Join us  

प्यार के मुफ्त साईड इफेक्ट्स! लैंगिक जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून महिलांनी काय काळजी घ्यायला हवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2023 5:29 PM

How To Take Care Of Sexually Transmitted Infections : लैंगिक जंतूसंसर्ग झाला तरी महिला त्रास अंगावर काढतात बोलत नाही, मात्र त्यासाठीच वेळीच उपचार घ्यायला हवेत.

डॉ. दाक्षायणी पंडित

मैत्रिणींनो, लैंगिक संबंध ही सर्व स्त्रीपुरुषांच्या जीवनातली एक अपरिहार्य गोष्ट आहे. पूर्वी सामान्यत: हे संबंध लग्नानंतर यायचे. आता परिस्थिती बदलली आहे. लैंगिक संबंध आणि लग्न या दोन गोष्टी बऱ्याचदा वेगळ्या किंवा स्वतंत्र असतात. त्याच्या कारणांचा आपण आत्ता विचार करणार नाही. पण स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर काही परिणाम होतात. ते म्हणजे ‘प्यार के साईड इफेक्टस’ किंवा प्रेमाचे दुष्परिणाम. आणि ते झाले की मग करावा लागतो तो ‘प्यार का पंचनामा’ कारण हे साईड इफेक्टस निस्तरायला तिसऱ्या माणसाची मदत घ्यावी लागते. ‘प्यार के साईड इफेक्टस’ पैकी महत्वाचा म्हणजे लैंगिक अवयवांना होणारा जंतुसंसर्ग. यातील दोघांपैकी एकजण जर संसर्गग्रस्त असेल तर लैंगिक संबंधाच्या प्रकाराप्रमाणे संसर्ग होणारा अवयव बदलतो (How To Take Care Of Sexually Transmitted Infections). 

जंतूसंसर्ग आणि त्रास?

लैंगिक संबंधांना मराठीत मैथुन/संभोग/समागम (इंग्रजीत इंटरकोर्स) म्हणतात. 

मैथुनाचे प्रकार - योनि-शिस्न मैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन. यातील मैथुनाच्या प्रकाराप्रमाणे योनि, मुख किंवा गुद्मर्गाचे मुख या अवयवांना संसर्ग होतो. हस्तमैथुन हा व्यक्तीने स्वत:च करण्याचा प्रकार असल्याने तो आजच्या लेखाच्या विषयाशी संबंधित नाही. 

(Image : Google)

मुलींना/महिलांना होणारे जंतुसंसर्ग 

१. रोगकारक जंतू - यात खालील अनेक प्रकारच्या जंतूंचा समावेश आहे

२. बुरशी किंवा कवक- कँडिडा अल्बिकान्स (सर्वात जास्त आढळणारी) ही एकपेशीय बुरशी व तिचे इतर जातभाई (एड्सच्या रुग्णांत सर्वाधिक प्रमाण)

३. विषाणू – अनेक जातीचे विषाणू हे काम करतात. 

४. लक्षणविरहित संसर्ग- हे शरीराची अतिरिक्त प्रमाणात वाट लावतात तेव्हाच लक्षणं निर्माण होतात. उदा. ब, क, व ड प्रकारच्या रक्तातील काविळीचे विषाणू, एड्सचा विषाणू, गर्भाशय मुखाचा कर्करोग निर्माण करणारा विषाणू  

५. संसर्गानंतर लगेच लक्षणे निर्माण करणारे विषाणू – जननेंद्रियांच्या नागिणीचा विषाणू,

६. जीवाणू –परमा या रोगाचे जीवाणू -गोनोकोक्काय; उपदंश किंवा गरमीचे जीवाणू- ट्रिपोनिमा;  

७. क्लॅमिडिया नामक जीवाणू, गार्डनरेला व्हजायनॅलिस

८. परजीवी- परजीवी ट्रायकोमोनास व्हजायनॅलिस  

हे आपल्याला कशासाठी माहीत असावे?

१. बऱ्याच जंतूंचा प्रतिबंध शक्य आहे.

(Image : Google)

२. अनेक जंतूंवर प्रभावी औषधयोजना उपलब्ध आहे

३. डॉक्टरांकडे जाण्यास उशीर केल्यास संसर्ग वाढत जाऊन अधिक शारिरीक हानी होते. 

४. लक्षण विरहित संसर्ग गुपचूप शरीर पोखरून खूप नुकसान झाल्यावरच लक्षात येतात.

५. गर्भारपणाच्या काळात संसर्ग झाल्यास जंतू गर्भालाही इजा पोचवू शकतात.

६. काही संसर्ग उपचार करायला सोपे पण लक्षणे तीव्र आणि चारचौघात लाज वाटायला लावणारे उदा. योनीमार्गाच्या मुखाशी खाज येणे. 

७. हे संसर्ग आपल्याकडून आपल्या लैंगिक मित्र, पती यांना सहज मैत्रीची भेट म्हणून नकळत दिले जातात.

तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला ‘प्यार के हे मुफ्त के साईड इफेक्टस’महत्वाचे आहेत आणि प्रेम करताना काळजी घेतली पाहिजे हे नक्की पटलं असेल. तुम्ही वाचा आणि तुमच्या ओळखीच्या मुली-मैत्रिणींनाही सांगा. चला, भेटू या पुढच्या लेखात.

(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )

टॅग्स :लैंगिक आरोग्यरिलेशनशिपरिलेशनशिपआरोग्यहेल्थ टिप्स