गौरी पटवर्धन
“घरी काम करायला कोणी बाईमाणूस नव्हतं म्हणून हिला करून आणली…”“दोन्ही पोरींची लग्न झाली, मंग हाताशी कोणी राहिलं नाही. मीच किती वर्ष भाकऱ्या थापू?, म्हणून पोरासाठी बायकू शोधली!”असं सर्रास सांगून घरात सून करून आणण्याची पद्धत (अजूनही) आहे.मुलाची आई किती सहज म्हणते, “ सून आली, की तिच्या हाती स्वयंपाकघर सोपवून मी निश्चिंत होणार आहे.”त्याचं कारणच हे की, घरकाम हे अत्यंत कंटाळवाणं आणि थँकलेस काम असतं. म्हणून ते घरातल्या सगळ्यात दुर्बल घटकाच्या माथी मारलेलं असतं. हा दुर्बल घटक कायमच घरातली स्त्री असते. त्यातही नवीन लग्न झालेली स्त्री असते.नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समितीत काम करतानाच अनुभव असा की, इथे येणाऱ्या नवरा-बायकोच्या तंट्याच्या केसेसमध्ये “ सुनेला / बायकोला घरकाम नीट जमत नाही” किंवा “ ती घरकामाचा आळस करते.” ही तक्रार अत्यंत कॉमन असते.
(Image : google)
ही कामं कुठली असतात?, तर स्वयंपाक करणं, घर झाडणं, पुसणं, भांडी घासणं, ती जागेवर लावणं, कपडे धुणं, ते वाळवणं, घड्या घालणं, त्या जागेवर ठेवणं, घरात इकडेतिकडे पडलेले कपडे, वर्तमानपत्र, घरातल्या सदस्यांच्या वस्तू सतत उचलून जागेवर ठेवणं, कोणीही हाक मारली की ती वस्तू शोधून आणून देणं, घर एकूणात स्वच्छ चकचकीत ठेवणं, मुलांना वेळेवर खाऊपिऊ घालणं, त्यांना आंघोळी घालणं, शाळेसाठी तयार करणं वगैरे वगैरे...आता या कामांचा अजून एक मोठा गुणधर्म म्हणजे ही कामं कोणीतरी करतं आहे हे कधीही कोणाच्याही लक्षात येत नाही. इतकं, की त्यासाठी एक अख्खी म्हण आहे. “ काम दिसत नाही आणि बाई बसत नाही ’’. नोकरी न करणाऱ्या स्त्रीला “तुम्ही काय करता?” असं विचारलं की, त्यावर हटकून येणारं उत्तर म्हणजे “काही नाही. घरीच असते.” आपण घरी असतो म्हणजे आपण काहीही करत नाही हे त्या बाईच्या मनावर इतकं खोलवर बिंबवलेलं असतं, की आपण जे करतोय ते काहीतरी महत्त्वाचं काम आहे हे तिच्या गावीही नसतं. अर्थात एखाद्या ‘घरीच असणाऱ्या आणि काहीच न करणाऱ्या’ बाईने कुठे चार दिवस गावाला जायचा विचार केला, की घरातल्या सगळ्यांना त्यातल्या अडचणी लक्षात यायला लागतात. ती नसेल तर स्वयंपाक कोण करेल?, मुलांचं कोण करेल?, घरातल्या वृद्ध माणसांकडे कोण लक्ष देईल?, घरातल्या माणसांना स्वतःच्याच वस्तू कशा सापडतील? असे अनेक प्रश्न त्यांना दिसायला लागतात.पण तरीही ती बाई घरात असतांना ही सगळी कामं बिनबोभाट एकहाती करत असते हे मात्र कोणीही मान्य करत नाही.घरकामातल्या असंख्य कामांपैकी एखादं काम जर का वेळेवर झालं नाही, तर सगळं घरदार त्या बाईला बोलायला एकत्र येतं. पण केलेल्या कामाचं कौतुक कोणी करत नाही. या साऱ्यात घरातले पुरुष परंपरेने त्यातून अलगद सुटून जातात कारण घरकाम हे पुरुषांचं कामच नाही हे सर्रास रुजवलेलं असतं, आणि स्वीकारायला पुरुषांसाठीही सोयीचंच असतं. त्यामुळे घरकाम म्हणून असलेल्या अनेक कामांपैकी कशाचाही भार घरातल्या पुरुषावर पडत नाही. आई आजारी असेल तर घरातली सहावी सातवीतली मुलगी स्वयंपाक करते. पण त्या मुलीचे वडील साधी खिचडी करू शकत नाहीत हे चित्र तर सर्रास दिसतं.कारण घरातली कामं ही बायकांचीच कामं आहेत असं पुरुषसत्ताक समाजरचनेने कधीच्या काळीच ठरवून टाकलेलं आहे. त्यामुळे घरकाम करायला बाईने नकार देणं हे कोणाला पचूच शकत नाही. आणि या साऱ्यात ती कमावती आहे की नाही यानं काहीच फरक पडत नाही.मग बाईने घरकाम करायचंच नाही का?, तर करावं. जरूर करावं. कारण घर मांडायचं म्हंटलं की त्यातलं काम तर करावंच लागणार. त्यामुळे बाईने ते जरूर करावं. पण ‘फक्त बाईनेच करावं’ किंवा ‘बाईने करावंच’ अशी अपेक्षा आता तरी करू नये..
patwardhan.gauri@gmail.com