Join us  

लै भारी दोस्ती! कधी भंकस कधी भक्कम साथ, श्रेया बुगडे सांगतेय, दोस्तीची गोष्ट

By manali.bagul | Published: November 26, 2021 5:33 PM

Friendship Story : स्पर्धेच्या जगातही टिकून असलेल्या सच्च्या मैत्रीची गोष्ट सांगतेय श्रेया बुगडे ! श्रेया- कुशल ही दोस्ती तुटायची नाय

मनाली बागुल

एखादा कार्यक्रम लोकप्रिय होतो आणि त्यात काम करणारे दोन कलाकार एकमेकांचे पक्के दोस्त होतात, परस्परांना साथ-प्रोत्साहन देत मैत्रीचं एक अतिशय सुरेख आणि भक्कम नातं त्यांना विलक्षण स्पर्धेच्या जगातही महत्त्वाचं वाटतं नव्हे ते तसं असतंच, हेच किती भारी आहे! आणि अशी सच्च्या मैत्रीची एक गोष्ट अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेते कुशल बद्रिके यांची आहे. आता लवकर कुशल बद्रिके यांचा ‘पांडू’ सिनेमा प्रसिध्द होतो आहे त्यानिमित्त श्रेयानं कुशलाला दिलेल्या शुभेच्छा आणि तिनं दिलेली भेट याविषयी कुशलने सोशल मीडियात एक पोस्ट लिहिली होती. ती पोस्टच त्यांच्या मैत्रीची एक खास गोष्ट सांगते. एकत्र काम करताना ही मैत्री कशी झाली, टिकली आणि घट्ट झाली याविषयी श्रेयाशी गप्पा मारल्या. आणि तिनं  तिच्या खास मिश्किल स्टाइलने आपल्या मैत्रीविषयी भरभरुन सांगितलं.

श्रेया सांगते, ‘मागच्या २ वर्षात माझ्या कुटुंबातही खूप कठीण प्रसंग आले. त्यात प्रत्येकवेळी कुशल माझ्यासोबत होता. कुशल इज बिकम माय फॅमिली नाऊ! जेव्हा मला तो मित्र म्हणून हवा असतो तेव्हा तो मित्रासारखा, भाऊ हवा असतो तेव्हा भावासारखा मदतीला उभा असतो. मी नेहमी म्हणते की, माझं ते ऑल इन वन पॅकेज आहे. प्रत्येकाचा एक पाठीराखा असतो तसाच कुशल माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठीही आहे. कोविडमध्ये मी माझ्या दोन सख्ख्या मावशांना २४ तासाच्या आत गमावलं. त्यावेळीही शेवटच्या विधींपर्यंत कुशल आमच्या कुटुंबासोबत होता. सगळ्याच चांगल्या, वाईट क्षणांमध्ये तो फक्त माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबियांसाठी मदतीला धावून येतो.

 

पण ही मैत्री नेमकी झाली कशी?

श्रेया सांगते, ''२०१५ मध्ये फू बाई फू च्या सातव्या सिजनसाठी मला विचारणा झाली होती. आधी माझी जोडी वेगवेगळ्या लोकांबरोबर असायची. पण एका फिनालेच्या वेळेस माझा पार्टनर बदलल्यानं ऐनवेळी कुशलला सांगण्यात आलं की तू हिच्याबरोबर स्किट कर. त्यावेळी आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं. त्या पुढच्या सिजनमध्ये कुशलही होता पण माझी जोडी संकर्षण बरोबर होती. त्यावेळी आय वॉज न्यू टू कॉमेडी. आधी मी कधीच हे केलं नव्हतं, माझा जॉनरही तो नव्हता. त्याआधी निगेटिव्ह रोल्स वगैरे केले होते. पण माझ्या आई बाबांची इच्छा होती की मी विनोदी रोल्स करावे. कारण खऱ्या आयुष्यात मी खूप मजा, मस्करी करणारी, कधीतरी कोणाचा आवाज काढून दाखवणं हे सगळं करायची.  त्यांना असं वाटायचं की, नेहमी काय तू असं इमोशनल इमोशनल करतेस, कधी तरी मजा मस्तीवाले रोल्सही करायला हवेत. 

कुशल आणि माझ्या मैत्रीबद्दल सांगायचं तर सुरूवातील त्यालाही अंदाज येत नव्हता. त्याला असं वाटायचं, हिला का घेतलंय? हिला यातलं काहीच येत नाही. हिचा फार काही निभाव नाही लागणार, ही दिसायला बरीये म्हणून हिला घेतलंय. दोन आठवडे काम दिल्यानंतर हिचं पॅकअप होईल. सुरूवातीला माझ्याबद्दल असं वाटल्याचं त्यानंच नंतर मला सांगितलं. ही शिकलेली, इंग्लिश बोलणारी आहे, काहीही झालं तरी हिच्याशी माझी मैत्री नाही होऊ शकत  अशा झोनमध्ये तो होता. नंतर नंतर आम्ही स्किट्स एकत्र करायला लागलो मग ते पथ्यावर पडायला लागलं. आधी माझं टायमिंग खूप ऑफ होतं.  नंतर तो मला तो लहान लहान गोष्टी सांगत गेला, अजूनही सांगतो. मला असं वाटतं की माझा जो काही कॉमेडीचा प्रवास आहे त्यात सिंहांचा वाटा कुशलचा आहे. कारण असं करू नकोस, हे त्यात बसतं नाही असे प्रत्येक बारकावे तो मला सांगत गेला. हळू हळू मला कळलं ओह अच्छा, दॅट्स हाऊ इट वक्स'. 

सोबत काम करता करता आम्ही इतके चांगले मित्र कधी झालो हे कळलंच नाही. चला हवा येऊ द्या नंतर मला जे काही काम मिळत गेलं त्यात मी माझं थोडे प्रयत्न ॲड करून, कुशल, भारत दादांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवत काम करत गेले. दिवसेंदिवस आमची मैत्री अधिकच वाढत गेली. आता सेटवरही आमचं वावरणं वर्गातल्या दोन खट्याळ मुलांप्रमाणे असतं. भांडणं, भंकस, मारामारी सेटवर संपूर्ण दंगा, आम्ही दोघं सेटवर नसलो की बाकीच्यांना शुटींग सुरू आहे असं वाटतंच नाही. मागच्या साडे सात वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतोय. ज्यावेळी आमचे दौरे सुरू झाले तेव्हा कळायला लागलं की, आमचे विचार खूप जुळतात. गाणी, नाटकं, वाचनाची सवय तितकीच मस्तीही आवडते. माझी आणि कुशलची मैत्री शब्दात मांडता येणं कठीण आहे.

त्याला मिळणाऱ्या कामांपेक्षा जास्त चांगली काम मला मिळावीत असं त्याला नेहमीच वाटत असतं. आमचं नात निस्वार्थ, निरपेक्ष असून त्यात  मैत्री आणि अपार जिव्हाळ्याची देवाण घेवाण आहे. जितकं प्रेम तो स्वत:च्या कुटुंबियांवर करतो तितकंच तो आमच्या सर्वांवरही करतो. हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर त्यानं सेटवरच्या स्पॉट दादांनाही त्यानं खूप जीव लावलाय. अशी मैत्री असली की चांगुलपणावरचा विश्वास वाढतो.

टॅग्स :श्रेया बुगडेकुशल बद्रिकेरिलेशनशिप