साधारण १६- १७ वर्षांपुर्वीही ही गोष्ट. तेव्हा अगदी शाळकरी मुलींपासून ते वयस्कर आजींपर्यंत समस्त महिला वर्गाला एका मालिकेनी वेड लावलं होतं. लोकप्रियतेचे आणि टीआरपीचे सगळे उच्चांक मोडून काढणारी ही मालिका होती एकता कपूर निर्मित 'क्योंकी साँस भी कभी बहू थी...' या मालिकेपर्यंत छोट्या पडद्यावरच्या कोणत्याच मालिकेने आणि त्यातील कलाकारांनी एवढं अफाट यश मिळवलेलं नव्हतं. म्हणूनच तर या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या सध्याच्या केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांना आजही मंत्रीपेक्षा 'तुलसी' म्हणून ओळखणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे.
मालिकेत काम करण्यापूर्वी स्मृती इराणी यांना कुणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यातलं टॅलेन्ट ओळखलं आणि त्यांना संधी दिली ती एकता कपूर यांनी. असंच काहीसं एकता कपूर यांचंही होतं. अभिनेते जितेंद्र यांची लेक एवढीच त्यांची ओळख मर्यादित होती. पण या मालिकेनं मात्र त्या दोघींना एकत्र आणलं. मालिकेच्या निमित्तानं दोघींनी अनेक वर्षे एकत्र काम केलं. आता मालिका संपून देखील कित्येक वर्षे उलटून गेली आहेत. तरीही एक गोष्ट मात्र या दोघींमध्ये कायम राहिली. ती म्हणजे स्मृती इराणी आणि एकता कपूर यांची घट्ट मैत्री. खरंतर राजकारण किंवा अभिनय या दोन्ही क्षेत्रात अशी मैत्री टिकवणारे दोस्त खूप कमी आहेत. म्हणूनच तर या दोघींचा याराना उल्लेखनिय ठरतो.
एकता कपूर आणि स्मृती इराणी या दोघींच्या मैत्रीचे किस्से तर नेहमीच ऐकायला मिळतात. या दोघींच्या मैत्रीचा पुन्हा नव्याने उल्लेख करण्याचे कारण म्हणजे स्मृती इराणी यांनी एकता कपूर यांच्याविषयी शेअर केलेली एक पोस्ट. सोशल मिडियावर स्मृत इराणी नेहमीच खूप ॲक्टीव्ह असतात. देशभरातल्या घडलेल्या अनेक लहान- सहान गोष्टींचे पडसाद त्यांच्या पोस्टमधून उमटतात. मग ही घटना म्हणजे त्यांच्या जिवलग मैत्रिणीच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट. म्हणूनच तर स्मृती यांनी एक सुंदर पोस्ट शेअर करून मैत्रिणीविषयी आनंद व्यक्त केला.
त्याचं झालं असं की निर्माती एकता कपूर यांना नुकताच अतिशय सन्मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणारा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार स्विकारतानाचा एकता कपूर यांचा व्हिडियो स्मृती इराणी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या लाडक्या मैत्रिणीसाठी एक छानशी पोस्टदेखील लिहिली आहे.
या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, माझ्या मैत्रिणीला आपल्या देशाचा एवढा मानाचा पद्मश्री पुरस्कार घेताना बघणे ही खरोखर माझ्यासाठीच एक सन्मानाची गोष्ट आहे. आपलं स्वत:चं नाव, आपला ब्रॅण्ड, विश्वास आणि एवढं क्रियेटीव्ह जग निर्माण करायला एकताने खरोखरच खूप वर्ष मेहनत घेतली आहे. मग ते टीव्ही, ओटीटी किंवा चित्रपटांचं माध्यम असो. प्रत्येक क्षेत्रात ती चमकली. एकताने तिच्या कामाला आणि स्वत:ला नेहमीच पुन्हा पुन्हा तयार केलं, पुन्हा पुन्हा नव्याने घडवलं.. असं म्हणत त्यांनी My heartiest congratulations @ektarkapoor #proud #sisterlove ❤️ असा टॅग दिला आहे. त्या दोघींच्या नात्याला त्यांनी #sisterlove असं म्हंटलं आहे.
स्मृती इराणी यांच्या या पोस्टला एकता कपूर यांनीही तेवढाच उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्मृती इराणींच्या पोस्टला रिप्लाय करताना एकता म्हणाली की आपलं एकमेकींवरचं प्रेम असंच टिकून राहो. आतापर्यंत तु जे मिळवलं आहेस, ते खूप आहे. खूप प्रयत्न करूनही मला तु जे मिळवलं आहेस, त्याच्या निम्मच मिळवता आलं. You trailblazer असं म्हणत एकताने स्मृती इराणीच्या आजवरच्या वाटचालीचं कौतूक केलं आहे. एकमेकींना भरभरून दाद आणि तेवढाच उत्स्फुर्त प्रतिसाद देणारी ही मैत्री अशीच टिकून राहो....