Join us  

माझ्या मनातलं तुला ओळखताच येत नाही?- कायम जोडीदाराची तक्रार, वाचा 5 गोष्टी, मनातलं ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 12:47 PM

जोडीदाराशी जमवून घ्यायचे असेल तर त्याची भावनिक स्थिती समजयलाच हवी ना....

ठळक मुद्देजोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिले तर तुम्हाला नाते सांभाळणे जाईल सोपे भावना समजून घेण्यासाठी मिळू शकतात संकेत

जोडीदाराशी असणारे नाते जास्तीत जास्त घट्ट असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपण एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देणं, त्यांच्यासाठी लहानमोठ्या काही गोष्टी करणं असं सगळं वेळात वेळ काढून करत असतो. तरी एक वेळ अशी येतेच जेव्हा माझ्या मनात काय चालू आहे हे तुला कधीच ओळखता येत नाही असं जोडीदारांपैकी दोघांनाही वाटतं. अशा तक्रार काही जण एकमेकांना बोलून दाखवतात तर काही जण न बोलता रुसून, चिडून, अबोला धरुन व्यक्त करतात. त्यामुळे समोरच्याच्या मनातील भावना ओळखणे कोणत्याही नात्यात अतिशय गरजेचे असते. समोरच्याला आता काय वाटत असेल याचा अंदाज बांधता येणे म्हणजेच त्या व्यक्तीला ओळखणे. आता हा अंदाज बांधण्यासाठी आपल्याला काही ठोकताळे तर बांधावे लागतीलच ना. तुम्हाला तुमच्या जोडीदाराची भावनिक स्थिती नेमकी जाणून घ्यायची असेल तर ५ गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. कसे ते पाहूया...

१. देहबोली (बॉडी लँग्वेज) 

समोरच्याची देहबोली कशी आहे ते ओळखायला शिका. त्याच्या डोळ्यातील भाव, चेहऱ्यावरील भाव, हातवारे आणि शरीराची ठेवण कशी आहे हे नीट पाहा. त्यावरुन त्या व्यक्तीचा मूड कसा आहे हे समजण्यास मदत होईल. तुमचा जोडीदार काय विचार करतोय, त्याच्या आताच्या भावना काय असू शकतात हे समजायला देहबोलीची नक्कीच मदत होते. त्यामुळे तुमचा जोडीदार वरुन हसत असेल पण ते हसू खरे नसेल तर तुम्हाला ते सहज ओळखता येऊ शकते. त्यामुळे त्या विशिष्ट वेळेला तुम्हाला जोडीदाराशी कसे वागायला हवे याचा अंदाज येऊ शकतो आणि तुमच्यातील वाद किंवा भांडणे यांचे प्रमाण कमी होऊ शकते. 

२. डोळे वाचा 

आपले डोळे आपल्या मनातील भाव सांगण्यासाठी पुरेसे बोलके असतात. आपण निराश, दु:खी असू तर ते भाव किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप आनंद झाला असेल. किंवा आपल्याला आता जोडीदाराच्या मिठीत शिरावेसे वाटते असेल तर असे सगळे भाव आपल्या डोळ्यात दिसून येतात. तुम्ही जोडीदाराला भेटाल तेव्हा त्याच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करा. त्याच्या डोळ्यांतील भाव तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगून जातील आणि तुमचा पुढचा संवाद सोपा होऊन जाईल. डोळे कधीच खोटे बोलत नसल्याने समोरच्याचे भाव समजून घेण्यासाठी हे एक महत्त्वाचे माध्यम असू शकते. 

३. बोलण्याचा  टोन समजून घ्या 

रिलेशनमध्ये असताना आपण एकमेकांशी सतत फोनवर बोलणे किंवा एकमेकांना भेटणे पसंत करतो. सारखे मेसेजवर चॅटींग करण्यापेक्षा आपल्याला थेट बोलणे जास्त गरजेचे वाटते. याचे कारण म्हणजे बोलण्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा टोन लक्षात येतो आणि त्यामुळे आपण त्याच्या आताच्या मूडचा, भावनिक स्थितीचा अंदाज घेऊ शकतो. तुमचा आवाज कणखर आणि थोडा मोठा असेल तर तुम्ही रागावलेले आहात हे समोरच्याला समजते, पण हाच आवाज जर एकदम प्रेमळ असेल तर तुम्ही प्रेमात आले आहात हे ओळखणेही सोपे जाते. तुमच्याकडे एखाद्या गोष्टीबाबत किती आत्मविश्वास आहे हे कळण्यासाठीही तुमचा टोन महत्त्वाचे काम करत असतो. त्यामुळे तुम्ही समोरच्याच्या आवाजाचा टोन योग्य पद्धतीने ओळखत असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीशी कसे वागायचे, बोलायचे आहे हे समजायला सोपे जाते. 

४. ऊर्जेकडे लक्ष द्या 

तुमच्यात किती ऊर्जा आहे हे समोरच्याला समजले तर तुमच्याशी कसे डील करायचे याचा अंदाज येऊ शकतो. तुमचे विचार आणि इंटेंशन यावर तुमच्या एनर्जीची लेव्हल अवलंबून असते. तुम्ही एखाद्याशी बोलत असाल तर तो बोलत असलेल्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट आहे की नाही हे तुमच्या एनर्जीवरुन लक्षात येते. तुमची भावनिक आणि मानसिक स्थिती समोरच्या व्यक्तीवर परिणाम करत असल्याने त्या व्यक्तीमध्ये किती एनर्जी आहे हे ओळखून तसे वागल्यास त्याचा तुमचे नाते घट्ट होण्यास फायदा होतो. 

५. श्वासोच्छवास कसा आहे बघा 

तुमचा जोडीदार आता कोणत्या विचारात आहे किंवा त्याची मनस्थिती काय आहे हे तुम्हाला लक्षात येत नसेल तर त्याच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या. त्यावरुन तुम्हाला त्याच्या भावना समजणे सोपे होईल. तुमचा जोडीदार एखाद्या तणावात असेल तर त्याचा श्वासोच्छवास लहान असेल. म्हणजेच ती व्यक्ती घाईने श्वास घेत आणि सोडत असेल. अशावेळी त्या व्यक्तीला आपल्याला ज्या गोष्टीबद्दल तो तणावात आहे ती गोष्ट सांगायची नाही हे लक्षात घ्या. तसेच जर समोरची व्यक्ती एकदम शांत असेल तर ती खूप निवांत श्वास घेत असेल हेही लक्षात घ्यायला हवे. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप