सर्वत्र गुलाबी वातावरण आहे, गुलाबी हवा, गुलाबी महिना, गुलाबी प्रेमाची चाहूल, त्यात प्रेमीयुगुलांच्या हातात लाल गुलाब. सगळीकडे प्रेमळ वातावरण झालं आहे. ७ तारखेपासून सुरु होणाऱ्या व्हॅलेंटाईन्स विकचा माहोल १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत चालतो. या दिवसात रोज डे, टेडी डे, प्रॉमिस डे, असे दिवस प्रेमी युगुल साजरा करतात. आज १२ फेब्रुवारी, सगळे जण आपल्या प्रियजणांना कवेत घेऊन हग डे साजरा करत आहेत. या प्रेममय झालेल्या वातावरणात आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठीत घेऊन त्यांना आपल्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद करा. आपल्याला आठवतं का? जेव्हा मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात मुन्ना म्हणजेच अभिनेता संजय दत्त प्रत्येकाला ''जादू की झप्पी'' द्यायचा. त्याने मिठी मारली की समोरच्या व्यक्तीचे टेन्शन झटकन पळून जायचे.
मिठी मारण्याचे अनेक फायदे आहेत. यासंदर्भात ''शिबा टेल हाशोमर या ग्लोबल पेशंट सर्विस'' वेबसाईटनुसार, आयुष्यात प्रेमळ स्पर्श हवा. आपुलकी आणि काळजी दर्शवणारा मार्ग म्हणजे मिठी. मिठीमुळे आपल्याला फक्त उत्तम वाटत नाही तर, मिठीमुळे आरोग्य आणि शारीरिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत.''
मिठी मारण्याचे फायदे :
मिठी मारल्याने तणावाची पातळी कमी होते
मिठी मारणे यासह शारीरिक संबंधांमुळे शरीरातील कॉर्टिसॉल सारख्या तणाव हार्मोन्सची पातळी कमी होते. तणाव संप्रेरकांच्या उच्च पातळीमुळे झोपेच्या समस्या, त्वचेच्या समस्या, लठ्ठपणा, कमी रोगप्रतिकारशक्ती यासह बरेच काही समस्या शरीरात उद्भवतात. त्यामुळे आपल्या प्रियजणांना मिठी मारा आणि तणावाची पातळी कमी करा.
मिठी मारल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते
वारंवार मिठी मारल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. यासह रक्तदाब कमी होण्यास मदत होते, हृदयविकार, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका देखील कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मिठी मारा.
मिठी मारल्यामुळे आत्मसन्मान वाढते
स्पर्श ही एक अशी भावना आहे, ज्यामुळे आपण जितक्या तणावात असो तो तणाव झटकन दूर होतो. यासाठी योग्य व्यक्तीची मिठी हवी. जेव्हा आपण निराश राहतो तेव्हा एक मिठी आपल्याला त्या नैराश्यातून बाहेर काढते. यामुळे आपण सकारात्मकतेच्या दिशेने चालतो, यासह आत्मसन्मान देखील वाढतो.
मिठी मारल्याने नातेसंबंध सुधारतात
मिठी दोन मुख्य कारणांमुळे सर्व प्रकारच्या नातेसंबंधांसाठी फायदेशीर ठरू शकते. मिठी भावना व्यक्त करतात. जे शब्द व्यक्त करू शकत नाहीत. दुसरे कारण म्हणजे शारीरिक स्पर्शामुळे "लव्ह हार्मोन" ऑक्सिटोसिन बाहेर पडतात, ज्यामुळे बंध आणि विश्वास सुधारते, यासह लोकांमध्ये जवळीक भावना निर्माण करते.
मिठी मारल्याने वेदना कमी होतात
जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा आपले शरीर एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स "फील गुड" सोडतात, यामुळे आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. या दोन गोष्टी नैसर्गिक वेदना निवारक आहेत. याचा फायदा दीर्घकाळापर्यंत भावनिक वेदना सहन करणाऱ्यांना होतो.