लग्न हा केवळ एक समारंभ नाही तर जोडीदारांपैकी दोघांच्या आणि दोन्ही कुटुंबाशी निगडीत अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. नवरी-नवरीच्या तर उर्वरीत आयुष्याचा प्रश्न असतो. त्यामुळे लग्न करताना आपण अगदी बारीकसारीक गोष्टी एकमेकांशी बोलून, विचारुन, पाहून घेतो. लग्नाच्या वेळीही आपण कपडे, दागिने, प्री वेडिंग शूट, फिरायला जायचे ठिकाण अशा सगळ्या गोष्टींबाबत शेअरींग करतो. इतकंच काय लग्न ठरल्यापासून होणाऱ्या जोडीदाराशी तासन्तास रोमँटीक गप्पा मारल्याशिवाय आपला दिवस सरत नाही. एकमेकांच्या आवडीनिवडी, इंटरेस्ट, पूर्वायुष्य अशा सगळ्या गोष्टींबाबत बोलताना लग्नानंतर महत्त्वाच्या असणाऱ्या काही गोष्टींबाबतही थेट बोलणे आवश्यक असते. लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात बरेच बदल होणार असतात, त्या अनुषंगाने काही गोष्टींबाबत आधीच स्पष्टता असलेली केव्हाही बरी. त्यामुळे उर्वरीत आयुष्य शांत आणि आनंदी व्हायला नक्कीच मदत होईल. आता अशा कोणत्या ३ गोष्टी आहेत ज्याबद्दल जोडीदारांपैकी दोघांनीही एकमेकांशी आवर्जून बोलायलाच हवे, पाहूयात...
आर्थिक गणिते
लग्नाआधीच आर्थिक नियोजनाबाबत एकमेकांशी बोलणे योग्य होईल का असे कदाचित आपल्याला वाटू शकते. पण आर्थिक नियोजनाशिवाय किंवा आर्थिक गणिते योग्य पद्धतीने मांडल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही हे सत्य असते. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य काढायचा विचार करत असाल तर दोघांनाही एकमेकांचे आर्थिक तपशील माहित असायला हवेत. तसेच आर्थिक नियोजनाबाबतही तुमच्यामध्ये लग्नाआधी पुरेशी चर्चा व्हायला हवी. त्यामुळे या विषयातील एकमेकांचे विचार नेमके काय आहेत हे समजायला मदत होईल. लग्नानंतर होणारे खर्च तुम्ही दोघांमध्ये विभागून घेणार आहात? मुलगी लग्नानंतर नोकरी करणार की घरी बसणार या गोष्टींवर आधीच चर्चा झाली असल्यास नंतर कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाहीत. त्यामुळे संकोच न बाळगता आर्थिक बाबींविषयी मनमोकळेपणाने चर्चा व्हायला हवी.
राहण्याचे ठिकाण
लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी जाण्याची रीत आपल्याकडे आहे. त्यामुळे तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचे घर दुसऱ्या देशात, दुसऱ्या राज्यात, शहरात किंवा अगदी अकाच शहरात पण खूप लांब असल्यास मुलीला याठिकाणी जावे लागते. पण मुलीचा जॉब ती आधीपासून राहते त्या ठिकाणापासून जवळ असल्यास तिच्या नोकरीची अडचण होऊ शकते. त्यामुळे लग्नानंतर राहण्याच्या ठिकाणाबाबत नेमके काय नियोजन आहे याबाबत चर्चा व्हायला हवी. दोघांचा आनंद आणि दोघांची सोय याचा यामध्ये योग्य तो विचार व्हायला हवा. दोघांपैकी कोण कुठे शिफ्ट होणार की दोघेही एकमेकांना सोयीचे होईल अशा ठिकाणी एकत्र राहणार याबाबत स्पष्टता हवी. हे शक्य नसल्यास दोघांपैकी एकाला वर्क फ्रॉम होम करणे शक्य आहे का? किंवा नोकरी बदलणे शक्य आहे का याबाबत विचार व्हायला हवा. त्यामुळे लग्नानंतरचे नवीन आयुष्य नक्कीच आनंदाचे होईल.
पालकांसोबत राहयचे की वेगळे
मुलगी लग्नानंतर मुलाकडे राहायला जात असल्याने नवदांपत्य मुलाच्या पालकांसोबत राहणार हे ओघानेच आले. पण आपल्याला अशाप्रकारे एकत्र राहायचे आहे की लग्नानंतर केवळ दोघंच वेगळ्या घरात राहायचे आहे याविषयी चर्चा व्हायला हवी. कारण या गोष्टीवरुन भविष्यात खूप वाद होतात आणि ही गोष्ट वेगळे होण्यापर्यंत येऊन पोहोचते. यामध्ये मुलाची खूप कुचंबणा होते कारण एकीकडे आईवडील आणि दुसरीकडे बायको. त्यामुळे आपल्याशी लग्न करुन घरी येणाऱ्या मुलीला आपल्या पालकांसोबत राहायचे आहे की नाही हे मुलाने आधीच तिला विचारुन घ्यायला हवे. तिला सोबत राहायचे नसेल तर तिच्यासोबत वेगळे राहायची आपली तयारी आहे का याबाबतही मुलांनी विचार करायला हवा. वेगळे राहण्यातील फायदे-तोटे लक्षात घेऊन मगच लग्नासाठी पुढे जायचे की नाही याबाबत ठरवायला हवे.