लग्न झालंय म्हणून नवरा बायकोचं नातं (husband wife relationship) टिकूनच राहातं असं नाही. ते टिकून राहाण्यासाठी नातं हेल्दी असावं लागतं. आरोग्य सांभाळताना आरोग्यासाठी काय चांगलं काय वाईट हे आपण सतत माहिती करुन घेतो. जे चांगलं ते स्वीकारुन जे वाईट ते सोडत जातो. नवरा बायकोच्या नात्यातली सुदृढता टिकवून ठेवण्यासाठीही नेमकी याचीच गरज असते आणि अनेकदा अनेकांकडून याकडेच दुर्लक्ष होतं. संवाद (communication in relationship) हा कोणत्याही नात्यासाठी ऑक्सिजनचं काम करतो. नवरा बायकोच्या नात्यात तर प्रेम, विश्वास निर्माण करण्यात संवादाचा वाटा खूप मोठा असतो. पण संवादाचा विसंवाद होत असेल, भांडणाचं, विसंवादाचं कारणच संवाद असेल तर संवाद साधताना आपलं काय चुकतंय (communication habits) हे नवरा बायकोनं तपासून घ्यायला हवं. नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण करणाऱ्या 5 सवयी बदलल्यास संवाद सुधारतो आणि नातंही.
Image: Google
नवरा बायकोच्या संवादात काय चुकतं?
1. सतत टीका करणं
आपल्या जोडीदारावर सतत टीका करणं ही गोष्ट नात्यात कडवटपणा निर्माण करते. जोडीदार चुकीचा वागला/ वागली म्हणून टीका केली हे यावरचं कारण नाही. जोडीदारावर सतत टीका केल्यानं. टीका करताना आवाज चढल्यास, वावगा शब्द वापरल्यास जोडीदाराचं मन दुखावतं. सततच्या टीकेचा जोडीदारालाही कंटाळा येतो. बोलायलाच नको अशी भावना निर्माण होते. आपल्या जोडीदाराची एखादी गोष्ट पटत नसेल, आवडली नसेल तर ते व्यक्त करण्यासाठी टीका करणं हा एकच मार्ग नसतो. शांतपणे, प्रेमानं, चांगल्या भाषेत, सौम्यपणे ते जोडीदाराला सांगता येतं. आणि अशा पध्दतीनं सांगितलेल्या गोष्टी जोडीदराला पटताततही.
2. सतत वाद घालणं
एकमेकांशी बोलणं म्हणजे लहान मोठ्या गोष्टीवरुन सतत वाद घालत राहाणं नव्हे. सतत वाद घालत राहाण्याच्या सवयीनं जोडीदार वैतागतो/ वैतागते. वाद घालण्याची सवय असेल तर कोणतंही कारण पुरतं. यातून जोडीदाराच्या चुकांवर सतत बोट ठेवलं जातं. वाद घालण्याच्या सवयीमुळे नात्यात सतत अंतर पडत जातं. सुरुवातीला लुटुपुटुची भांडणं नंतर गंभीर स्वरुपही धारण करतात. नवरा बायकोचं नातं सांभाळताना नेहमी माझंच खरं, मीच बरोबर असं म्हणून चालत नाही. भांडण टाळण्यासाठी एक पाऊल मागे टाकलं तर नातं कित्येक पावलं पुढे जातं, घट्ट होतं.
3. सतत टिंगल करायची सवय
जोडीदाराची सतत टिंगल टवाळी करायची सवय असेल तर यामुळे जोडीदाराच्या भावना दुखावतात. एकांतात, चारचौघात मजा उडवली जात असल्यास जोडीदाराच्या मनात चीड, वैताग, न्यून भावना निर्माण करतात. जोडीदाराकडून एखादी गोष्ट उणे घडली, त्यात काही कमतरता राहिली, एखादी गोष्ट चुकली, बिघडली तर जोडीदारास कमी लेखण्यापेक्षा हसत खेळत ती गोष्ट समजून घेतल्यास जोडीदाराला वैताग नव्हे तर आधार वाटतो.
Image: Google
4. तुलना करणं
सर्व बाबतीत सतत दुसऱ्यांशी तुलना करण्याची सवय वाईटच. तुलना केल्यामुळे गोष्टी सुधरत नाही तर बिघडतात. तुलना करण्याची सवय असल्यास जोडीदार कितीही चांगला/ चांगली असल्यास, तिने/ त्याने कितीही चांगलं केलं तरी समाधान वाटत नाही. दुसऱ्यांशी तुलना करुन जोडीदारात, त्याच्या कृतीत, सवयीत चुका शोधल्या जातात. व्यक्ती आणि स्वभाव हे वेगवेगळे असतात ही बाब समजून घेऊन जोडीदाराकडे बघणं गरजेचं असतं. तुलना करण्याची सवय जोडीदारात कमीपणाची भावना निर्माण करते.
5. मनात ठेवणे
सतत वाद घालणे, टीका करणे, तुलना करणे हे नात्यासाठी जितकं घातक तितकंच जोडीदाराचं काही पटत नसलं तर ते बोलून न दाखवता मनात ठेवणंही. यामुळे जोडीदाराबद्दल सतत नकारात्मक गोष्टी साचत जातात. न पटणाऱ्या गोष्टी बोलल्या न गेल्यामुळे जोडीदाराबद्दलचा दृष्टिकोन दूषित होतो, त्याचा नात्यावर परिणाम होतो. जोडीदाराबद्दलच्या न पटणाऱ्या गोष्टी मनात ठेवण्यापेक्षा वेळच्या वेळी समजूतदारपणे त्या बोलल्या गेल्यास मन मोकळं होतं, आपल्या जोडीदाराला काय खटकतं, काय आवडत नाही याची जाणीव सोबतच्या व्यक्तीलाही होते. यातून संवाद घडतो. जोडीदाराला समजून घेण्यास मदत होते.