Lokmat Sakhi >Relationship > आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी बांधली संविधान साक्षीने लगीनगाठ, शहरातला तामझाम सोडून करणार ग्रामीण भागात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 03:30 PM2021-12-14T15:30:02+5:302021-12-14T15:34:55+5:30

उच्चशिक्षित तरुण-तरुणींनी बांधली संविधान साक्षीने लगीनगाठ, शहरातला तामझाम सोडून करणार ग्रामीण भागात काम

Dam built first, then marriage, story of a simple and social awareness wedding. | आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

आधी बांधला बंधारा, वऱ्हाडी मंडळींनी केले श्रमदान, नंतर शुभमंगल सावधान!

Highlightsधान्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षतांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आल्या.

राजेश शेगोकार

ते दोघे उच्चशिक्षित, पण गावात जाऊन काम करण्याचं स्वप्न सोबत घेऊन त्यांनी सहजीवनाला साधेपणाने प्रारंभ केला.
ताे कृषी पदवीधारक आणि ती आयटी इंजिनिअर. सामाजिक कामांचा त्यांचा अनुभवही दांडगा. दोघांचं घराणंही नावाजलेलं. लग्नात भरपूर खर्च करत टोलेजंग लग्न करणं त्यांना शक्य होतं, मात्र त्यांनी ठरवलं लग्नात अनावश्यक रुढी, खर्च, बडेजाव टाळायचा आणि त्याऐवजी आठवण म्हणून काहीतरी खास करायचे. म्हणून मग त्यांनी सातपुड्याच्या कुशीत असलेल्या सालईबन या श्रमसंस्काराच्या स्थळी वनराई बंधारा बांधला, वऱ्हाडीही कामात सहभागी झाले आणि त्यानंतर निर्सगाच्या साक्षीने त्यांनी भारतीय संविधानावर हात ठेवून एकमेकांना सहजीवनाची वचनं दिली. बुलडाण्याच्या संग्रामपूर या आदिवासीबहूल तालुक्यातील पळशी झाशी गावातील प्रताप गुलाबराव माराेडे अन् आंबेजाेगाई तालुक्यातील उजनी गावच्या पद्मजा प्रदीपराव कवडे या दाेघांच्या लग्नाची ही गाेष्ट.

प्रतापने उच्च शिक्षण पूर्ण करून शेतीतच करिअर करायचं ठरवलं. सेंद्रिय विषमुक्त शेती करणारा, शेतमाल अडतीत न पाठवता स्वतः बाजारात जाऊन मार्केटिंग करणारा, दिल्लीच्या शेतकरी आंदाेलनासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा हा कार्यकर्ता. तर, पद्मजा आयटीत उत्तम पॅकेज देणारी नोकरी पुण्यात करत होती. मात्र, तिनंही गावाकडे चला, म्हणत नवीन जीवनशैली स्वीकारली. पानी फाउंडेशनचं काम करत असताना ते दोघे भेटले.
मात्र, लग्नसोहळाही त्यांनी पारंपरिक पद्धतीनं केला नाही. त्यासाठीही त्यांनी कल्पक, वेगळे काही ठरवले. बाबा आमटे यांच्या तालमीत अन् संस्कारात वाढलेल्या मनजितसिंग सिख यांनी सातपुड्याच्या कुशीत आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञातील आणि महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या जमिनीवर सालईबन नावाचे नवे श्रम नंदनवन फुलवले आहे. येथेच श्रमदान करून निर्सगाच्या साक्षीने हा विवाह करण्याचा प्रताप आणि पद्मजाने ठरवले. प्रतापचे वडील गुलाबराव माेराेडे हे अतिशय प्रयाेगशील शेतकरी त्यांनी तत्काळ या अभिनव विवाहाची अट मान्य करून माेजक्याच लाेकांच्या उपस्थितीत विवाहाला संमतीही दिली. सातपुड्याचे जंगल, शेती, आदिवासी पाडे, वन्यजीवांचा अधिवास अशा चहूबाजुंनी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात लग्न लागण्यापूर्वी वर - वधू आणि वऱ्हाडी मंडळींनी श्रमदान करून दोन बंधारे बांधले. तब्बल २ तास श्रमदान करून हे जोडपं मांडवात पोचलं.

दोघांची वरात दमणीमध्ये (छोटी बैलगाडी) काढली. धान्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षतांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आल्या. झाडांच्या बिया, भाजीपाल्याच्या बियाण्यांचे कागदी पाकिटं उपस्थितांना देण्यात आले आणि त्यांनर संविधानाच्या साक्षीने आणि हातात तिरंगा ध्वज घेत या दोघांनी एकमेकांना सहजीवनाचे वचन दिले. राष्ट्रसंत तुकडाेजी महाराजांनी नियुक्त केेलेल्या प्रचारकांपैकी एक असलेले आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी स्वत: गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीचे मंगलाष्टके म्हटली. लग्नमंचावर शेती अवजारे, जाते पाटे, उतरंड, तांब्याची भांडी, असं रुखवत मांडण्यात आलं होतं.
रुढी-परंपरा खर्च यांना फाटा देत असा हा विवाह संपन्न झाला.

Web Title: Dam built first, then marriage, story of a simple and social awareness wedding.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.