Join us  

घरात सतत क-ट-क-ट होतेय, सतत चिडचिड, भांडणं? कोरोनाकाळात अनेक घरांत वाद का पेटलेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:03 PM

घरात सतत कटकट, वादविवाद, घरात रहावंसं वाटत नाही, सतत तोंडाचे पट्टे सुरु असं वातावरण अनेक घरात दिसतं, त्याचं कारण काय? काय केलं तर हा प्रश्न सुटेल?

ठळक मुद्देज्यांना हक्काचं नातं, रक्ताचं नातं वगैरे लेबल्स आपण चिकटवतो, तिथे मनातलं बोलायची सोय उरत नाही. अशा नात्यांमधून आनंद-आधार मिळणं दूरच राहतं.

प्राची पाठक

घरातलं एकूणच वातावरण अशांत असणं, हा अनेक घरांचा प्रॉब्लेम असतो. लहान-मोठ्या गोष्टींत घरातल्या कोणाची तरी चिडचिड होणं आणि त्या चिडचिडीपायी इतरांना घरात थांबणं नकोसं होणं, असं सगळं विविध घरांत सुरू असतं. हीच चिडचिड, एकमेकांवर ओरडणं आणखीन विकोपास गेलं की दुसऱ्याला घालूनपाडून बोलणं सुरू होतं. एकाच घरात जणू एकमेकांचे वैरी नांदत आहेत, असं वातावरण तयार होतं. एकमेकांशी संवाद वगैरे फार दूरच्या गोष्टी. वाद टाळण्यासाठी आरडाओरडा करणाऱ्या व्यक्तीला एकतर वाळीत टाकून दिलं जातं किंवा त्याच्या/तिच्या तालावर इतरांना नाचावं लागतं. तुम्ही म्हणाल ते सर्व करू; पण, जरा शांत राहा, घरातलं वातावरण आनंदी नाही, तरी किमान शांत ठेवा, अशा पातळीवर सगळी नाती येतात. ह्यात नात्यांचा ओलावा, सुख, समाधान दूरदूरपर्यंत दिसत नाही. सोबत राहायचं तर काहीतरी स्वरूपाची कॉमन मिनिमम शांतता हवी, इतक्या जुजबी गणितावर सगळं घर वेठीस धरलं जातं.आता ह्यात अनेक शेड्स असतील. अनेक प्रकार असतील. कुठे घरातली कर्ती व्यक्ती असं वागत असेल. कुठे घरातली तरुण मंडळी चिडचिड करीत असतील. काही ठिकाणी घरातले ज्येष्ठ सदस्य आपला हेका न सोडता सगळ्या घराला आपल्या तालावर नाचवत असतील. कुठे घरातली करती स्त्री तिच्या जबाबदाऱ्यांना कंटाळून इतरांवर ओरडत असेल. तिला तर जबाबदाऱ्या दोन दिवसदेखील साईडला टाकायचा ऑप्शन नसतो. तर, उदाहरणं घरानुसार बदलत जातील. आता घर म्हंटलं की चार भांडी वाजणारच, इतकं सोपं हे नसतं. हळूहळू घरातली मंडळी बाहेर राहणं स्वीकारतात. एकमेकांपासून दूर राहणं पसंत करू लागतात. ज्यांना हक्काचं नातं, रक्ताचं नातं वगैरे लेबल्स आपण चिकटवतो, तिथे मनातलं बोलायची सोय उरत नाही. अशा नात्यांमधून आनंद-आधार मिळणं दूरच राहतं.

अशावेळी आपण काय काय करू शकतो?

