व्हॅलेण्टाइन्स डे तर तुम्हाला माहितीच आहे. पण गॅलेण्टाइन्स डे माहिती आहे का? (Galentine's Day). गॅलेण्टाइन्स असं काही नसतंच, किंवा हा नवा मार्केटिंग ट्रेण्ड असेल डे असेल असं वाटून लगेच फुली मारु नका. गॅलेण्टाइन्स डे हे फार भारी प्रकरण आहे. अगदी व्हॅलेण्टाइन्स डे पेक्षा पण भारी, रोमॅण्टिक आणि जीवाभावाचं. इतकी भन्नाट कल्पना की, वाचून तुम्हीही म्हणाल की यंदा व्हॅलेण्टाइन्स डे नंतर, आधी हा गॅलेण्टाइन्स साजरा करू. तर हा गॅलेण्टाइन्स डे असतो १३ फेब्रुवारीला. आणि गॅलेण्टाईन्सचा अर्थ होतो, ‘महिला/तरुणींनी आपल्या अतिशय जीवाभावाच्या एका किंवा अनेक मैत्रिणींंसोबत साजरा करण्याचा दिवस’. फक्त मुलीमुलींचा. मुलींच्या मैत्रीचा. आता हेच पहा ना, हिंदी सिनेमात तुम्हाला तरुणांच्या दोस्तीचे किती सिनेमे दिसतील, अगदी शोले ते याराना पर्यंत आणि थेट दिल चाहता है, जिंदगी ना मिलेगी दुबारा पर्यंत! पण मुलींच्या मैत्रीचं काय? त्यांची मैत्री अशी जीवाभावाची, वर्षानूवर्षे चालणारी नसते का? मग त्यांच्या मैत्रीचं सेलिब्रेशन का नाही होत? त्या का नाही आपल्या मैत्रिणींसोबत जिंदगी ना मिलेगी दुबारा सेलिब्रेट करु शकत?
(Image : Google)
याच साऱ्या प्रश्नातून हा दिवस जन्माला आला आहे. (Galentine's Day) नुसतं तुम्ही #Galentine's Day असं गुगलवर सर्च करुन पहा. अनेक तरुणींच्या सेलिब्रेशनचे फोटो, आपल्या दोस्तीच्या कहाण्या, डोळ्यात पाणी येईल वाचून अशा मैत्रीच्या कहाण्या. अमेरिकेत हा गॅलेण्टाइन्स डे अतिशय लोकप्रिय आहे. अभिनेत्री ॲमी पोलेरने ही परंपरा आणि हा दिवस जन्माला घातला. म्हणजे काय तर फेब्रुवारी २०१०मध्ये ‘पर्क्स ॲण्ड रिक्रेएशन’ या सिरीजच्या एका भागात तिनं वापरला होता. आणि त्याच मालिकेत कशा तरुण मुली, जीवाभवाच्या मैत्रिणी एकत्र येत हा दिवस साजरा करतात, त्यांच्या दोस्तीचं सेलिब्रेशन करतात अशी चर्चा झाली. निल्सन मीडीया रिसर्चनुसार त्या एपिसोडला ५ मिलीअन व्ह्यूज मिळाले. आणि ही कल्पना खूप गाजली.
(Image : Google)
त्यानंतर व्हॅलेण्टाइन्स डेच्या आदल्या दिवशी हा गॅलेण्टाइन्स डे साजरा करण्यात येऊ लागला. आणि आता तर केवळ मैत्रिणी नाही तर, बहिणी, मावसआते बहिणी, आई अशा आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘गर्ल-फ्रेण्ड्स’सोबत जगभर अनेकजणी हा दिवस साजरा करतात. आपल्या मैत्रीचं, नात्याचं सेलिब्रेशन करतात. प्रत्येकीला अशी जीवाभावाची एकतरी मैत्रीण असतेच, जी नसती तर आपल्या आयुष्यात काही मजा नाही असं वाटतं. त्या मैत्रिणीने, किंवा बहिणीने, सहकारी असलेल्या तरुणीने आपल्यासाठी खूप केलेलं असतं.
(Image : Google)
तिला हे सांगण्याचा हा दिवस की, तू माझ्यासाठी स्पेशल आहे. तुझ्याशिवाय जगण्यात मजा नाही.गिफ्ट द्या न द्या, पण आपल्या जवळच्या मैत्रिणींना, अगदी आईलाही जरुर सांगा यंदा Galentine's Day ला, तेरे बिना जिया जाए ना..