शारीरिक संबंध ही एक अतिशय सुखावह आणि नाजूक गोष्ट आहे. आपण त्यामध्ये भावनिक, मानसिकरित्या गुंतलेलो असल्याने ती केवळ शरीराची गरज न राहता त्यापलिकडे काहीतरी असते हे नक्की. असे असले तरी शारीरिक संबंधांबाबत बऱ्याच जोडप्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कधी आपल्याला जोडीदाराच्या अपेक्षा समजत नाहीत तर कधी एक काम म्हणून ही क्रिया केली जाते. पण असे न करता शारीरिक संबंधांतून पुरेसा आनंद मिळवायला हवा असेल तर त्यामध्ये एकरुप होणे आवश्यक असते. आता एकरुप व्हायचे म्हणजे नक्की काय तर, प्रसिद्ध अभिनेत्री लीझा मंगलदास याबाबत स्पष्टीकरण देत एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. सेक्स संदर्भात सकारात्मक आणि जीवनाशी निगडीत लेखन करण्यासाठी त्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी आपल्या फॉलोअर्सना काही महत्त्वाच्या टिप्स देत असतात. आता यावेळी त्या कोणती गोष्ट सांगतात पाहूया.
सेक्स करताना ही गोष्ट लक्षात ठेवा
सेक्स करणे ही शरीराची आणि मनाची गरज असली तरी सेक्सच्या आधी किंवा सेक्सदरम्यान एकमेकांशी संवाद साधणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स करताना तुमच्या दोघांमध्ये छान संवाद असेल तर तुम्ही ही क्रिया, तुमचे नाते आणखी छान पद्धतीने फुलवू शकता. सेक्समध्ये फोरप्ले करणे, एकमेकांना खूश करणे हे जितके महत्त्वाचे आहे तितकाच संवाद साधणे हेही महत्त्वाचे असल्याचे लिझा सांगतात. तुम्ही पहिल्यांदा सेक्स करा किंवा १०० व्यांदा त्यातील रोमान्स, उत्साह कायम ठेवायचा असेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरशी सेक्सच्या विषयावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर संवाद साधायला हवा. त्यामुळे तुम्हाला या क्रियेचा पूर्ण आनंद घेता येऊ शकतो.
संवाद नेमका कशा स्वरुपाचा असावा?
सेक्सनंतर आपल्याला ताण कमी झाल्यासारखे किंवा रिलॅक्स झाल्यासारखे वाटते. याचे कारण सेक्सच्या प्रक्रियेत आपल्या शरीरात तयार होणारे हार्मोन्स हे असते. याला तुम्ही संवादाची जोड दिली तर सर्वार्थाने तुमचे शारीरिक संबंध अधिक चांगले होतील. यासाठी तुम्ही जोडीदाराशी शरीर, सुखाच्या किंवा आनंदाच्या तुमच्या कल्पना आणि सेक्सविषयीच्या तुमच्या भावना याविषयी बोलू शकता. तुम्हाला शरीराच्या कोणत्या भागावर आणि कशाप्रकारे प्रेम केलेले आवडते याबाबत संकोच न करता जोडीदाराशी बोला. सेक्स करताना तुम्हाला कोणती गोष्ट जास्त वेळ केलेली आवडेल आणि कोणती गोष्ट केलेली आवडणार नाही हे स्पष्टपणे सांगा. तुम्हाला सेक्सचा आनंद मिळाला तो क्षण कसा होता याबाबत चर्चा करा. तुमच्या कल्पनेतील सेक्सची संकल्पना, प्रत्यक्ष अनुभव आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीबाबत उत्सुकता आहे हेही समोरच्याला मोकळेपणाने सांगा. यामुळे तुमचे सेक्स लाईफ जास्त सुदृढ होण्यास मदत होईल आणि तुम्ही त्याचा पूर्णपणे आनंद घेऊ शकाल.
संवाद साधण्याचा कसा फायदा होईल?
वरील गोष्टींबाबत तुम्ही तुमच्या जोडीदाराशी संवाद साधला तर तुम्ही नकळत त्या व्यक्तीसोबत अधिक कम्फर्टेबल व्हाल. यामुळे तुम्हाला आपल्या जोडीदाराबरोबर सुरक्षित तर वाटेलच पण हा प्रवास अधिक सुखाचा आणि आनंद देणारा होईल असे लिझा म्हणतात. कम्युनिकेशन हा फोरप्लेमधील एक महत्त्वाचा भाग असल्याचेही त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात. अशाप्रकारे सेक्स करताना संवाद साधल्याने तुम्हाला केवळ आनंद मिळेल असे नाही तर तुम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकता आणि त्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल.