हल्ली आपण घरात कमी आणि ऑफीसमध्ये जास्त वेळ असतो. दिवसाचे ८ ते १० तास ऑफीसमध्ये असल्याने आपल्याला तिथल्या सहकाऱ्यांशी पटवून घेण्याशिवाय पर्यायच नसतो. बरेचदा या सहकाऱ्यांशी आपले चांगले जुळते. पण काही वेळा आपले त्यांच्याशी अजिबात पटत नाही आणि मग ऑफीसमध्ये कधी कोल्ड वॉर तर कधी थेट भांडण होते. इतकेच नाही तर ऑफीसमध्ये असणारे पॉलिटीक्स अनेकदा आपल्याला डोक्याला ताण देणारे ठरु शकते. मात्र या सगळ्यापासून दूर राहायचे आणि कामाशी काम ठेवायचे तर आपण काही गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायला हव्यात. ऑफीसमध्ये इतरांशी नेमकं कसं वागायचं आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या जेणेकरुन आपल्या आजुबाजूचे वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होईल (How To Behave in Office Tips For Good Office Culture).
१. कामाशी काम ठेवा
ऑफीसमध्ये आपण काम करायला जातो. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करुन त्यावर फोकस करा. इतर लोक काय करतात, कसं वागतात, त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे याकडे लक्ष न देता आपल्या कामाशी काम ठेवणे महत्त्वाचे असते.
२. दुर्लक्ष करा
आपल्या कामाच्या व्यतिरिक्त आपल्याशी कोणी नकारात्मक वागत असेल तर त्या गोष्टींकडे चक्क दुर्लक्ष करा. त्यामुळे तुमच्या आजुबाजूला नकारात्मक वातावरण तयार होणार नाही आणि त्याचा तुमच्यावर, तुमच्या कामावर परीणाम होणार नाही.
३. आपल्या विकासाकडे लक्ष द्या
आपण एखाद्या ठिकाणी कामाला जातो म्हणजे त्याठिकाणी आपल्याला सिद्ध करायचे असते. इतकेच नाही तर आपला विकास होत आहे की नाही, आपण रोज काहीतरी नवीन शिकतो की नाही याकडे लक्ष द्यायला हवे. आपली पगारवाढ, पद वाढ यासाठी या गोष्टी आवश्यक असल्याने त्याकडे अवश्य लक्ष द्यायला हवे.
४. प्रोफशनल आणि पर्सनल लाईफ वेगळं ठेवा
अनेकदा असं होतं की आपण ऑफीसमध्ये आपल्या वैयक्तिक गोष्टी बोलतो आणि त्यावरुन लोक आपल्याला जज करतात. कुटुंबातील लोक आपल्या अनेक गोष्टी ऐकून घेऊ शकतात. पण प्रोफशनल लाईफमध्ये मात्र या सगळ्या गोष्टींना काही बंधने असतात आणि आपण ती बंधने पाळायला हवीत.