भारतीय परंपरेनुसार, लग्न झाल्यानंतर मुलगी नवऱ्याकडे राहायला जाते. त्यानंतर त्या दोघांचा असा एकत्रित मिळून संसार सुरु होतो. संसारांत स्त्री आणि पुरुष हे दोन्ही घटक तितकेच महत्वाचे असतात. संसार सुरु झाल्यानंतर 'मी', 'माझे' हे शब्द विसरून 'आपण', 'आपले' या शब्दांना फार महत्व येते. लग्नानंतर फारश्या गोष्टी पर्सनल न राहता दोघांच्या होतात. परंतु पर्सनल स्पेस ही प्रत्येकाला आयुष्यात हवीहवीशी वाटते. काहीवेळा लग्नांनंतर आयुष्यातील पर्सनल स्पेस संपुष्टात येतो. यामुळेच काही जोडप्यांमध्ये वाद - विवाद होतात. कित्येकवेळा आपला जोडीदार आपल्याला पुरेसा वेळ देत नाही, आपल्याशी फारसा बोलत नाही यांसारख्या अनेक कारणांमुळे जोडप्यांमध्ये भांडण - तंटे होतात.
आताची काही नवीन जोडपी लग्नाच्या जुन्या, चाकोरीबद्ध प्रथा परंपरा मोडीत काढून लग्नाच्या वेगवेगळ्या व्याख्या तयार करताना दिसत आहेत. ते एकमेकांवर हक्क गाजविण्यापेक्षा एकमेकांना पर्सनल स्पेस देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. कधी आपल्याला एकांत हवा आणि कधी आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा आहे, याची जाणीव सध्याच्या जोडप्यांना असते. याच संकल्पनेतून वीकेंड मॅरेज ही संकल्पना निर्माण झाली. वीकेंड मॅरेज म्हणजे नेमकं काय? सध्याची जोडपी या संकल्पनेचा आधार का घेतात अशा अनेक गोष्टी समजून घेऊयात(What Is A Weekend Marriage Concept, What exactly is this type of relationship where couples are truly happy).
वीकेंड मॅरेज म्हणजे नेमकं काय ?
वीकेंड मॅरेजबद्दल बोलताना गेटवे ऑफ हिलिंगच्या संस्थापक आणि संचालक डॉक्टर चांदनी टगनाइट (Dr. Chandni Tugnait) सांगतात, वीकेंड मॅरेज या संकल्पनेचा उदय प्रामुख्याने जपानमध्ये झाला. वीकेंड मॅरेज या नावावरूनच आपल्याला या संकल्पनेचा थोडाफार अंदाज आलाच असेल. या संकल्पनेत जोडपे आपल्या जोडीदारासोबत वेळ घालविण्यासाठी वीकेंडची वाट पाहतात. आठवड्याचे काही दिवस ही जोडपी आपल्या जोडीदाराशिवाय स्वतंत्र रहाणे पसंत करतात. तसेच आठवड्याच्या शेवटी वीकेंड दरम्यान ही जोडपी एकत्र येऊन आपला वीकेंड एकत्र साजरा करतात. या ट्रेंडमुळे आठवड्याच्या काही दिवसांत प्रत्येकाला आपले स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे जबाबदारीचे ओझे न घेतला प्रत्येक जोडीदाराला आपली स्वतंत्र्य जीवनशैली टिकवून ठेवण्यास मदत होते. तसेच वीकेंडच्या दिवशी सामायिक आणि वचनबद्ध जीवनशैली अनुभवता येते.
वीकेंड मॅरेजेस नात्यातील संबंध सुधारु शकतात का ?
सध्याच्या धकाधकीच्या आणि वेगाने पाळणाऱ्या जीवनशैलीत सगळ्यांचा स्वतः स्वतःचे असे स्वातंत्र्य हवे असते. बहुतेकवेळा लोक एकमेकांपासून वेगळे किंवा स्वतंत्र्य रहाणेच पसंत करतात. आजकाल लोक स्वतःची पर्सनल स्पेस किंवा स्वतःचे स्वातंत्र्य या गोष्टींशी ते कधीही तडजोड करु इच्छित नाही. जेव्हा एखादी व्यक्ती नातेसंबंधात असते तेव्हा कमी अधिक प्रमाणांत तिच्यावर बंधन किंवा सीमा रेषा आखून दिलेल्या असतात. काहीवेळा आपण कामाच्या गडबडीत इतके व्यस्त असतो की, बराच काळ आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटत नाही किंवा त्यांच्याशी बोलत नाही. किंबहुना काहीवेळा एखाद्या व्यक्तीला रोज भेटणे किंवा त्या व्यक्तीशी रोज बोलणे गरजेचे नसते. सध्याचे जीवन हे खूप व्यस्त झाले आहे त्यामुळे जो काही थोडा वेळ मिळेल ती आपल स्वतःची अशी पर्सनल स्पेस असावी किंवा लोकांना स्वतःसाठी वैयक्तिक वेळ देणे फार आवडते. लग्न आणि एकत्र राहणे या दोन्ही गोष्टी आपल्या खासगी आयुष्यावर घाला घालणाऱ्या आहेत असे काही जोडप्यांना वाटते. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आपले लग्न वाचवण्यासाठी आपण सतत एकत्र न रहाणे हाच पर्याय उत्तम आहे असे ठरवून काही जोडपी वीकेंड मॅरेजचा पर्याय निवडतात.
