डाएटिंग हा विषय अनेकजण कपडे बदलावेत त्याप्रमाणे सहज बदलतात. समाजमाध्यमांवरुन डाएटिंगबाबतीत रोज काहीतरी फाॅरवर्ड होत असलेल्या मेसेजेसना फाॅलो करुन डाएटिंग करणाऱ्यांची संख्या खूप आहे. केवळ मुलं, मुली, तरुण - तरुणी, स्त्री-पुरुष, नवरा बायको या सगळ्या गटात हे फॅड डाएटिंगचं प्रमाण वाढलं आहे. पण या फॅड डाएटिंगचा परिणाम आरोग्यावर तर होतोच शिवाय नातेसंबंधांवर देखील होतोच. आपल्या जोडीदाराचा राग यावा, चिड यावी इतका अतिपणा डाएटिंगच्या बाबतीत होतो. तारक मेहता या मालिकेतील अंजली आणि तारक यांची जोडी बहुतेकांना माहिती असेल .. अंजलीचे डाएटिंग नियम तारकला खाण्याचा आनंदच घेऊ देत नाही. फिटनेस ही खरंतर वैयक्तिक बाब. जर ते जोडीदाराच्या सोबतीनं होत असेल तर त्या दोघांपुरती, कुटुंब मिळून फिटनेसचे नियम पाळत असतील तर त्या कुटुंबापुरता हा विषय सीमित असतो. पण अंजलीचे डाएटिंग रुल , त्याचा तारकवरचा दबाव, खाण्यापिण्याच्या बाबतीत तिचा तारकवरील वाॅच आणि वचक हा थट्टेचा आणि तारकसाठी वैतागाचा विषय झालेला आहे. तारक आणि अंजलीसारखी पात्रं केवळ मालिकांमध्येच भेटतात असं नाही, तर ती आजूबाजूला प्रत्यक्षात असतात, म्हणून ती मालिकांमध्ये दिसतात एवढंच. प्रेमाआधी, लग्नाआधी जर ह्याचं किंवा हिचं डाएट फॅड आपल्याला माहिती असतं, तर आपण तिच्याशी किंवा त्याच्याशी लग्नंच केलं नसतं, अशा वैतागाच्या स्वरातल्या प्रतिक्रिया अनेकजण वैयक्तिक जीवनात व्यक्त करतात. इतरांना हसू येत असलं तरी डाएटिंग फॅडमुळे त्या व्यक्तींना काय सहन करावं लागतं हे त्यांचं त्यांनाच माहिती.
Image: Google
जोडीदाराच्या डाएटिंग फॅडमुळे नंतर नात्यात वैताग येऊ नये यासाठी आधीच 'ॲलर्ट' असायला हवं यासाठी 'व्हॅलेन्टाइन्स डे'च्या निमित्ताने स्टार आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी तरुण तरुणींना एक सल्ला दिला आहे. ' डाएट करणाऱ्या मुलासोबत/ मुलीसोबत लग्न करु नका.. अशा डाएट करणाऱ्या मुला मुलींना चुकीच्या गोष्टींवर फोकस करण्याची सवय होते, जी नात्यात , नात्यातील आनंदात पुढे वैताग निर्माण करते. ' ऋजुता दिवेकर यांच्या या ट्वीटमुळे डाएट आणि रिलेशनशिप या विषयाची चर्चा होते आहे. आनंदी नात्यात डाएटच्या चुकीच्या सवयी, फॅड डाएटमुळे संघर्ष निर्माण होतात याल स्वत: अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी देखील दुजोरा दिला आहे.
Don’t marry a guy/ gal who’s on a diet. Wrong cheezo pe focus karne ki aadat si ho jati hai unko.#ValentinesDay2022
— Rujuta Diwekar (@RujutaDiwekar) February 14, 2022
डाएट आणि फिटनेसचा संबंध सहजरित्या जोडला जातो. पण फॅड डाएटिंगमुळे फिटनेसचं लक्ष गाठलं जात नाही. डाएटिंग करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करु नये असा सल्ला देणाऱ्या ऋजुता दिवेकरांच्या ट्विटवर म्हणजे नात्यात फिटनेसला महत्त्वच नाही का? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर स्वत: ऋजुता दिवेकरांनी चुकीच्या डाएट म्हणजे फिटनेस नव्हे हे उत्तर केव्हाच दिलेलं आहे. डाएट जर पाळणार असू तर ते तज्ज्ञांच्या सल्ल्याने पाळायला हवं. डाएट हे नात्याला पूरक असावं, मारक नसावं असं तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
डाएट आणि रिलेशनशिप
1. डाएटिंग आणि नातेसंबंध या विषयावर झालेला अभ्यास सांगतो की, फिटनेसमुळे नात्यातील आनंद नक्कीच वाढतो. योग्य आणि तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे डाएटिंग करणं योग्य. फिटनेस ही नवरा किंवा बायको/ प्रियकर किंवा प्रेयसी अशी कोणा एकाची गरज नसते. ती दोघांची गरज असते. दोघं मिळून जेव्हा डाएटिंग करतात, फिटनेस रुल ठरवून एकमेकांच्या मदतीनं आणि सोबतीनं पाळतात तेव्हा त्याचा परिणाम वैयक्तिक स्तरावर आणि नात्याच्या पातळीवर अनुभवायला मिळतो.
