मनाली बागुल
काय मग लग्न कधी करतेस?.... आता मोठी झालीस तू एखादा चांगला मुलगा बघून तुझं लग्न करायला हवं.... अहो एखादा वेल सेट्ल्ड मुलगा असेल तर कळवा हा.... ,मुलगी वयात येत नाही तेव्हढ्यात तिच्यावर नकळतपणे दबाव येईल असं वातावरण घरातले, आजूबाजूचे लोक तयार करतात. लग्नाच्या वयाच्या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. लग्नासाठीचं किमान वय वाढवण्याशी संबंधित एका विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दलचे संकेत दिले होते. मुलींचं लग्नाचं किमान वय सध्या १८ वर्ष आहे ते वाढवून २१ करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठीची तयारी सरकारनं सुरु केली आहे. याबद्दलचं विधेयक अधिवेशनात मांडलं जाण्याची शक्यता आहे. (Bill likely on increasing legal marriage age of women from 18 to 21 years)
लग्नाचं वय वाढवण्याच्या निर्णयाबाबत आम्ही काही तरूण मुलींशी संवाद साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 'आधीच्या तुलनेत सध्या मुलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मुलाप्रमाणेच मुलगीही चांगला,भरगच्च पगार कमावणारी असावी असं त्यांना वाटतं. लग्नाचं २१ वय केल्यास मुलींना त्यांच्या करीअरकडे लक्ष द्यायला अजून चांगला वेळ मिळू शकतो. प्रत्येक घरात मुली वयात आल्यानंतर लग्नासाठी दबाव टाकला जातो. लग्नाचं वय २१ केल्यानं करीयरच्या आड येणारा लग्नाचा दबाव कमी होऊ शकतो. याऊलट काहीजणींनी अशी प्रतिक्रिया दिली की लग्नाचं वय वाढल्यानं स्वत:च्या मर्जीनं पळून जाऊन लग्न करण्याचं प्रमाण कमी होईल. कारण १८ वर्षापर्यंत फारशी समज नसल्यानं अनेक मुली असं पाऊल उचलतात ज्यामुळे त्यांना नंतर पश्चाताप होतो. '
महिलांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या समाजसेविका वंदना खरे सांगतात, ''आपल्या देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात गुप्तपणे मोठ्या प्रमाणावर बालविवाह होतात. कायद्याबाबत कल्पना अजूनही अनेक कुटुंबातील मुलींची लग्न वयाच्या १४ व्या वर्षीही केली जातात. परिस्थिती, समाजाच्या दबावापोटी मुलींकडूनही याला विरोध केला जात नाही. शिक्षण आणि लग्न याबाबत बोलायचं झाल्यास अजून ३५ टक्के महिलांच्या नशिबात साक्षरताही नाही. मुलगी शाळेत गेली तरीही खूप कमी मुली महाविद्यालयीन शिक्षण घेतात. सोयी सुविधांच्या अभावानं ग्रामीण भागातील मुली शाळेत जाणं टाळतात. ही स्थिती जर बदलत नसेल तर फक्त लग्नाचं वय वाढून बदल होणार नाही.
अनेक घरात लहान वयात लग्न करून मुलींना खड्ड्यात लोटलं जातं. १८ वर्षाच्या आत शरीरसंबंधांना समोरं जावं लागणं ही एका प्रकारची लैगिंक मजूरी आहे. या त्रासाविरूद्ध कोणतीही मुलगी दाद मागू शकत नाही कारण विवाहाअंतर्गत बलात्काराला कायद्यानं शिक्षाच दिली जात नाही. इतक्या मोठया प्रमाणावर महिलांची कोंडी होत असेल तर नुसतं लग्नाचं वय वाढवल्यानं काहीही उपयोग होणार नाही. आम्ही काहीतरी केलंय असं दाखवण्यासाठी हा निर्णय असावा.''
लग्नाचं वय २१ असल्याचे तोटे
लग्नाचं वय २१ करण्याच्या धोक्यांबाबत वंदना खरे म्हणतात, '' उदा. जर एखाद्या मुलीचं प्रेम प्रकरण असेल आणि तिचं वय १७ असेल तर ते एक वर्ष थांबून १८ व्या वर्षी लग्न करू शकतात. आई वडीलांचा विरोध असेल तर ते 'आमच्या मुलीचं वय कमी असून त्यानं बलात्कार केलाय.' अश्या खोट्या तक्रारी दाखल होऊ शकतात. लग्नाचं वय जर वाढवलं तर मुलीला तेव्हढीही बंडखोरी करता येणार नाही कारण ती स्वत:च यात अडकेल.
अनेक घरात मुलीचं वय १५ असो १८ असो किंवा २५ स्वत:च्या मर्जीनं लग्न करता येत नाही. तिचं मत विचारात घेतलं जात नाही. फक्त लग्नाचं वय वाढवण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबात मुलींना शिक्षणाचा, निर्णय घेण्याचा अधिकार द्यायला हवा. जेणेकरून तिचं ती ठरवू शकेल. काही मुली अशा आहेत ज्यांना आयुष्यात लग्न हा प्रकार नकोसा वाटतो. मग तिलाच, 'काय मग लाडू कधी देणार?' अशा प्रकारचा दबावात टाकणार प्रश्न विचारला जातो. त्यामुळे फक्त लग्नाचं वय वाढवल्यानं प्रश्न सुटतील असं होणार नाही.''