कोरोना अजून गेलेला नाही. पण कोरोनानं माणसाच्या जगण्यावर किती परिणाम झाला हे मोजण्याची सुरुवात मात्र झाली आहे. जगभरात अनेकांना या कोरोनामुळे आपल्या आयुष्यात कुठल्या न कुठल्या प्रकारे नुकसान सोसावं लागलंय, लागतंय आणि जोपर्यंत हा कोरोना आहे तोपर्यंत ते सोसावं लागणार आहे. कोरोनानं माणसाच्या आयुष्यात काय उलथापालथी केल्या आहेत हे मोजण्यासाठी जगभरात वेगवेगळी सर्वेक्षणं सुरु आहेत. असंच एक सर्वेक्षण कोरोनामुळे नोकरदार आयांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला याबाबतीत झालं. या सर्वेक्षणानं महत्त्वाची निरिक्षणं आणि त्यामागची कारणं नोंदवली आहेत.
कोरोनामुळे जगभरातल्या लोकांच्या नोकर्यांवर परिणाम झाला, अनेकांचे रोजगार गेले हे आपण रोज वाचतो आणि पाहतोच आहे. पण कोरोनानं जगभरातल्या अनेक नोकरदार महिलांसमोर अशी परिस्थिती निर्माण केली की त्यांना नोकरी सोडण्याशिवाय, नोकरीत एक पाऊल मागे घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. नोकरदार महिलांच्या बाबतीत कोरोनाने नोकरीची सुरक्षितता, कामाच्या ठिकाणची समानता, वेतन समानता, दीर्घकालीन करिअर संधी या प्रत्येक गोष्टीवर परिणाम केला आहे. काहीजणींच्या बाबतीत तर करिअरच्या बाबतीत झालेलं नुकसान कधीही न भरुन येणारं आहे.
छायाचित्र- गुगल
जगभरात कोरोनचा संसर्ग वाढू लागला तशा मुलांच्या शाळा, पाळणाघरं बंद झाली. मुलांचा अभ्यास, त्यांची देखभाल काळजी, त्यांन सोबत यामुळे अनेक नोकरदार आयांवर अनिच्छेने नोकरी सोडण्याची किंवा नोकरीतल्या जबाबदार्या कमी करुन घेण्याची वेळ आली. यामुळे अनेकजणींना वेतन कपात स्वीकारावी लागली. निवृत्तीनंतर मिळू शकणारे आर्थिक लाभ, नोकरीतील बढतीच्या संधी गमवाव्या लागल्या.
कोरोनानं कामाचं स्वरुप बदललं. वर्क फ्रॉम होम सुरु झालं. अनेक महिलांना घरुन काम करायला मिळणार म्हणून आधी आनंद झाला. पण जसजसे दिवस सरु लागले तशा कामातल्या खाच खळगा कळायला लागल्या. घरुन काम करताना ऑफिसचं काम, घर काम, मुलं सांभाळणं, त्यांचा अभ्यास या सर्व कामात समन्वय साधण्यात महिलांची दमछाक झाली. बायकांमधे मल्टिटास्किंगचां कौशल्य असतं हे मान्य पण इथे तर या कौशल्याची रोजच्या रोज अवघड परीक्षाच होवू लागली. बायका यामुळे शारीरिक आणि मानसिकरित्या थकून गेल्या.
अनेक अभ्यासकांना आता असा धोका वाटतो आहे की कोरोनाने महिलांच्यापुढे कामाच्या दृष्टिकोनातून ज्या समस्या निर्माण केल्या आहेत त्यामुळे प्रत्यक्ष उत्पादनात बायकांचा सहभाग कमी होईल.त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसेल. अनेक वर्षांच्या मेहनतीने, व्यावसायिकतेने महिलांनी वर्किंग वुमन म्हणून कामाच्या ठिकाणी निर्माण केलेली स्वत:ची जागा यालाच धक्का बसण्याची, तसेच जगभरात स्त्री पुरुष वेतनात अरुंद होत असलेली तफावत पुन्हा रुंदावण्याची शक्यता अभ्यासकांना वाटते आहे.