Image: Google
2. दोघांनी मिळून डाएटिंग करताना ते सोबतीनं करावं पण त्यात स्पर्धा नसावी. माझ्यापेक्षा ह्याचं/ हिचं वजन कमी झालं म्हणून वाईट वाटून घेतल्यास, या गोष्टीकडे स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास त्याचा परिणाम नात्यावर होतो.
Image: Google
3. दोघांनी मिळून डाएटिंग करताना स्पर्धकाच्या भूमिकेतून बाहेर पडून एकमेकांकडून प्रेरणा घेण्याच्या भूमिकेत शिरलं तर त्याचा फायदा होतो असं तज्ज्ञ म्हणतात. त्यासाठी आपला जोडीदार डाएटिंग करताना आपल्यासासरखा चीट डे त्याच्या डाएटिंगमध्ये नसतो किंवा सर्व पदार्थांचा आनंद घेत असतांना कुठे किती मर्यादा घालावी यासंबंधीचे त्याचे/ तिचे नियम फार भारी आहेत, आपल्यालापेक्षा तो किंवा ती आहारात भाज्या जास्त खाते/ खातो तसं आपल्यालाही जमायला हवं असं म्हणत प्रयत्न केल्यास त्याचा चांगला परिणाम वैयक्तिक आणि नात्याच्या पातळीवर दिसून येतो. जोडीदारशी डाएटिंग आणि फिटनेसबाबत स्पर्धा करुन नव्हे तर प्रेरणा घेऊन नियम पाळावेत असं तज्ज्ञ म्हणतात. नात्यात याबाबात एकमेकांशी स्पर्धा असली तर नात्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.
Image: Google
4. मिळून डाएटिंग करताना थोडी मजा , एकमेकांना त्यांच्या त्यांच्या आवडीच्या पदार्थांची ट्रीट देणं हा सोबतीनं डाएटिंग करण्यातला आनंद आहे. तोंड पाडून, जिवावर येऊन, एकमेकांवर चिडून, चडफडत डाएटिंग करण्यापेक्षा हसत खेळत डाएटिंगचे नियम पाळायला हवेत. मजा ही जर थोड्या प्रमाणात असेल तर ती औषधासारखी काम करते, पण प्रमाणाबाहेर असेला तर त्याचं विष होतं, हा नियम डाएटिंगमधल्या मजेला लागू आहे असं तज्ज्ञ म्हणतात. एकमेकांच्या आवडी निवडी बघून तशी खाण्यापिण्याची ट्रीट दिली, कधी रोमॅण्टिक डिनर, सरप्राइज लंच प्लॅन केलं . मिळून स्वयंपाक करणं, एकमेकांचे आवडीचे पदार्थ स्वत: करणं अशा काही मजेदार गोष्टी केल्यास डाएटिंग करणं जिवावर येत नाही आणि आपण डाएटिंग आणि फिटनेसच्या बाबतीत आनंदानं एकमेकांसोबत आहोत असा मेसेज एकमेकांना मिळून हुरुप वाढतो.
Image: Google
5. नात्यामध्ये एकमेकांच्या विचारांचा, मतांचा आदर करणं महत्त्वाचं असतं. हाच नियम सोबतीन डाएटिंग करतांनाही महत्त्वाचा आहे. दोन व्यक्तींचे डाएटिंग नियम कधीच सारखे नसतात. डाएटिंग हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, आरोग्य समस्यांनुसार ठरत असतं. त्यामुळे सोबतीनं डाएट करताना माझेच डाएटचे नियम महत्त्वाचे, कामाचे, परिणामकारक असं न म्हणता एकमेकांच्या डाएटिंगच्या नियमांबद्दल आदर असायला हवा. यात माझे तुझे असं न करता अभ्यासक एकमेकांना आपआपले डाएटिंग नियमांची आठवण करुन द्यावी, त्यासाठीचे बूस्ट द्यावे असं तज्ज्ञ म्हणतात. सोबतीनं डाएटिंग करताना डोक्यावर नियमांची तलवार नव्हे तर एकमेकांची आनंदी, हसत खेळत सोबत असली तर डाएटिंगमुळे नातं विस्कळित नाही तर चांगलं पक्कं होईल हे नक्की असं तज्ज्ञ म्हणतात.