नाते जोडणे हा माणसाचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे, हे नाते जसे माणसाशी जोडले जाते तसे ते प्राण्यांशीही जोडले जाते. मग हे नाते पाळीव प्राण्यांशी असले तर आणखीनच छान. पूर्वी माणूस आणि प्राणी सोबतच राहत असल्याचे आपल्याला माहित आहे. सुरुवातीला सामान वाहण्यासाठी गाढव, गाडी चालविण्यासाठी घोडा, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी मानाने जाण्यासाठी हत्ती किंवा शेतीसाठी बैल या प्राण्यांचा वापर होत होता. कामासाठी प्राणी वापरले जात असले तरीही त्यांच्यासोबत माणसाचे अतिशय जवळचे नाते होते. आपल्या घरातील एक सदस्य म्हणूनच या प्राण्याची देखभाल केली जात होती. अजूनही शहरात कुत्रा, मांजर आणि गावाकडे गायी, म्हशी, गुरे यांची तितक्याच आपुलकीने, प्रेमाने देखभाल केली जाते. बुद्धीच्या जोरावर माणसाने कितीही प्रगती केली असली तरी त्याचे प्राण्यांशी असणारे नाते आजही कायम आहे. मूल जन्माला आले की आपण त्याला भुभू, मनी माऊ, काऊ, चिऊ यांची ओळख करुन देतो आणि जेवताना किंवा अगदी खूप रडत असेल तर तो प्राणी दाखवतो. नकळत ओक्साबोक्शी रडणारे हे लहानगे पिल्लू शांत होते. आपल्या जन्मापासून आपली प्राण्यांशी झालेली ही ओळख हळूहळू वाढत जाते आणि अनेकदा प्राण्यांशी असणारे हे नाते दृढ होत जाते. याच प्रेमातून कधी कुत्रा, मांजर तर कधी काही पक्षी, मासे पाळले जातात. प्राण्यांनाही प्रेमाची आणि स्पर्शाची भाषा कळते असे म्हणतात. याचाच अर्थ प्राण्यांनासुद्धा त्यांचा स्वभाव असतो. आज जागतिक प्राणी दिनाच्या निमित्ताने माणूस आणि प्राणी यांच्या नात्यावर टाकलेला प्रकाश...
तुम्ही एखाद्या व्यक्तीवर ज्याप्रमाणे प्रेम करता तसेच प्रेम तुम्ही प्राण्यावरही करु शकता. ज्यांच्याकडे पाळीव कुत्रा किंवा मांजर आहे, ते या गोष्टीशी नक्की कनेक्ट होऊ शकतील. आपण त्या प्राण्याचा मालक नाही तर मित्र असायला हवे. मित्र म्हणून असणारे नाते त्याच्यापर्यंत पोहोचते आणि त्यानुसार तो प्राणी आपल्याशी वागू लागतो. हिंस्र प्राण्यांची आपल्याला भिती वाटते, पण या प्राण्यांशीही लहानपणापासून दोस्ती केली तर ते आपल्याला हिंस्र न वाटता पाळीव प्राण्यांसारखेच वाटू लागतील. दोन व्यक्तींच्या नात्यात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, ओलावा असतो त्याचप्रमाणे तो प्राण्यांमध्येही असतो. तुम्ही त्याला जितके प्रेम, माया लावता तेवढाच तो प्राणीही तुमच्याशी जोडला जातो आणि नकळत तुमचा होऊन जातो.
प्राण्यांशी संवाद साधण्याच्या, त्यांच्याशी नाते दृढ करण्याचे काही सोपे मार्ग ...
१. तुम्हाला आवडत असलेल्या प्राण्याचे मनापासून निरीक्षण करा
२. तो प्राणी काढत असलेले वेगवेगळे आवाज लक्षपूर्वक ऐका
३. प्राण्यांशी शब्दाव्दारे किंवा शारीरिक हालचालींव्दारे जास्तीत जास्त संवाद साधायचा प्रयत्न करा.
४. त्या प्राण्याशी वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करा
५. त्याला जवळ घेऊन प्रेमाने गोंजारा
६. त्यांच्या आहाराबाबत योग्य ती माहिती घेऊ त्यांना आवडेल असे खायला द्या
७. त्यांची देहबोली समजून घेऊन त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद द्या
प्राण्यांसोबत असण्याचे काही फायदे...
१. पाळीव प्राणी आपल्या भावना बळकट करण्यास मदत करतात.
२. या प्राण्यांमुळे आपण जबाबदार होतो.
३. एकटेपणा दूर होण्यास मदत होते.
४. त्यांना फिरायला नेल्यास आपलाही नकळत व्यायाम होतो.
५. मानसिकरित्या सक्षम करण्यास मदत होते.
६. प्राण्यांसोबत असल्याने आपला वेळ छान जातो आणि आपण दिर्घकाळ आनंदी राहतो.