गौरी पटवर्धन
‘सुपरवुमन सिंड्रोम’ हा शब्द शहरी आणि त्यातही कमावत्या महिलांच्या संदर्भात अनेक वेळा वापरला जातो. त्याचा सर्वसाधारण अर्थ असा की, जीवनाच्या प्रत्येक भागात सर्वोत्तम होण्यासाठी, परफेक्ट होण्यासाठी धडपडणारी स्त्री. म्हणजे, अशी एखादी स्त्री, जी म्हणते की मी नोकरी करत असले तरी घरच्यांना काही कमी पडू देत नाही आणि कामाच्या ठिकाणी असं म्हणते, की माझी मुलं जरी लहान असली किंवा माझ्या घरी इतर काहीही अडचण असली तरी त्याचा मी माझ्या कामातल्या परफॉर्मन्सवर काहीही परिणाम होऊ देणार नाही. “मी माझ्या परफॉर्मन्सबाबत घरातही कुठली तडजोड करणार नाही आणि कामाच्या ठिकाणीही कुठली तडजोड करणार नाही.” असं म्हणणाऱ्या बाईला सुपर वुमन सिंड्रोम आहे, असं सर्रास म्हटलं जातं.
आता हे वर्णन ऐकल्यावर कुठल्याही बाईच्या डोळ्यांसमोर असं करणाऱ्या अनेक स्त्रिया उभ्या राहतील. इतकंच नाही, तर थोडा विचार केल्यावर असं वाटेल की आपल्या आजूबाजूच्या घराबाहेर पडून अर्थार्जन करणाऱ्या बहुतेक सगळ्या स्त्रिया याच प्रकारात मोडतात. अर्थात आपलं वाटणं हे केवळ वाटणं असतं, त्याला कुठल्याही अभ्यासाचं किंवा आकडेवारीचं पाठबळ नसतं. पण, या बाबतीतल्या या वाटण्याला मात्र भारतातल्याच एका सर्व्हेचं पाठबळ मिळालेलं आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या बहुतेक स्त्रिया या सुपर वुमन सिंड्रोमने ग्रस्त आहेत हा आपला अंदाज अभ्यास आणि आकडेवारीतून खरा ठरलेला आहे. हा अभ्यास असं सांगतो, की घराबाहेर पडून कमावणाऱ्या ७२ टक्के स्त्रियांना सुपर वुमन सिंड्रोम आहे. सौराष्ट्र विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच समोर आले आहेत. अर्थात भारताच्या कुठल्याही भागात आणि कितीही महिलांना घेऊन हे सर्वेक्षण केलं तरी ही आकडेवारी फारशी बदलण्याची शक्यता नाही असं वाटावं असंच आपल्या अवतीभोवतीचं चित्र आहे.
(Image : Google)
असं का व्हावं?
बायका सगळीकडे परफेक्ट होण्याचा का प्रयत्न करतात?
त्या स्वतःला जास्त शहाण्या समजतात का?
कुठलंच काम आपल्याइतकं भारी कोणी करू शकत नाही असं त्यांना वाटतं का?
त्यांना यातून नेमकं काय सिद्ध करायचं असतं? आणि कोणासमोर?
- असे प्रश्न विचारून जणू काही बायकांना हा सिंड्रोम स्वतःवर ओढवून घ्यायला आवडतो आणि त्या दीडशहाण्या असल्यामुळे असं करतात अशी लेबलं कळत-नकळत लावली जातात. पण, या सुपर वुमन होण्याच्या मागे खरंच महिलांची ‘क्रेडिट मिळवण्याची’ इच्छा असते का? का ही त्या बायकांची मजबुरी असते?
कुठल्याही नोकरी करणाऱ्या स्त्रीला विचारा, सासरी गेल्यावर नोकरी करण्याची परवानगी मिळवण्याची पूर्वअट काय असते? तर “घरचं सगळं व्यवस्थित कर आणि मग तुला काय हवं ते कर.” आता घरचं सगळं व्यवस्थित म्हणजे काय? तर रोजचा स्वयंपाक, सणवार, आजारपणं, मुलांच्या शाळा, ज्येष्ठ नागरिकांची काळजी, कुळधर्म-कुळाचार, लग्न आणि इतर समारंभ वगैरे वगैरे... इथे कुठेही कमी पडणं त्या महिलेला परवडत नाही. कारण आपल्याकडे कितीही कर्तृत्ववान स्त्री असली तरी तिची किंमत याच निकषांवर केली जाते.
एखादीने सासरच्या नात्यातली दोन-तीन लग्न चुकवली की लगेच कुचकुच सुरू होते, “ती कशाला येईल आता? मोठी सायबीण आहे. बक्खळ कमावते.”
मुलांना शाळेत मार्क्स कमी पडले किंवा महिन्यातले दोन-चार दिवस उशीर झाला, “आई नोकरी करते ना, मुलांची आबाळ होते बिचाऱ्यांची..”
सासूसासरे दोन वेळा दवाखान्यात दोघेच गेले, की “एवढी शिकलेली सून आहे; पण, उपयोग काय? म्हातारपणी दोघं एकटेच जातात बिचारे.”
कुळधर्म - कुळाचार तर करावेच लागतात. सण तर करावेच लागतात. नाहीतर, उपयोग काय त्या बाईचा?
घरी हे असं असतं, तर ऑफिसमध्ये कधीही सुट्टी मागितली की, “म्हणून लेडीज स्टाफ घ्यायलाच नको,” असा सूर कुठूनतरी कानावर येतो. ऑफिसमधली महिला कर्मचारी जाताना अगदी घड्याळाच्या काट्यावर बाहेर पडली की मागे थांबून रेंगाळून काम करणाऱ्या पुरुष सहकाऱ्यांच्या पोटात दुखतं. मग, प्रमोशन, अप्रायझल या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो. ते टाळण्यासाठी उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं तर घरी जाऊन स्वयंपाक, मुलांचा अभ्यास हे सगळं समोर दिसत असतं. बरं नोकरी सोडून द्यावी म्हटलं तरी ते शक्य होत नाही. एक तर आत्ताच्या काळात एका माणसाच्या पगारात घर चालवता येत नाही आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे इतकी वर्षं इतका अभ्यास करून, अनुभच घेऊन ठेचा खाऊन त्या महिलेने काहीतरी करिअर उभं केलेलं असतं, ते असं कोण सुखासुखी सोडून देईल? आणि का द्यावं?
(Image : Google)
चक्रव्यूहच हे..
लग्न झालं की नोकरी किंवा व्यवसाय करणारी महिला या सगळ्या प्रश्नांच्या चक्रव्यूहात अलगद फसत जाते आणि मग त्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच रस्ता तिच्यासमोर उरत नाही. सकाळी गाजर लावून अपुऱ्या झोपेत उठून चहाचं आधण ठेवण्यापासून ते रात्री सगळे झोपल्यानंतर किचन ओटा आवरून दुसऱ्या दिवशीसाठी कडधान्य किंवा साबुदाणा भिजवून झोपण्यापूर्वी एकदा कामाच्या ईमेल्स चेक करणं याच चक्रात तिचं आयुष्य गोल गोल फिरत राहतं.
यातल्या कुठल्याच आघाडीवर कमी पडण्याची चैन तिला परवडत नाही. तशी सोय तर अजिबात नसते. करिअरमध्ये हातातल्या संधी निसटून जाण्याचं भय आणि घरात तिने न केलेली कामं दुसरं कोणीही करत नाही. ती नंतर तिलाच करावी लागतात. मग, अशा वेळी तिच्यासमोर सुपर वुमन होण्यापलीकडे दुसरा पर्याय तरी काय उरतो?
(मुक्त पत्रकार)
patwardhan.gauri@gmail.com