Join us  

ऑफिसात कामाचा इतका स्ट्रेस की घरात भांडणं होतात, झोप नाही लागत? करा ५ गोष्टी, डोक्याचा ताप होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 12:37 PM

How To Manage Work life Balance : वर्क लाइफ बॅलन्स हा शब्द सुध्दा आवडू नये इतकं कामाचं प्रेशर वाढतं, घरात वाद होतात अशावेळी काय कराल?

मानसी चांदोरकर 

सकाळी उठल्यानंतर मुलांना आवरून शाळेत पाठवणे, घरातील इतर सदस्यांची योग्य ती सोय करून कामावर जाणे, दिवसभर तेथे काम करणे आणि घरी आल्यानंतर पुन्हा रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीच्या दिनक्रमची तयारी करणे. यामध्येच आपला संपूर्ण दिवस संपून जातो. ही आता प्रत्येकच घराची आणि घरातल्या सदस्यांची दिनचर्या झालेली आहे. 'फक्त काम काम आणि काम'. हाच प्रत्येकाचा दिनक्रम बनून गेला आहे. या  दिनक्रममुळे पालकांना मुलांसाठी, जोडीदारांना एकमेकांसाठी, घरातल्या इतर सदस्यांसाठी, घरातल्या प्रौढ व्यक्तींसाठी, संवाद साधायला, वेळ द्यायला वेळच उरलेला नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात सतत व्यस्त आहे. 

फॅमिलीसोबत विकेंड एनर्जेटिक-फ्रेश व्हावा तर करा फक्त ५ गोष्टी; पुढचा पूर्ण आठवडा जाईल चांगला...

घरातली पुरुष मंडळी ऑफिसमध्ये ऑफिसमधील काम आणि घरी आल्यावरही ऑफिसमधले कॉल,  कुटुंबातील स्त्रिया सकाळी घर, दुपारी ऑफिस, संध्याकाळी घर आणि मुलांचा अभ्यास या दिनक्रमात,  तर मुलं शाळा,  क्लास, होमवर्क, प्रोजेक्ट या दिनक्रमात अडकून गेलेली असतात. या दिनक्रममध्ये घरातील सदस्य एकमेकांना वेळच देऊ शकत नाहीत. आणि मग हळूहळू त्यांच्यातला संवाद विसंवादात तरी बदलतो किंवा मग संपत तरी जातो. हे टाळायचं असेल तर प्रत्येकाने स्वतःचा दिनक्रम आणि एकमेकांसाठी वेळ देणे याचा ताळमेळ घातला पाहिजे. अर्थात काम आणि कुटुंब याचा योग्य ताळमेळ घालता आला पाहिजे. यासाठी आपण काय करू शकतो?  

(Image : Google)

१) पालकांनी दिवसातला काही वेळ मुलांसाठी राखून ठेवा. या वेळामध्ये मुलांची आपुलकीने चौकशी करा. त्यांच्यातल्या कलागुणांचे, चांगल्या सवयींचे कौतुक करा. हा संवाद "अनौपचारिक" ठेवा.

सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

२)  जोडीदाराबरोबर देखील दिवसातला थोडासाच वेळ पण "क्वालिटी टाईम" व्यतीत करा. या काळात एकमेकांशी मोकळा संवाद साधा. ऑफिस, घरातील इतर सदस्यांबाबतची चर्चा, वादाचे मुद्दे येऊ देऊ नका. हा वेळ हसत खेळत आनंदात कसा घालवता येईल याचा विचार करा.

३)  तुम्हाला कामाचा ताण असेल, इतर काही टेन्शन असतील ज्याचा तुमच्या वागण्यावर, कामावर परिणाम होत असेल तर अशावेळी मुद्दामहून कुटुंबासाठी थोडा तरी वेळ काढा. हा वेळ आनंदात घालवला तर येणारा ताण, टेन्शन आपोआप कमी होतील.

(Image : Google)
 ४) ज्या कुटुंबासाठी, ज्या आपल्या लोकांसाठी तुम्ही एवढे कष्ट करत आहात, त्यांच्या आनंदासाठी झटत आहात, त्यांना तुमचा वेळ, तुमचे प्रेम याचीही तितकीच गरज आहे हे लक्षात घेऊन काम आणि कुटुंबासाठी  हा वेळेचा ताळमेळ घालण्याचा संपूर्ण प्रयत्न करा. 

५) हा वेळ रोज काढायला हवा असा अट्टाहास अजिबात नाही. पण कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगला संवाद असेल, समजूतदारपणा असेल, तर आठवड्यातून किमान तीन-चार दिवसातून एकदा जरी हा वेळ काढला  तरी तो कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी पुरेसा आणि आरोग्यदायी ठरेल.

(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलाइफस्टाइल