Lokmat Sakhi >Relationship > लग्नानंतर मुलीच्या पगारावर हक्क कोणाचा? तिचा स्वत:चा? सासरच्यांचा की माहेरच्यांचा?

लग्नानंतर मुलीच्या पगारावर हक्क कोणाचा? तिचा स्वत:चा? सासरच्यांचा की माहेरच्यांचा?

Daughter's Money Who Has The Right To Use It : घर दोघांचं असतं त्यामुळे दोघांनी विचारपूर्वक संवादातून आर्थिक प्रश्न सोडवायला हवेत. आर्थिक कौटुंबिक निर्णयात समंजसपणा महत्त्वाचा.

By manali.bagul | Published: January 24, 2023 11:03 AM2023-01-24T11:03:43+5:302023-01-24T11:18:36+5:30

Daughter's Money Who Has The Right To Use It : घर दोघांचं असतं त्यामुळे दोघांनी विचारपूर्वक संवादातून आर्थिक प्रश्न सोडवायला हवेत. आर्थिक कौटुंबिक निर्णयात समंजसपणा महत्त्वाचा.

Daughter's Money Who Has The Right To Use It : What women can do when in-laws want to take away salary | लग्नानंतर मुलीच्या पगारावर हक्क कोणाचा? तिचा स्वत:चा? सासरच्यांचा की माहेरच्यांचा?

लग्नानंतर मुलीच्या पगारावर हक्क कोणाचा? तिचा स्वत:चा? सासरच्यांचा की माहेरच्यांचा?

मनाली बागुल

''तीच्या पगाराचं ती काय करते काय माहीत, अख्खा माहेरच्यांना देते की काय,'' असा संवाद अनेकदा तुमच्या कानी पडला असेल. लग्नानंतर मुली त्यांच्या पगाराचं काय करतात. त्यांच्या पगारावर अधिकार हा प्रश्नच खरंतर उपस्थित व्हायला नको. कमावत्या मुलीने आपल्या पगाराच्या पैशांचं काय करावं हा निर्णय सर्वस्वी तिचा असायला हवा. पण अजूनही आपल्याकडे महिलांना अर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक निर्णय अधिकार कमी दिसतात. (Daughter's Money Who Has The Right To Use It)

नवऱ्याला विचारल्याशिवाय अनेक कमावत्या मुली पैसे खर्च करु शकत नाहीत किंवा विचारुन करतात. माहेरी आर्थिक मदत करणं हा अनेकींसमोर मोठा प्रश्न असतो. लग्नानंतर माहेरचेही अनेकदा मुलीकडून पैसे घ्यायला नाही म्हणतात. असा हा केवळ आर्थिक नाही तर सामाजिक, कौटुंबिक, खासगी नाजूक प्रश्न आहे आणि तो समजूतीने सोडवला तर नाती आणि मायाही टिकेल आणि पैसा कडवटपणाही आणणार नाही.

पगारावर हक्क 'ती'चा स्वत:चा!

स्त्रीवादी कार्यकर्त्या शुभा प्रभू साटम सांगतात,  ''पगारावर हक्क कमावणाऱ्या व्यक्तीचाच असतो. स्त्रीनं आपला पगार सासरच्यांना द्यावा किंवा माहेरी आईला द्यावा याचे तिला पूर्णपणे व्यक्ती स्वातंत्र्य आहे. माहेरची, सासरची आर्थिक परिस्थिती कशी आहे त्यानुसार निर्णय घ्यायला हवा. त्यात अन्य कोणीही ढवळाढवळ करता कामा नये. कारण पगारावर पूर्णपणे तिचा हक्क असल्यानं तिनं त्या पगाराचं काय करायचं हे ठरवण्याचा तिला अधिकार आहे. अर्थात घरातली आर्थिक परिस्थिती, जबाबदारी लक्षात ठेवून त्या त्या व्यक्तीनं समंजसपणे निर्णय घ्यावा. पण सून घरात आली म्हणजे तिचा पगार फक्त आपल्या घरी यायला हवा ही अतिशय पितृसत्ताक मनोवृत्ती आहे. समंजस संवादातून याविषयी घरात चर्चा व्हायला हवी.

घटनेनं दिलेल्या स्वातंत्र्यानुसार त्या व्यक्तीच्या (स्त्री असो किंवा पुरूष) पगाराबद्दल इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. अर्थात सामंजस्यानं ठरवलं तर बरेच वाद मिटू शकतात. कारण मुलीवरही तिच्या आईवडिलांची जबाबदारी असू शकते. म्हणून नवरा बायकोनं समजूतदारपणे पगाराचं काय करायचं ते ठरवायला हवं. ''लग्न कसं करायचं, डेस्टिनेशन वेडींग हौसेच्या नावाखाली मेहेंदी, महागड्या साड्या अशा फालतू गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा असे मुद्दे जर लग्नाच्या आधी सोडवले तर पुढचे कलह मिटू शकतात.' (Daughter's Money Who Has The Right To Use It)

पगाराबाबत प्रत्येक गोष्टीत वाद न घालता आपल्या कौटुंबिक स्थितीनुसार निर्णय घ्यावा. जर नवरा सगळ्या जबाबदाऱ्या उचलत असेल, दोघांच्या संसाराला गरज असेल तर समजूतीने आर्थिक भार मुलीनेही उचलायलाला हवा. कारण ती त्या घरात राहत असल्यानं तिचासुद्धा तितकाच आर्थिक सहभाग असायला हवा. माझं घर, कर्जाचे हप्ते, आजारपण, मुलांची शिक्षणं या गोष्टी लक्षात घेत पगाराचं काय करायचं ते ठरवावं.''

मुलीचं घर कोणतं?

महिलांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या वंदना खरे सांगतात, ''मुलांच्या पगारावर हक्क कोणाचा असा वाद कधीच निर्माण होत नाही. कारण मुलं स्वत:चं घर सोडून दुसऱ्याच्या घरी राहायला जात नाही. जर मुलं ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरी राहायला गेली असती तर त्याच्याबाबतीतही हाच प्रश्न उपस्थित झाला असता. लग्नाआधी जर मुलगी म्हणाली, मला डान्स शिकायचं, सिनेमात काम करायचं, तर तिला सांगतात तू तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर काय हवं ते कर. ती सासरी गेल्यानंतर मला साडी घ्यायचीये, प्रवासाला जायचं असं काही म्हणाली तर ते म्हणतात हे सगळं इथे चालायचं नाही. तुझ्या घरी हवं ते कर अशी उत्तरं मिळतात. 

यात मुलीचं स्वत:चं घर कोणतं? हा प्रश्न पडतो. एक तर तिला सासर असतं किंवा माहेर असतं, म्हणून असे प्रश्न तयार होतात. तिला तिच्या इच्छेनुसार दोन्ही घरांमध्ये पगार देता यायला हवा किंवा स्वत:वरही तिनं तिच्या इच्छेनुसार खर्च करावा. हे नवरा बायकोनं मिळून ठरवायला हवं. अनेक महिलांना नवऱ्याचा खरा पगार किती, तो कुठे गुंतवणूक करतो याबद्दल माहिती नसते आणि त्यांचा पत्नीच्या पगारवर हक्क दाखवण्याची तयारी असते ते खूपच चुकीचं आहे. वास्तविक दोघांमधल्या नात्यातील विश्वास यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

Web Title: Daughter's Money Who Has The Right To Use It : What women can do when in-laws want to take away salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.