मुलांना जन्म देणे एकवेळ सोप्पे असते, पण त्यांना वाढविणे मात्र महाकठीण आणि मोठ्या कौशल्याने करायचे काम आहे... असे आपण आपल्या घरातील आई, आजी, मावशी, काकू या वडीलधाऱ्या बायकांकडून नेहमीच ऐकत असतो. याचा खरा प्रत्यय मात्र तेव्हा येतो, जेव्हा खरोखरंच आपल्यावर आपल्या मुलांना वाढविण्याची वेळ येते. कधीकधी मुलांचा दंगा अगदी डोक्यात जातो आणि मनातला, घरातला, ऑफिसचा सगळा राग त्यांच्यावर निघतो. बिचारी मुले मग हिरमुसून जातात. असे वारंवार होऊ लागले तर मुले एक तर अधिकच अबोल, बावरलेली होतात, नाहीतर मग फारच बांड होत जातात. असे होऊ द्यायचे नसेल आणि मुलांशी मैत्री करायची असेल, तर स्वत:मध्ये हे काही बदल नक्की करा.
१. मुलांचे म्हणणे ऐका...आपण पालक आहोत म्हणजे 'हम करे सो कायदा, आणि मुलांनी फक्त आमचे ऐका...' असेच जणू काही पालकांना वाटत असते. तसेच त्यांचे मुलांशी वर्तन असते. यामुळे मुले वयाच्या एका ठराविक टप्प्यापर्यंत पालकांचे ऐकतात आणि त्यानंतर मात्र स्वत:ला पाहिजे तसेच वागतात. असे होऊ द्यायचे नसेल, तर कधी तरी वेळ काढून मुलांचे म्हणणेही ऐकत जावे. तुम्हाला जे वाटते ते मुलांना जरूर सांगा, पण त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायलाही विसरू नका.
२. मुलांना वेळ द्या..ऑफिस, करिअर आणि घर या तिन्ही आघाड्यांवर लढताना आजच्या पालकांची खरोखरच दमछाक होत आहे. घडाळ्याच्या काट्याशी त्यांचे जीवन पुर्णपणे बांधले गेेले आहे. पण तरीही मुले आहेत, तर त्यांना वेळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून तुमच्या रूटीनमधून काही वेळ फक्त आणि फक्त मुलांसाठी ठेवा. यावेळेत त्यांच्याशी गप्पा मारा, खेळा, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
३. मुलांना त्यांचे चांगले गुण सांगा.. मोठ्या माणसांनाही स्वत:ची स्तुती ऐकूण घेणे आवडते. मग आपली मुले तर निरागस बालकेच आहेत ना. मुलांमध्ये पॉझिटीव्ह ॲटीट्यूट निर्माण होण्यासाठी आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी मुलांना वेळप्रसंगी त्यांचे चांगले गुण, चांगल्या सवयी नक्की सांगत जा. यामुळे ते खूश होतील आणि आपली आई कौतूक करतेय, हे कळाल्यावर आणखी चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतील. दोन गोष्टी चांगल्या सांगितल्यावर जर एखादी त्यांची वाईट सवय सांगितली तर मुले ती नक्कीच ऐकूण घेतात आणि त्यांच्यात बदल घडविण्याचा प्रयत्न करतात.
४. प्रत्येक गोष्टीत सूचना नकोमुलांनी खेळायचे कसे, कोणते कपडे घालायचे, कोणत्या मित्रमैत्रिणींशी बोलायचे हे पालकांनी ठरवू नये. आई आपल्या प्रत्येक गोष्टीत इंटरफियर करते आहे, हे मुलांच्या लक्षात आले तर मग ते आईला चोरून काही गोष्टी करू लागतात. शिवाय त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना खेळू दिले, कपडे घालू दिले किंवा त्यांच्या स्तरावरचे काही निर्णय त्यांचे त्यांना घेऊ दिले तर अशी मुले लवकरच स्वावलंबी होत जातात. आपले निर्णय आपण घेतात. आईने प्रत्येकवेळी मुलाला कुबड्या बनून आधार देऊ नये.
५. मुलांचे मुड आणि त्यांची आवड सांभाळाआपण चिडलेले असू तेव्हा मुलांनी शांत बसावे, आपला मुड असेल तेव्हा मुलांनी त्यांचे खेळणे सोडून आपल्यासोबत बाहेर शॉपिंगला यावे, असे अनेक आईंना वाटते ना? मग तसेच मुड मुलांचेही सांभाळा. त्यांच्या आवडीच्या काही गोष्टी तुम्हीही करा. कायम आपल्याला वाटतील त्या गोष्टी मुलांवर लादत जाऊ नका.
६. मुलांना तुमच्या आठवणी सांगाआपली आई लहानपणी कशी होती, तिचे लहानपण कसे गेले, हे मुलांना ऐकायला खूप आवडते. आपल्या लहानपणीचे काही गमतीशीर किस्से मुलांसोबत नक्की शेअर करा. आपल्या बालपणीच्या ज्या गोष्टी मुलांना प्रेरणा देऊ शकतील, त्या त्यांना जसा वेळ मिळेल, तशा सांगत जा.