Join us  

सेक्सनंतर थकवा येतो, खूप झोप येते? असे का, कारण तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2022 12:14 PM

काहींना संबंधांनंतर खूप उत्साही वाटू शकते, तर काहींनी थकवा आणि झोप असह्य होते त्यामागची कारणे आणि त्याचे शास्त्रीय कारण सांगत आहेत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के...

ठळक मुद्देताण कमी झाल्याने आपल्याला शांत वाटते आणि त्यामुळेही झोप येतेआरोग्याच्या इतरही काही तक्रारी असतील तर शारीरिक संबंधांनंतर आपल्याला जास्त थकवा येतो

शारीरिक संबंध हे आपल्याला आनंद देणारे असतात त्याचप्रमाणे ते काहीसे थकवणारेही असतात. अनेकदा शारीरिक संबंधांनंतर काहींना खूप थकवा येतो किंवा झोप येते. जोडीदारापैकी दुसऱ्याला संबंधांतून आनंद मिळाला नसेल तर दुसऱ्यांदा शारीरिक संबंध करण्याची इच्छा असते. पण असे असताना जोडीदार मात्र थकलाकिंवा झोपून गेला तर आपला हिरमोड होतो. आता अशाप्रकारे संबंधांनंतर झोप येणे किंवा थकवा येणे सामान्य आहे का असा प्रश्न अनेकदा जोडप्यांकडून विचारला जातो. मात्र अशी झोप येणे हे अगदी सामान्य असून प्रत्येकामध्ये या झोपेची आणि थकव्याची तीव्रता कमी जास्त असते. काहींना संबंधांनंतर खूप उत्साही वाटू शकते, तर काहींनी थकवा आणि झोप असह्य होते त्यामागची कारणे आणि त्याचे शास्त्रीय कारण सांगत आहेत प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के...

(Image : Google)

१. शारीरिक संबंध हे व्यायामासमान

शारीरिक संबंध म्हणजे शरीराची होणारी हालचाल ही व्यायामाप्रमाणे असते. त्यामुळे शारीरिक संबंधांनंतर आपल्याला व्यायाम झाल्यावर ज्याप्रमाणे थकवा येतो तसा थकवा येऊ शकतो. यामध्ये शरीर आणि मन दोन्हीही तृप्त झाल्यानेही एकप्रकारचा शांतपणा येतो आणि थकल्यासारखे वाटून झोप येते. अशाप्रकारे झोप येणे हे अतिशय सामान्य असल्याचे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. 

२. दिवसभराचा थकवा 

साधारणपणे आपण शारीरिक संबंध हे रात्री झोपायच्या वेळेला करतो. सध्या जोडीदारांपैकी दोघेही नोकरी करत असल्याने नोकरीतील ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या या गोष्टींमुळे दोघेही थकलेले असू शकतात. अशावेळी आधीच इतर गोष्टींचा थकवा आणि त्यात शारीरिक संबंध यांमुळे थकल्यासारखे होऊन झोप येऊ शकते. 

३. शारीरिकरित्या सक्षम नसणे 

शारिरिक संबंधांनंतर रक्ताभिसरण क्रियेचा वेग वाढतो. हार्मोन्समध्ये बरेच बदल होतात त्यामुळे झोप येणे स्वाभाविक असते. तसेच आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित तक्रारी किंवा आरोग्याच्या इतरही काही तक्रारी असतील तर शारीरिक संबंधांनंतर आपल्याला जास्त थकवा येतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला झोपही येते. 

(Image : Google)

४. हार्मोन्समध्ये होणारे बदल

शारीरिक संबंधांच्यावेळी मेंदूतून अनेक रासायनिक द्सुरव्रुये सोडली जातात. सेक्सच्या सुरुवातीला मेंदूतून टॉक्सिटोसिन हे संप्रेरक स्रवते. त्यामुळे आपल्या उत्तेजना वाढतात, तरतरी येते मात्र सेक्स करुन झाल्यानंतर हे संप्रेरक कमी होत जाते आणि त्यामुळे आपल्याला थकवा किंवा शीण आल्यासारखे वाटते. तसेच शारीरिक संबंधांमध्ये मेलॅटोनिन या संप्रेरकामुळे आपला ताण कमी होण्यास मदत होते. ताण कमी झाल्याने आपल्याला शांत वाटते आणि त्यामुळेही झोप येते.  

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक आरोग्य