लग्न म्हणजे जोडीदारासोबत नव्याने आयुष्याची सुरूवात, आयुष्याचा नवीन प्रवास असे म्हटले जाते. लग्नानंतर होणारे शारीरिक संबंध हे अनेकार्थाने महत्त्वाचे असतात. मानसिक स्थिरता, शारीरिक गरज, हार्मोन्सचे संतुलन अशा सगळ्यासाठीच नवरा-बायकोमध्ये शारीरिक संबंध चांगले असणे आवश्यक असते. मात्र लग्न होऊ घातलेल्या किंवा नव्याने लग्न झालेल्या तरुणांना शारीरिक संबंधांबाबत अनेक प्रश्न असतात. आठवड्यातून किती वेळा सेक्स केलेला चांगला, सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती, कशा पद्धतीने सेक्स केला तर आपल्याला जास्त आनंद मिळू शकतो अशा प्रकारच्या प्रश्नांचा त्यामध्ये समावेश असतो. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा प्रश्न बहुतांश तरुणींना पडतो, तो म्हणजे लग्नानंतर नियमित सेक्स केल्याने आपले वजन खूप वाढले आहे असे अनेकींना वाटते. आता यामध्ये खरंच काही तथ्य आहे का हे समजून घेणे महत्त्वाचे आहे (Does Daily Intercourse After Marriage Make Women Gain Weight Sexologist Says).
सेक्स आणि वजन वाढणे यांचा काय संबंध?
याबाबत प्रसिद्ध लैंगिक व वैवाहिक तज्ज्ञ डॉ. लीना मोहोडीकर सांगतात, स्त्रीयांचे वजन वाढण्याचा लैंगिक संबंधांशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. योग्य आहार, व्यायाम यांचे संतुलन असेल तर वजन नियंत्रणात राहू शकते. वजन वाढण्याचा कोणत्याही एकाच गोष्टीशी संबंध लावता येत नाही. वजन ही व्यक्तीगत, जीवनशैली, अनुवंशिकता यांच्याशी निगडीत गोष्ट आहे. तसेच स्त्रियांमध्ये वजन वाढण्याचं कारण पीसीओडी, प्रीमॅच्युअर मेनोपॉज किंवा आणखी काही असू शकते. त्यामुळे सरसकट नियमित सेक्समुळे वजन वाढते असे आपण म्हणून शकत नाही. वजन वाढण्यामागे आरोग्याच्या काही समस्या, मानसिक ताणतणाव यांसारख्या अनेक गोष्टी कारणीभूत असतात. मात्र एखाद्या स्त्रीचे वजन कोणत्याही कारणांनी कमी होत असेल तर ती नक्कीच चिंताजनक बाब आहे हे लक्षात घ्यायला हवे.
शारीरिक संबंधांचे फायदे काय...
आपल्याकडे अनेकदा चर्चांमधून किंवा गप्पा-गोष्टींतून आरोग्याबाबतचे गैरसमज पसरवले जातात. त्यामुळे लग्नानंतर नियमित सेक्स केल्याने वजन वाढते हाही असाच एक गैरसमज आहे. त्याला कोणताही ठोस पुरावा किंवा संशोधनाचा संदर्भ नाही. शारीरिक संबंधांमध्ये समतोल असणे आवश्यक असते. प्रसिद्ध लैंगिक तज्ज्ञ डॉ. सुधीर सोनटक्के सांगतात, शारीरिक संबंधांमुळे ऑक्सिटोसिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनची निर्मिती होते, या हॉर्मोनमुळे आपल्याला मानसिक समाधान आणि पर्यायाने मानसिक शांती मिळण्यास मदत होते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. उदासिनता, नैराश्य कमी होऊन आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढते.मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर शारीरिक संबंधांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. रक्तदाब कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, त्वचा उजळ होणे हेही फायदे दिसून येतात.
वयानुसार शारीरिक संबंधांचे प्रमाण किती असावे?
साधारणपणे चाळीशीच्या आत जोडप्यांमध्ये आठवड्यातून किमान १ ते २ वेळा शारीरिक संबंध येणे, चाळीशीनंतर आठवड्यातून किमान १ वेळा आणि वयाच्या साठीनंतर दोन आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध असायला हरकत नाही. मात्र याचे प्रमाण व्यक्तींनुसार बदलू शकते, पण त्याचा समतोल साधणे आवश्यक आहे.