आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यात एकत्र कुटुंबपध्दती म्हणजे खूप मोठी जबाबदारी, ताण असा समज प्रामुख्यानं आढळतो. घरात दोघेही नोकरी करणारे असले की कुटुंब लहान असलं तर बरं असं वाटायला लागतं. पण एक अभ्यास हे दाखवून देतो की एकत्र कुटुंबपध्दती ही नोकरदार जोडप्यांसाठी अडचण नसून उलट सोय आहे. या एकत्र कुटुंबपध्दतीने धावपळ वाढत नाही उलट कामाचा ताण वाटून घेऊन हलकेपणा अनुभवण्याचा अवकाश मिळतो असं अभ्यासक म्हणतात. एकत्र कुटुंबपध्दतीचे नोकरदार जोडप्यांना होणारे फायदे अनेक आहेत.
छायाचित्र- गुगल
नोकरदार जोडपं -एकत्र कुटुंबपध्दती
1. एकत्र कुटुंबपध्दती असेल तर घरातल्या सर्व कामांची जबाबदारी एकट्यावरच पडत नाही. नोकरीच्या वेळेप्रमाणे घरातील सदस्य आपआपसात कामं वाटून घेतात. त्यामुळे घरी दारी दमछाक होणं हा अनुभव एकत्र कुटुंबपध्दतीतील स्त्रियांना येत नाही. शिवाय काही संकट आलं तर त्यामुळे मानसिक ताण वाटला जातो.2. नोकरदार जोडप्यांची मुला बाळांच्या बाबतीत खूप धावपळ आणि ओढाताण होते. आई बाबा मुलांना नीट वेळ देऊ शकत नाही, त्यांना सांभाळण्यासाठी व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही. आपल्या मुलांवर संस्कार करता येत नाही ही खंत त्यांना सलत असते. पण नोकरदार जोडपं जर एकत्र कुटुंबपध्दतीत राहात असेल तर मात्र आपण कामाला बाहेर पडतो तेव्हा आपली मुलं घरात एकटी आहेत ही काळजी त्यांना नसते. मुलं आजी आजोबा, काका काकू यांच्या सान्निध्यात असल्यानं मुलांच्या सुरक्षिततेबाबत आई बाबा निर्धास्त राहातात. एकटं राहून मुलांवर काय संस्कार होतील ही धास्ती आई बाबांना वाटत नाही. शिवाय आपण नोकरीमुळे मुलांना वेळ देऊ शकत नाही हा आईबाबांच्या मनातला अपराधीभाव एकत्र कुटुंबपध्दतीने गळून पडतो. आई बाबा आपल्या वाट्याला जास्त येत नाही म्हणून मुलं चिडचिडत नाही. कामावरुन थकून भागून घरी आल्यावर मुलांचे हासरे चेहेरे, घरातलं आनंदी वातावरण नोकरदार जोडप्यांना मानसिक समाधान देतं.
छायाचित्र- गुगल
3. नोकरदार जोडप्यासाठी एकत्र कुटुंबपध्दती घरातल्या कामांच्या जबाबदार्या हलक्या होण्यासाठी जसं सोयीचं, सुखाचं आणि आधाराचं असतं तसंच ते आर्थिक बाबतीतही दिलासा देणारं असतं. काही आर्थिक संकट आल्यास सगळा भार एकट्या जोडप्यावर न पडता अख्खं कुटुंब हा भार हलका करण्यासाठी उभं राहातं. एखाद्या कारणानं दोघांमधल्या एकाची नोकरी गेली तरी आर्थिकदृष्ट्या गर्भगळीत होण्याची अवस्था निर्माण होत नाही. कुटुंबातील इतर सदस्य आम्ही आहोत नका ताण घेऊ हे सांगायला आणि आर्थिक भार वाटून घ्यायला सोबत असतात.नोकरदार जोडप्यासाठी या तीन गोष्टी असतात महत्त्वाच्या. या तीन गोष्टींचा आधार एकत्र कुटुंबपध्दतीमधून मिळत असल्याने अभ्यासक नोकरदार जोडप्यांसाठी एकत्र कुटुंबपध्दती फायदेशीर असल्याचं सांगतात.