Join us  

वेळ आहे कुठं तुला माझ्यासाठी!-असं म्हणत होणारी जोडीदारांची भांडणं टाळण्यासाठी काय उपाय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2023 3:25 PM

How to Spend Quality Time rather than Quantity Time with Partner : एकमेकांसाठी वेळच नसणं, असलेला वेळ पुरेसा न वाटणं यावरुन सतत खडाजंगी होत असेल तर करुन पाहा काही उपाय

मानसी चांदोरकर

नात्यामध्ये अनेकदा आपण एकमेकांना वेळ देतो पण हा वेळा क्वालिटी टाइम असतो का असा प्रश्न विचारला तर मात्र आपल्याकडे त्याचे उत्तर असतेच असं नाही. कारण आम्ही रोज एकमेकांसोबत रात्री राऊंड मारायला जातो. महिन्यातून एकदा छोट्याशा ट्रीपला जातो. बराच वेळ एकमेकांसोबत घालवण्याचा प्रयत्न करतो. हा वेळ क्वांटीटी टाइम असू शकतो पण क्वालिटी असतो का या प्रश्नाचे उत्तर अनेकदा आपल्यालाही माहित नसते. क्वांटिटी टाईम" - म्हणजे एकत्र घालवलेला खूप वेळ. आणि "कॉलिटी टाईम"- म्हणजे थोड्याच काळापुरता पण अत्यंत सुंदर असा एकत्र घालवलेला वेळ. 

सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येकालाच असे वाटते की मी आपल्या जोडीदाराबरोबर अजिबात वेळ घालवू शकत नाही. त्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. अनेकदा यावरून बऱ्याच जोडीदारांमध्ये वाद होताना दिसतात. तो किंवा ती मला अजिबात वेळ देत नाही, सतत स्वतःच्या कामातच असतात, माझी साधी विचारपूसही करत नाही, की माझी कोणती हौस भागवत नाही, माझी कोणती इच्छा पूर्ण करत नाही, अशा प्रकारच्या एक ना अनेक तक्रारी प्रत्येक कुटुंबामध्ये ऐकायला मिळतात. आपल्या जोडीदाराला कामाचा खूप ताण आहे, आपल्या मुलांसाठी तसेच घरातील इतर गोष्टींसाठी आर्थिक घडी बसवणे खूप महत्त्वाचे आहे. हे प्रत्येकाला समजत असले तरी जोडीदाराने आपल्यालाही वेळ द्यायलाच हवा असे प्रत्येकालाच वाटत असते पण हा वेळ कसा द्यावा हे प्रत्येकालाच पडलेले कोडे आहे. चला तर हे कोडे सोडवण्याचा प्रयत्न करू.

- मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या जोडीदाराने आपल्याबरोबर खूप वेळ घालवला म्हणजेच त्याने आपल्याला वेळ दिला असे नाही तर त्याच्याबरोबर थोडाच वेळ घालवायला मिळाला पण तो अत्यंत सुंदर गेला तर तोही एकत्र घालवलेला वेळच असतो.

- आपला जोडीदार दिवसभरात आपल्याशी अर्धा तास बोलला म्हणून नाराज होण्यापेक्षा त्या अर्ध्या तासात आपण काय काय बोललो तो वेळ आपण कसा घालवला हे महत्त्वाचे.

- हा वेळ घालवताना आपण एकमेकांची आपुलकीने चौकशी केली का, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी मनापासून दाद दिली का, समोरच्याचे म्हणणे डोक्यात राग न घालून घेता ऐकून घेतले का, त्याची विचारपूस केली का? हा देखील एकत्र घालवलेला वेळच असतो.

- आपण जोडीदाराबद्दलचे आपले प्रेम, काळजी, आपुलकी आपल्या संवादातून, आपल्या स्पर्शातून त्याच्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते.

(Image : Google)

- त्याची समस्या जाणून घेऊन त्याला मनमोकळे करण्यासाठी कान देणे हा देखील एकमेकांसाठी दिलेला वेळच असतो. यालाच तर "क्वालिटी टाईम" म्हणतात. 

- अनेकदा असे होते की आपण दिवसभर एकमेकांबरोबर घालवतो पण त्या संपूर्ण दिवसात आनंद मिळावा, समाधान वाटावे, मज्जा वाटावी असे काहीच घडलेले नसते. मग त्या संपूर्ण दिवस घालवलेल्या वेळाला काय अर्थ आहे?

- त्या ऐवजी अर्धा तास पण समोरच्याचा विचार करून आपल्या भावना व्यक्त करून आपल्यातले गैरसमज, दुरावा दूर करण्यासाठी प्रयत्न केला तर तो अर्धा तासही आपल्याला पुरेसा असतो. याचाच अर्थ जोडीदाराबरोबर "क्वांटिटी टाईम" महत्त्वाचा नसून " क्वालिटी टाईम" महत्त्वाचा आहे. आणि तो आपण एकमेकांना सहज देऊ शकतो हे प्रत्येकाने जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हा "क्वालिटी टाईमच" आपल्यातले नातेसंबंध दृढ करण्यासाठी महत्त्वाचा असतो. चला तर मग आज पासून जोडीदाराबरोबर "क्वालिटी टाईम" व्यतीत करायला सुरुवात करूया. 

(लेखिका समुपदेशक आहेत)

संपर्क - 8888304759   इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप