गेलो होतो. तेव्हा आसपासची लोकं घाबरली, विचारू लागले काय झालं? तेव्हा म्हटलं आम्ही मुलीला मागणी घालायला आलो आहोत. घराखाली गाड्यांचा ताफा उभा होता.
मी वर गेलो तिच्या आईला म्हणालो, तुमच्या मुलीचा हात सन्मानाने माझ्या हातात द्या, नाही तर मी तिला पळवून नेईल. बघाच तुम्ही. तिची आई म्हणाली, ‘कोण आहेस रे तू? घरी जा आणि आई-वडिलांना बरोबर घेऊन ये. कोण आहेत हे लोक, कुठूनही येतात…आणि हो यापुढे आमच्या घरी येऊ नकोस.’ मी चांगलं करायला गेलो होतो आणि सगळं उलटं झालं,” असं स्टॅनने सांगितलं होतं. त्या दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चाही बिग बॉस इतकीच गाजली.