दिवाळी म्हणजे आनंदाची देवाण-घेवाण करण्याचा सण. दिवाळीच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांच्या घरी जेवायला जायचा प्लॅन करतात. फॅमिली गेट टू गेदर म्हणजे लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची दंगा-मस्ती, एकत्र जेवणे, हसणे-खिदळणे. यामुळे आपण खऱ्या अर्थाने फ्रेश होऊन जातो. नवनवीन कपडे घालून मिरवल्यावर मिळणारा आनंदही काही औरच असतो. हे सगळे जरी ठिक असले तरी एकमेकांच्या घरी जाताना काही गोष्टीं आवर्जून पाळायला हव्यात. यामुळे हा सण खास तर होईलच आणि आपण नेहमीपेक्षा अधिक आनंद वाटू शकू. पाहूयात काही सोपे एटीकेटस...
१. उशीर करु नका - कोणाच्या घरी जायचे असल्यास ठरलेल्या वेळेत पोहोचा. अन्यथा इतर लोक तुमची वाट पाहून कंटाळून जाऊ शकतात. त्यामुळे कपडे, कसे जायचे, सोबत काय न्यायचे याबाबतचे प्लॅनिंग आधीपासून करुन ठेवा. म्हणजे ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही.
२. शक्यतो प्रत्येकाने एक पदार्थ न्या - कोणाच्याही घरी जेवणाचा बेत ठरला असेल तर एकतर जेवण ऑर्डर करा. लहान मुले आणि इतर काही कारणाने बाहेरचे खायचे नसेल तर प्रत्येकाने एक एक पदार्थ करुन आणायचे ठरवा. जेणेकरुन कोणालाच लोड पडणार नाही आणि ज्यांच्या घरात कार्यक्रम आहे तेही सगळ्यांसोबत एन्जॉय करु शकतील.
३. खाऊ घेऊन जा - ज्यांच्या घरी जाणार आहात त्यांच्या घरी दिवाळीचा फराळ किंवा त्यांना आवडणारे असा काही कोरडा खाऊ, फळे आवर्जून घेऊन जा. यामुळे घरातील व्यक्तींना तुमच्याबद्दल आपुलकी तर वाटेलच आणि त्यांच्या आवडीचा खाऊ पाहून लहान मुलेही तुमच्यावर खूश होतील.
४. दिवाळीसाठी लहान-मोठे गिफ्ट द्यायला विसरु नका - दिवाळीत एकमेकांकडे जाताना एखादे लहानसे गिफ्ट न्यायला विसरु नका. अगदी पणत्या, एखादा शओ पिस, परफ्यूम किंवा किचनमध्ये उपयोगी येईल अशी एखादी वस्तू असे काहीही घ्या. पण दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही एखादी लहानशी भेटवस्तू एकमेकांना नक्की देऊ शकता. यामुळे तुमच्यातील प्रेम वाढायला नक्की मदत होईल.
५. सकारात्मक बोला - दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना भेटल्यावर कोरोना, आजारपणे, गेलेल्या व्यक्तींच्या आठवणी असे विषय शक्यतो टाळा. यामुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडू शकते. त्यामुळे शक्यतो सकारात्मक गोष्टींवर बोला. त्यामुळे सगळ्यांचाच मूड फ्रेश राहायला मदत होईल.
६. न आलेल्या व्यक्तींबद्दल बोलणे टाळा - आपण नातेवाईक किंवा एखादा ग्रुप भेटलो की जे सोबत नाहीयेत त्यांच्याबद्दल बोलतो. पण अशाप्रकारे जे उपस्थित नाहीत त्यांच्याबद्दल बोलल्याने आपली विनाकारण एनर्जी जाते. त्याचा काहीच फायदा होत नाही. तेव्हा अशा निरर्थक विषयांवर बोलणे शक्यतो टाळलेलेच बरे.