मानसी चांदोरकर
दोन व्यक्ती समोरासमोर आल्या म्हणजे "मतभेद" हे व्हायचेच. मग तो जोडीदार असो, पालक असोत, साथीदार असतो किंवा मग अन्य कोणी.. समोरासमोर आलेल्या दोन व्यक्तींचे प्रत्येक वेळी एकमेकांशी पटलेच पाहिजे असे काही नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितकी मते. प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार असतोच. जेव्हा जेव्हा हे मत मांडण्याची वेळ येते तेव्हा आपण किंवा समोरची व्यक्ती ते कसे मांडते हे जास्त महत्त्वाचे असते. समोरच्या व्यक्तीला न दुखावता आपले मत मांडणे हे जास्त महत्त्वाचे आणि "कौशल्यपूर्ण" असतं. आरडाओरडा करून, भांडण करून, जबरदस्ती करून कोणीही आपले मत अगदी सहज मांडू शकते. पण आपल्याला जर समोरच्याला न दुखावता आपले मत मांडायचे असेल तर हे कौशल्य आत्मसात करणे खूप महत्त्वाचे असते. नातं कुठलंही असो मत मांडताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे कौशल्य कसे आत्मसात करायचे ते पाहूया (How To Handle the Situation even if We Have Different opinions)..
1) मत मांडताना प्रथम आपला मुद्दा स्पष्टपणे मांडा.
2) तो मुद्दा मांडल्यानंतर समोरच्या व्यक्तीचे त्याबाबत काय विचार आहेत, त्या व्यक्तीचे काय म्हणणे आहे, ती व्यक्ती तसं का म्हणते, हे सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
3) तिचे मत, तिचे म्हणणे पूर्णपणे न ऐकता आपलेच मत तिच्यावर लादू नका. त्या व्यक्तीच्या मतामागे तिचा काय विचार आहे हे समजून घ्या.
4) जर त्या व्यक्तीचे मत बरोबर असेल तर तुम्ही त्याचा पुन्हा विचार करा.
5) जर त्या व्यक्तीचे मत चुकीचे असेल तर ते का चुकीचे आहे? त्यामुळे काय नुकसान होऊ शकते? त्यामुळे काय अडचणी येऊ शकतात? हे त्या व्यक्तीला शांतपणे पटवून द्या.
6) तू म्हणतोस किंवा म्हणतेस ते सर्व चुकीचे आहे. मी म्हणते तेच खरे असा "हट्ट धरू नका" जसे तुम्हाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच समोरच्या व्यक्तीलाही आहे हे विसरू नका.
7) जसे तुम्ही तुमच्या मतावर आग्रही राहू शकता तसेच समोरचाही राहू शकतो हे विसरू नका.
8) या ऐवजी कोणत्याही मुद्द्यावरचे आपले मत शांतपणे मांडा. समोरच्यालाही व्यक्त होऊ द्या आणि मग निर्णय घ्या.
उदाहरणार्थ आपल्या पत्नीने काही काळापूर्ती नोकरी थांबवावी. असे आपल्याला वाटत असेल तर त्या मागचा आपला हेतू स्पष्ट करा. किंवा आपल्या पतीने आपल्याला आता जास्त वेळ का द्यावा? आत्ता आपल्याला त्याची काय गरज आहे? त्या मागची कारणे त्यांना स्पष्टपणे समजावून सांगा. त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीला बोलवण्याची काहीच जरुरत नाही. जर संवाद स्पष्ट असेल, मतामागील विचार स्पष्ट असतील, तर मतांमध्ये गोंधळ होणे, वादविवाद होणे. या कोणत्याही गोष्टीला कोणत्याच नात्यात जागा नाही. त्यामुळे "मत मांडताना स्वतःबरोबरच इतरांच्या विचारांना, मतांना महत्त्व द्या" इतकेच.
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com