जोडपं वीकेंड मॅरेज या संकल्पनेचा आधार का घेतात ?
१. स्वतंत्र्य जगता येत :- जोडपी अनेक कारणांसाठी या संकल्पनेचा आधार घेतात. काही जोडपी वीकेंड मॅरेज या संकल्पनेचा पर्याय निवडतात कारण, आठवड्याच्या काही दिवसांत त्यांना त्यांच्या पद्धतीने राहता येते तसेच जोडीदाराची वीकेंड दरम्यान भेट होते. यामुळे त्या व्यक्तीला एकटेपणा आल्याची भावना येत नाही. वीकेंड मॅरेजमुळे एकटेपणाची भावना न वाटू देता आपले स्वातंत्र्य मोकळेपणाने जपता येते या मुख्य कारणासाठी जोडपी हा पर्याय निवडतात. आठवड्याच्या काही दिवसांमध्ये प्रत्येक पार्टनरला आपले छंद, आवडनिवड जोपासण्यास वेळ मिळतो. तसेच यादरम्यान त्यांचे छंद, आवडनिवड जोपासण्यात त्यांना कुठल्याही व्यक्तीचा कसलाही अडथळा येत नाही. त्यांना हवे तसे स्वतंत्र जगता येते. अशा लोकांसाठी हा पर्याय उत्तम ठरतो.
२. वीकेंड दरम्यान एकत्र वेळ घालवता येतो :- वीकेंड मॅरेज हा पर्याय निवडण्याचे दुसरे मुख्य कारण म्हणजे आपल्या जोडीदारासोबत वीकेंड दरम्यान एकत्र वेळ घालवता येतो. वीकेंड दरम्यान कामाचे टेंन्शन, ताण काहीच नसल्यामुळे आपल्या जोडीदारासोबत आपल्याला हवा तसा वेळ घालवता येतो. जोडीदारासोबत वीकेंड साजरा करताना त्यात कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नाही. जोडीदारासोबत वेळ घालविण्यासाठी ते एकत्र चित्रपट पाहू शकतात, फिरायला जाऊ शकतात, आवडत्या रेस्टोरंटमध्ये जेवू शकतात असे अनेक क्षण साजरे करून ते आपल्यातील नातेसंबंध हसते खेळते ठेवू शकतात. वीकेंड मॅरेजमुळे जोडप्यांना स्वतःची ओळख जपण्यासाठी अधिक स्वातंत्र्य मिळते. प्रत्येक जोडीदाराची स्वतःची अशी पर्सनल स्पेस व जीवन असल्याने, ते त्यांना भावनिकदृष्ट्या एकमेकांवर खूप अवलंबून राहण्यापासून प्रतिबंधित करते आणि त्यांना व्यक्ती म्हणून स्वतंत्र्यपणे जगण्यास वाव देते.
३. एकमेकांना वेळ देता येतो :- बऱ्याचदा कामांत व्यग्र असल्यामुळे आपण एकमेकांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही. खरेतर कित्येक जोडप्यांमध्ये याच मुख्य कारणांवरून भांडणे, वाद होतात. वीकेंड मॅरेजमुळे आठवड्याच्या काही दिवसांत केवळ कामावर लक्ष केंद्रित करुन वीकेंड दरम्यान फक्त जोडीदारासाठी खास वेळ राखून ठेवता येतो. कामांचे अधिक तास, खूप मोठ्या शिफ्ट यामुळे आपण आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देत नसू तर अशी जोडपी वीकेंड मॅरेजचा पर्याय निवडतात. यामुळे आठवड्याभरात कामांवर लक्ष केंद्रित करून वीकेंडचा वेळ हा आपल्या जोडीदाराला देता येतो.
४. आर्थिक स्वातंत्र्य :- वीकेंड मॅरेजमुळे आर्थिक स्वातंत्र जपता येते. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनासारखा आपल्याला हवा तसा खर्च करू शकतो. वीकेंड मॅरेज या संकल्पनेत दोन्ही जोडीदार स्वतंत्रपणे आपापल्या घरी राहत असतात. त्यामुळे घराचे भाडे, लाईटबील, इतर खर्च यांसारख्या गोष्टींवर अधिक पैसे खर्च होत नाहीत. इतर खर्च कमी झाल्याने आपल्याला गुंतवणुकीसाठी पैसे साठविता येतात.
वीकेंड मॅरेज ही संकल्पना भारतात रुजू होईल का ?
वीकेंड मॅरेज ही संकल्पना भारतात रुजू होईल का नाही यावर सध्या काहीच भाष्य करता येऊ शकत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. भारतात कुटुंबाभिमुख समाजाला जास्त प्राधान्य आहे. कितीही बदल झाले तरी, भारतातील लोक आपल्या कौटुंबिक संस्कृतींना खूप महत्त्व देतात आणि एकत्र किंवा किमान जवळपास राहणे पसंत करतात. लग्न या संकल्पनेत सगळ्याच गोष्टी परिपूर्ण आहेत असे काही नाही, त्यांत थोड कमी अधिक प्रमाण असतंच. परंतु काहीवेळा जर एखाद्या विशिष्ट निर्णयामुळे दोन्ही जोडीदारांना समजूतदारपणा आणि प्रेम दाखवून एकमेकांसोबत राहण्यास मदत होत असेल तर अशी जोडपी एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात.