नवरा बायकोचं नातं असं की कधी ते जुळलं तर समाजात चाललेल्या चर्चा थांबतात तर कधी ते जुळलं तर चर्चा होतात. धर्मेंद्र आणि हेमामालिनी या दोघांचं नातं दुसर्या प्रकारचं. धर्मेन्द्र आणि हेमामालिनी हे नवरा बायको हे सगळ्यांना माहित होतं, आहे पण त्यांच्यातलं नातं कसं असेल याबाबत मात्र अजूनही लोकांची उत्सुकता शमलेली नाही. त्याला कारण एकच हेमामालिनीशी लग्न करण्याआधी धर्मेन्द्र यांचं पहिलं लग्न झालेलं होतं. हेमामालिनी आणि धर्मेन्द्र यांच्या प्रेमाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. पण तो करताना हेमामालिनी यांचा तोल कधीही ढळला नाही, कधीही हक्काच्या जाणिवेतून त्यांनी आक्रस्ताळेपणा केला नाही. त्यांनी धर्मेन्द्र यांच्यासोबतचं नातं निभावताना स्वत:ची आणि दोघांमधल्या प्रेमाची प्रतिष्ठा कायम जपली.
एका व्यक्तीची दोन लग्नं याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन थट्टेचा/ चेष्टेचा/ टीकेचा असतो पण धर्मेन्द्र आणि हेमामालिनी यांच्यातील नात्याबद्दल लोकांमधे केवळ उत्सुकताच दिसली. या उत्सुकतेला उत्तर हेमा मालिनी यांनी त्यांच्यावरील ‘ ड्रीम गर्ल’ या राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या चरित्रपर पुस्तकात दिलेलं आहे. हेमामालिनी यांनी धर्मेन्द्र यांच्यासोबतच्या नात्याचं वर्णन करताना समाधानाचा सूर ठेवला. अमूक व्यक्तीमुळे तमूक मिळालं नाही असं न म्हणता धर्मेन्द्र यांनी नवरा म्हणून माझ्यासाठी , वडील म्ह्णून आमच्या मुलींसाठी जे केलं त्याबद्दल कृतज्ञता आणि आदरच व्यक्त केला आहे. धर्मेन्द्र यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल, त्यांनी निभावलेल्या प्रत्येक कर्तव्याबद्दल हेमामालिनी आपण समाधानी असल्याचं म्हणतात.
Image: Google
धर्मेन्द्र आणि हेमामालिनी यांची ओळख झाली तेव्हा धर्मेन्द्र हे विवाहित आहे हे हेमामालिनी यांना माहित होतं. धर्मेन्द्र यांना हेमामालिनी आवडू लागल्या होत्या. पण हेमामालिनी यांना विवाहित पुरुषात गुंतायचं नव्हतं. त्यामुळे सुरुवातीला हेमामालिनी यांनी धर्मेन्द्र यांना कोणताच प्रतिसाद दिला नाही. पण हळूहळु हेमामालिनी धर्मेन्द्र परस्परांच्या प्रेमात पडले, गुंतत गेले आणि दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर हेमामालिनी यांच्या मनात धर्मेन्द्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याबद्दल असूया, द्वेष, राग काहीच नव्हतं. होता तो फक्त आदर.
हेमामालिनी सांगतात, धर्मेन्द्र यांच्याशी लग्न होण्याअगोदर त्या प्रकाश कौर यांना अनेकदा सार्वजनिक समारंभात भेटल्या होत्या. पण लग्नानंतर हेमामालिनी यांनी प्रकाश कौर यांना भेटणं, त्यांच्याकडे बघणं जाणून बुजून टाळलं. कारण हेमामालिनी यांना कोणताही वाद नको होता, कोणालाही दुखवायचं नव्हतं. म्हणूनच हेमामालिनी यांनी आजपर्यंत धर्मेन्द्र यांच्या घरी जाण्याचं टाळलं. खरंतर हेमामालिनी यांचा बंगला आणि धर्मेन्द्र यांचं घर अगदीच जवळ जवळ असतानाही प्रकाश कौर आणि आपला रस्ता कधीही एकमेकांना छेदणार नाही याची काळजी हेमामालिनी यांनी घेतली. प्रतिष्ठेनं आणि प्रेमानं नात जपण्याचा हेमामालिनी यांनी कायम प्रयत्न केला.
