प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे आपण नेहमी ऐकतो. पण प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे तितकाच खंबीरपणे उभा राहणारा पुरुष असतो याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. हल्ली स्त्रियाही घराबाहेर पडत असताना घरातील कित्येक कामांची जबाबदारी पुरुष अगदी स्वखुशीने घेताना दिसतात. महिला असली म्हणून काय झाले, तिलाही तिचे करिअर, ध्येय, इच्छा-आकांक्षा आहेत हे लक्षात घेऊन पुरुषांकडून सकारात्मक सोबत मिळत आहे. हे चित्र अभावानेच दिसत असले तरी किमान त्याची सुरुवात झाली हेही नसे थोडके. महिलांना लग्नानंतर उच्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा नोकरीतील एखाद्या बढतीसाठी घरातून पाठिंबा मिळणे ही आजही आपल्याकडे कौतुकास्पद गोष्ट आहे. नुकतेच याचे एक उदाहरण पाहायला मिळाले ज्यामुळे आपल्याला नक्कीच कौतुक वाटू शकते.
पत्नीला न्यायाधीश पदाची परीक्षा द्यायची असल्याने एका पतीने आपल्या बॅंकेतील उच्चपदस्थ नोकरीवर पाणी सोडले. मुलांची जबाबदारी घेण्यासाठी या दोघांनी हा निर्णय घेतला असून त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेकदा पुरुषांना नोकरीत बदली किंवा बढती मिळत असेल आणि मुलांची किंवा घरातील इतर गोष्टींची जबाबदारी असेल तर महिला एक पाऊल मागे टाकत आपल्या करिअरवर पाणी सोडते. कितीही पदव्या घेतल्या तरी संसार ही महिलांचीच प्रमुख जबाबदारी असल्याचे समजत आजही मुलांसाठी महिलांनाच नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊन घरात थांबावे लागते. मात्र मुलांची जबाबदारी घेण्यासाठी वडिलांनी नोकरी सोडणे ही खरंच आजच्या काळातही खास गोष्ट आहे.
रोहतकमधील मंजूला भालोटीया यांना हायर ज्यूडिशियल सर्व्हीस एक्साम द्यायची होती. ही परीक्षा देण्यासाठी त्यांना अभ्यास आणि एकूण तयारीची आवश्यकता होती. मात्र घर सांभाळून हे करणे शक्य नव्हते. अशावेळी मंजूला यांचे पती सुमित अहलावत यांनी आपली बँकेतील नोकरी सोडून घर आणि मुलांची जबाबदारी घ्यायचे ठरवले. याचा परिणाम म्हणजे या परीक्षेत मंजूला पहिल्या आल्या असून त्या जज बनल्या आहेत. जयपूरच्या असलेल्या मंजूला यांनी युनायटेड किंग्डम येथून एमबीएची पदवी घेतली त्यानंतर त्यांनी बार्कलेज बँकमध्ये नोकरी करत असताना राजस्थानमधून एलएलबीची पदवी घेतली. सुमित यांच्याशी ओळख झाल्यावर या दोघांनी लग्न केले. सुमित एका बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून नोकरी करत होते. मात्र त्यांनी मंजूला यांना कायम पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. २०१६ मध्ये मंजूला यांनी कायद्याशी निगडीत परीक्षा देण्याचे ठरवले तेव्हा सुमित यांनी घराची आणि मुलांची जबाबदारी घेण्याचे ठरवत नोकरी सोडली. अखेर २०२२ मध्ये मंजूला यांनी उत्तर प्रदेश न्यायिक सेवेची परीक्षा देत त्यामध्ये पहिला क्रमांक मिळवला.