निशिगंधा डावरे
माझा जॉब नुकताच गेला, त्यात माझं सतत बॉयफ्रेण्डशी भांडण होतं, भीती वाटते रिलेशनशिप टिकेल की तुटेल? अशावेळी मी नेमकं काय करावं, टेंशन येतं, काय करु?
नोकरी गेली, त्यात नात्यात ताण, नेहमीचे वाद यामुळे डोकं शिणून जाणं अगदी साहजिकच आहे. त्यामुळे चिडचिड होते. पळून जावं कुठं असं वाटतं पण पळून जाणार कुठं? आणि जगणार कसं? त्यात आपल्या घरातल्या जीवाभावाच्या माणसांचं काय? त्यांना का शिक्षा करायची असा विचार करुन पाहा म्हणजे मग आपलं उत्तर सापडणं सोपं होईल. मुळात हे लक्षात ठेवायला हवं की आपल्या प्रश्नाचं रेडिमेड उत्तर कुणी देणार नाही, त्यापेक्षा आपण महत्त्वाचं ते काय, तडजोड कुठं करु शकतो याचा विचार करा.आता स्वत:ला सांगा की आत्ता आयुष्यात महत्त्वाचे काय? नोकरी? पैसा? जॉब? खायचं काय हा प्रश्न?प्रायॉरिटीने हा प्रश्न आपणच सोडवायला हवा, नोकरी शोधायला हवी.
(Image : google)
त्यापूर्वी हे पहायला हवं की आपला जॉब नक्की कशानं गेला? असहायता, नैराश्य, आपणच बिचारे, व्हिक्टिम हूड, सध्याचं आयुष्य, माणसं, परिस्थिती यासाऱ्याचा तिटकारा हे सारं बोलत राहण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकल विश्लेषण करायला हवं.अनेकदा वाटूही शकतं की आता आहे ते मागे सोडून आपण निघून गेलो तर कदाचित आपलं जगणं बदलेल. पण आपली मानसिक स्थिती जर लो असेल, आधीच गाडी खडकत असेल, रडतखडत चालत असेल तर आपण नवीन प्रश्न ओढावून घेऊ नयेत.त्यावर उपाय म्हणजे, आपल्याला न आवडणारी घरातली माणसं असली, तरी ती मायेची असतात.त्यांना आपल्याविषयी थोडं तरी प्रेम असतं, बाहेर आपण अनोळखी लोकांनी जुळवून घ्यायला तयार आहोत तर मग आपल्याच घरातल्या माणसांशी मायेनं बोलायला, कधी जरा पडतं घेत त्यांचं म्हणणं ऐकून तरी घ्यायला काय हरकत आहे?मनमोकळं करा. अगदी लहान बहीण भाऊ, मोठे बहीण भाऊ, नात्यातले कुणी, आईबाबा यासाऱ्यांशी बोला. फारतर ते रागवतील, चिडतील पण आपल्यासोबत असतील. निगेटिव्ह विचारांपासून पळा.त्यातून एकेक प्रश्न सुटेल. आधी नोकरीचा प्रश्न, मग लग्नाचा असा एकावेळी एकच प्रश्न सोडवायला घ्या. सगळं एकत्र करुन रडत बसाल तर हाती काहीच लागणार नाही.
(लेखिका काऊन्सिलर आहेत.)