अचंबित करणारी असली तरी ही बाब १०० टक्के खरी आहे. बालविवाह थांबविण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात, यावर अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड आणि ड्यूक विद्यापीठातील काही संशोधकांनी त्यांचा अभ्यास मांडला आहे. या संशोधकांच्या मते बालविवाह रोखण्यासाठी स्वयंपाकाचे तेल हे सगळ्यात जास्त उपयोगी ठरले आहे.
बालविवाहांच्या बाबतीत आफ्रिकेनंतर बांग्लादेशाचा क्रमांक येतो. संशोधकांनी बांग्लादेशात केलेल्या अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर असा निष्कर्ष काढला आहे की, मुलींसाठी त्यांच्या पालकांना स्वयंपाकाचे तेल मोफत देऊ केले असता बालविवाहाचे प्रमाण घटले असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘A Signal to End Child Marriage: Theory and Experimental Evidence from Bangladesh’ असा अभ्यास या संशोधकांनी मांडला आहे.
१५ ते १७ या वयोगटातील मुली ज्यांना आहेत, अशा पालकांना काही वर्षे खाद्यतेल वाटप करण्यात आले. यासाठी अट फक्त एवढीच होती की ते पालक आपल्या मुलींचा बालविवाह करणार नाहीत. याचा खूपच सकारात्मक परिणाम बांग्लादेशात दिसून आला. खाद्यतेल वाटण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे बांग्लादेशात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले आहे तर १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे विवाह होण्याचे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या नीना बुचमन यांनी या अभ्यासासाठी असलेल्या संशोधकांच्या टीमचे नेतृत्व केले होते. ‘Save the Children’ या अमेरिकेच्या मोहिमेअंतर्गत झालेल्या या अभ्यासात दक्षिण बांग्लादेशातील हजारो मुलींच्या पालकांना सहभागी करून घेण्यात आले होते.
या प्रयोगासाठी खाद्यतेलाचीच निवड करण्याचे कारण म्हणजे बांग्लादेशात प्रत्येक घरात खाद्यतेल लागतेच. खाद्यतेल हा त्यांच्या स्वयंपाकाचा म्हणजेच एका अर्थाने जगण्याचाच एक मुख्य घटक आहे. खाद्यतेल खरेदीसाठी प्रत्येक कुटूंबाला दर महिन्याला बरेच पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे बांग्लादेशी लोकांची दुखरी नस अचूकपणे हेरून खाद्यतेलाची निवडच या प्रयोगासाठी करण्यात आली.
बालविवाह हा अनेक देशांसाठी खूपच बिकट प्रश्न होऊन बसला आहे. युनिसेफने २०२० साली केलेल्या संशोधनानुसार आशियामधील २९ टक्के मुलींचे विवाह हे बालविवाह होते. बांग्लादेशात तर हे प्रमाण जवळपास ५१ टक्के आहे. हा आकडा खूपच भयावह असून लॉकडाऊननंतर तर हे प्रमाण आणखी वाढलेले दिसण्याची दाट शक्यता आहे. बालविवाहामुळे लवकर होणारे बाळांतपण, बालमृत्यू आणि माता मृत्यू यांचे वाढलेले प्रमाण असे अनेक प्रश्न जन्माला येतात.
खाद्यतेल वाटप करण्याच्या योजनेमुळे मात्र हे प्रमाणही झपाट्याने कमी झाले आहे. टीन एज प्रेग्नन्सीतही लक्षणीय घट झाली आहे. मुलींचे विवाह लवकर न झाल्यामुळे आपसूकच त्यांच्या कुटूंबाने त्यांच्या शिक्षणाचा किंवा त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा पर्याय स्विकारला. त्यामुळे खाद्यतेल महिला सशक्तीकरणाची नवी लाट बांग्लादेशात आणण्यास उपयुक्त ठरले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.