"अरे, तुझं किती वजन वाढलंय", "अगं किती बारीक झालीस, काहीतरी खात जा", "अय जिराफ", "तुझी उंची किती लहान आहे". असे व अनेक प्रकारचे शारीरिक स्वरूपाबद्दल टोमणे आपण ऐकले किंवा दिलेही असतील. याला बॉडी शेमिंग असे म्हणतात. बॉडी शेमिंग म्हणजे जेव्हा इतरांद्वारे किंवा स्वतःद्वारे आपल्या शारीरिक स्वरूपाबद्दल टीका होणे. इतरांचे वजन, त्वचेचा रंग किंवा देखावा याबद्दल विनोद केल्याने भावनिक समस्या निर्माण होऊ शकतात. या कारणामुळे अनेक लोकं डिप्रेशनचे शिकार बनतात. अशा परिस्थितीत व्यक्तीचे मानसिक संतुलन देखील बिघडू शकते. बॉडी शेमिंगला दुर्लक्ष करण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
बॉडी शेमिंग म्हणजे काय
एखाद्या व्यक्तीची उंची, लठ्ठपणा, वय, सौंदर्य किंवा इतर कोणत्याही गोष्टीवर चुकीची टिप्पणी करणे, याला बॉडी शेमिंग म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर त्याचा पीडित व्यक्तीवर खूप वाईट परिणाम होतो. त्यांना वारंवार त्याच कारणावरून डिवचले जाते.
बॉडी शेमिंगमुळे वाढतो ताण
जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा बॉडी शेमिंगची शिकार होत असेल तर, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिक स्थितीवर होतो. त्यामुळे पीडितेचा ताण वाढतो.
बॉडी शेमिंग कसे टाळावे
स्वतःवर प्रेम करा - कोणी काहीही म्हणत असले तरी नेहमी स्वतःवर प्रेम करत राहा. तुमचा रंग, आकार, उंची काहीही असो, तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा. कोणाच्या बोलण्यावर स्वतःवर वर्चस्व गाजवू देऊ नका. स्वतःची तुलना कोणाशीही करू नका.
निरोगी शरीरासाठी नेहमी कृतज्ञ रहा
आपल्या निरोगी शरीरासाठी आपण नेहमीच आभारी असले पाहिजे. तुमचे शरीर जे काही आहे ते स्वीकारा आणि नेहमी तुमच्या शरीराचे आभार माना.
खुल्या मनाच्या लोकांशी मैत्री करा
जर तुमचे मित्र वारंवार बॉडी शेमिंगवरून डिवचत असतील तर, त्यांच्यापासून लांब रहा. त्याचा थेट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. यासाठी अशा लोकांशी मैत्री करा जे तुम्हाला तुमच्या शरीरावर नव्हे तर तुमच्या आतील व्यक्तीवर प्रेम करतील.