Image: Google
एखाद्याची दुसरी बायको म्हणून समाजात त्या स्त्रीला हिणवलं जाण्याची, तिला स्वार्थी म्हणून संबोधण्याची शक्यता अधिक असते हे हेमामालिनी यांन माहीत होतं. पण त्यांच्याबाबतीत हे कधीही झालं नाही. याला कारण हेमामालिनी यांनी धर्मेन्द्र यांच्याशी नातं ठेवताना इतर सर्व नात्यातल्या मर्यादा पाळल्या. त्यात कुठेच वाद होणार नाही याची काळजी घेतली. आज धर्मेन्द्र आणि हेममालिनी यांच्या नात्याविषयी भलेही लोकांना उत्सुकता असेल पण हेमामालिनीची ओळख ही केवळ धर्मेन्द्रची बायको नसून हेमामालिनी यांना आज त्यांच्या कामानं आणि नावानं ओळखलं जातं. हेमामालिनी म्हणतात, 'धर्मेन्द्र यांच्यासोबतच्या नात्यातली प्रतिष्ठा कायम राहिली कारण मी माझी स्वत:ची प्रतिष्ठा जपली' . हेमामालिनी म्हणतात, ‘ आज सत्तरी ओलांडल्यावरही मी ‘वर्किंग वुमन’’ आहे. माझी कला आणि माझं काम याला मी वाहून दिल्यामुळेच मला माझी प्रतिष्ठा जपता आली आहे. समजा याच्या उलट परिस्थिती असती तर आज मी जी काही आहे ते नक्कीच नसते. मी लग्नानंतर प्रकाश कौर यांच्याशी बोलले नसले तरी मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो . माझ्या मुलींना धर्मेन्द्र यांच्या कुटुंबाबद्दल आदर वाटतो.'
Image: Google
धर्मेन्द्र यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्या सोबतच्या नात्याच्या समीकरणाबद्दल हेमामालिनी यांच्या चरित्रात जशी माहिती येते तशीच धर्मेन्द्र यांच्या आईसोबतची एक आठवण त्यांनी आवर्जून सांगितली आहे. हेमामालिनी म्हणतात की, धर्मेन्द्रच्या आई सतवंत कौर देखील खूप प्रेमळ आणि मृदु स्वभावाच्या होत्या. इशा पोटात असताना जुहू येथील एका डबिंग स्टुडिओमधे त्या हेमामालिनी यांना भेटायला आल्या होत्या. आपण हेमामालिनीला भेटायला चाललो आहोत याबद्दल त्यांनी घरात कोणाला काहीही सांगितलेलं नव्हतं. धर्मेन्द्रच्या आईला भेटल्यानंतर आपण पाया पडल्यावर सतवंत कौर यांनी डोक्यावर हात ठेवून ‘बेटा खूष रहो हमेशा’ असा आशिर्वाद मिळाल्याची आठवण हेमामालिनी आनंदानं सागंतात. त्या आपल्याबाबत आनंदी असल्याचं पाहून आपल्यालाही खूप आनंद झाल्याची आठवण हेमामालिनी सांगतात.
केवळ कोणता वाद नको, आपल्यामुळे कोणात वाईटपणा नको म्हणून हेमामालिनी यांनी धर्मेन्द्र यांच्या घराची पायरीही चढली नाही. पण इशा ही कदाचित एकमेव होती जी धर्मेन्द्रच्या घरी आपल्या आजारी काकांना भेटायला गेली होती. तिथे इशाला प्रकाश कौर भेटल्या. इशानं त्यांच्या पाय पडल्या आणि प्रकाश कौर यांनीदेखील इशाच्या पाठीवर हात ठेवून तिला आशिर्वाद दिले.
Image: Google
एक नातं जुळताना दुसरं तुटलंच पाहिजे, त्यात अविश्वास , वाद विवाद. संघर्ष, मानापमान या अप्रिय घटना घडल्याच पाहिजे असं नाही. हेमामालिनी यांनी प्रेमानं नातं निर्माण करत येतं, प्रतिष्ठेनं ते कसं जपता येतं याचं उदाहरण स्वत:च्या अनुभवातून घालून दिलं आहे. हेमामालिनी यांनी लग्नाच्य नात्यात गॉसिप निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली म्हणूनच धर्मेन्द्र आणि हेमामालिनी या जोडीविषयी लोकांना उत्सुकता आजही आहे.