१. आपल्या दुसऱ्याकडून असलेल्या अपेक्षा आपणच एकदा नीट तपासून पाहाव्यात. आपण जेंव्हा दुसऱ्याकडून काही अपेक्षा ठेवतो, तेंव्हा त्याने नीट वागावं, अमुक पद्धतीनं जगावं, अशा काही गोष्टी आपल्याला अपेक्षित असतात.२. अगदी कळकळीने काही गोष्टी आपण दुसऱ्याला समजावून सांगत असतो. त्या मात्र त्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचतच नाहीत. अशावेळी आपणच आपली पद्धत चुकत तर नाही नां, हे तपासून पाहू शकतो.३. आपण जे दुसऱ्याला सांगत असतो, ती आपली त्याच्याकडून असलेली अपेक्षा किती रास्त आहे, हे आधी स्वतःलाच परत विचारू शकतो. आपल्या सांगण्याच्या पद्धतीत काही बदल करता येईल का, हे ठरवू शकतो.४. मुळात आपल्याला दुसऱ्याने जे करावं असं अपेक्षित असतं, त्याचवेळी समोरच्याचीसुद्धा तुमच्याकडून काही अपेक्षा असते. ती आपण पूर्ण करू शकतोय का, हे स्वतःला विचारावं.आपण दुसऱ्याचं किंवा दुसऱ्यानं आपलं आयुष्य चालवायला घेण्यापूर्वी एकमेकांशी नीट बोलून घेण्याचा पर्याय कितपत खुला आहे, ते चाचपडून घेऊ शकतो.५. एकमेकांशी नीट संवाद साधता येणं ही एक कला आहे. ती बटन सुरू केल्यासारखी स्टार्ट करता येत नाही. त्यासाठी सुरुवातीला दुसऱ्याच्या कलाने काही गोष्टी घ्याव्या लागतील. आपण कोणत्या विषयांवर एकमेकांशी नीट संवाद साधू शकतोय, ते कॉमन पॉइंट्स शोधावे लागतील. हळूहळू एकमेकांना कटकट न होता संवाद साधल्या जाणाऱ्या काही कॉमन पॉइंट्सची सवय करावी लागेल. मगच आपण त्याच्यापुढे जाऊन काही गोष्टी दुसऱ्याला मोकळेपणी सांगू शकू. आपली इच्छा दुसऱ्यांवर न लादता ‘मला असं वाटतंय, बघ विचार करून,’ असं आपण समोरच्या व्यक्तीला सुचवून बघू शकतो.

 

त्याने काय होतं?

समोरचादेखील आपल्या मुद्द्याला समजून घेऊ शकतो. तेही अपेक्षांच्या ओझ्याशिवाय. मग तो त्यावर स्वतःहून विचार करतो. तुमच्यासाठी समोरच्यानं अमुक बदल करणं आणि समोरच्यानं स्वतः ठरवून तो बदल स्वतःमध्ये करणं, ह्यात खूप फरक असतो. त्या पॉइंटपर्यंतचा प्रवास जर सुसह्य नसेल, तर गाडी मध्येच कुठेतरी घसरू शकते. कधी उलट्या मार्गाने तिचा प्रवास होऊ शकतो. कधी आणखीन त्रासदायक काही पैलू त्या गोष्टीला जोडले जाऊ शकतात. म्हणूनच एकमेकांशी बोलायची कला शिकायला हवी. त्या कलेत घरातल्या अनेक लहान-मोठ्या कुरबुरींची सोपी उत्तरं दडलेली असतात. त्यासाठी एकमेकांमधल्या आनंदी संवादाचे काही कॉमन मिनिमम पॉइंट्स आपल्याला शोधायला लागतील. एकदम दुसऱ्याला दुरुस्त करायला जाण्यापूर्वी हे शिकणं गरजेचं आहे. भले ते आपल्या मतानुसार आणि एकूणच सारासार विचार म्हणून समोरच्याच्या फायद्याचं असेल. तरीही, एकमेकांशी संवाद साधायच्या काही ठरावीक गोष्टींचा पूल कायम बांधून ठेवावा. त्यावर मग जरा खोचक, वेचक असं काही आपण पुढे पेरू शकतो.बघा विचार करून... काही गोष्टी ट्राय करून जरा फरक पडतोय का विचारा स्वतःलाच.

(लेखिका मानसशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)prachi333@hotmail.com

टॅग्स :रिलेशनशिप