सेरामाऊण्ट या कन्सल्टिंग फोर्सनं केलेलं सर्वेक्षण सांगतं की, अमेरिकेतील काम करणार्या एकूण आयांपैकी एक तृतियांश आयांना नोकरीत एक पाऊल मागे घ्यावं लागलं, अनेकींना नोकरी सोडून द्यावी लागली तर अनेकजणी नोकरी सोडण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत.
छायाचित्र- गुगल
वर्क फ्रॉम होम सुरु असताना अनेक महिलांच्या जोडीदारांनी त्यांना घरकामात, घरकामातल्या काही जबाबदार्या पेलण्यात मदतही केली पण घराची, घरातल्या कामांची मुख्य जबाबदारी मात्र बायकांनाच पेलावी लागली. घरातली न संपणारी कामं आणि वर्क फ्रॉम होम म्हणून नोकरीतल्या कामाचा वाढता पसारा एकाच जागेवरुन वाहताना बायकांची प्रचंड ओढाताण झाली. यामुळे अनेक महिला तर भावनिक दृष्ट्या खचलेल्या असल्याचंही अभ्यासकांना आढळून आलं. अनेक महिलांनी मुलांच्या, घरातल्या सदस्यांच्या गरजा वेळेवर पूर्ण करणं आणि ऑफिसच्या कामाच्या बाबतीतही काटेकोर राहाण्याचा जीवापाड प्रयत्न केला. पण अनेकींना ते नंतर झेपेनासं झलं आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्ण य घेतला हे सर्वेक्षणात आढळून आलं.
या सर्वेक्षणात 18 वर्षांखालील मुलांच्या आयांच्या नोकरी-व्यवसायावर आणि करिअरवर परिणाम झालेला आढळून आला. हे सर्वेक्षण सांगतं की नोकरी सोडलेल्या अनेक महिला करिअरच्या अशा टप्प्यावर पोहोचल्या होत्या की त्यांनी पाहिलेली आपल्या यशस्वी करिअरची स्वप्नं पूर्ण होणं अगदीच आवाक्यात आलेलं होतं. पण कोरोनामुळे मुलं घरात कोंडली गेली , त्यांना ऑनलाइन शाळांना सामोरं जावं लागलं, याचा ताण जितका मुलांवर होता तितका किंबहुना त्यापेक्षा त्यांच्या आयांना आला. नोकरीपेक्षा अशा अवघड काळात मुलांना आपली गरज आहे हे ओळखून, करिअरपेक्षा मुलांना महत्त्व देऊन आयांनी नोकरीत मेहनतीनं कमावलेल्य पोझिशनवर बोळा फिरवला. अनेक महिलांनी अभ्यासकांशी बोलताना खंत व्यक्त केली की ज्या वयात नोकरी मिळणं अशक्य होतं त्या वयात हातातली सुरक्षित नोकरी गमावण्याची वेळ आमच्यावर आली.
छायाचित्र- गुगल
नोकरी व्यवसायामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित, स्वावलंबी आणि स्वतंत्र असतात. पण जगभरातल्या अनेक नोकरदार आयांनी घर आणि मुलं यांना महत्त्व देत या ही सुरक्षा, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याचा त्याग केला. आपलं करिअर सोडणार्या सर्व सामान्य महिलाच आहे असं नाही. तर डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट असलेल्य अनेक महिलांना कोरोनामुळे घरात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे, घरात लक्ष देण्याच्या वाढलेल्या गरजेमुळे एकतर आपली प्रॅक्टिस पूर्वीच्या तुलनेत खूपच कमी करावी लागली तर अनेकींना ती सोडण्याशिवाय काही पर्यायच उरला नाही.
फॅमिली फर्स्ट, मुलं महत्त्वाची म्हणत करिअर, नोकरीच्या बाबतीत अनेकींनी माघार घेतली आहे. कोरोना जसा निवळेल, शाळा, पाळणाघरं सुरु होतील तशी ही परिस्थिती सुधारेल, महिलांना पुन्हा घराबाहेर पडून काम करणं शक्य होईल असं अर्थविषयक तज्ज्ञांना वाटत आहे. अनेकजणींच्या बाबतीत ही शक्यता सुदैवानं खरीही ठरेल पण काही जणींना मात्र आपल्या नोकरी करिअरच्या वाटेवरुन अशी माघार पत्करावी लागली आहे की पुन्हा त्या वाटेवरुन चालणं त्यांच्यासाठी अवघड होवून गेलेलं आहे.