Join us  

घरात, जोडीदाराशी सतत कटकट होते, भांडणं होतात? 4 उपाय, जगा आनंदात; टाळा भांडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 2:14 AM

कोणत्याही कारणानं जोडीदारासोबत भांडणाच्या मोडमधे जाण्याआधी उपाय केलेत तर पुढे होणारं- वाढणारं भांडण टाळता येऊ शकतं, थोडक्यात मिटवता येऊ शकतं.

ठळक मुद्देमेसेज करुन भांडण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटल्यानंतर बोलणं हा मार्ग वापरल्यास वाढणारं भांडणं थांबवता येतं.भांडताना स्वत:ला थांबवून आपण जे बोलतो आहोत ते योग्य आहे का हे विचारावं.जोडीदारासोबत झालेल्या भांडणाचा  राग ठेवून झोपू नये.

नवरा बायकोचं नातं म्हणजे वादविवाद, भांडण, मतभेद, रुसवे फुगवे होतातच. भांडल्यानं प्रेम वाढतं असंही मजेनं या नात्यातील भांडणाबद्दल बोललं जातं. पण सतत होणाऱ्या भांडणांमुळे प्रेम वाढत नाही तर कटुता निर्माण होते. दोघांमधे दुरावा निर्माण होतो. ही सततची भांडणं ही टाळलेलीच बरी. हे ऐकण्यास, समजण्यास योग्य वाटलं तरी प्रत्यक्ष कृतीत उतरवणं अवघड होतं. शब्दाने शब्द वाढत जातात आणि नवरा बायकोची भांडणं टोक गाठतात. आता तर भांडणासाठी एकमेकांच्या समोर असण्याचीही गरज नाही. मेसेज, मेल याद्वारेही नवरा बायकोत कडाक्याचं भांडण होतं. सततच्या भांडणामुळे, त्यातून निर्माण होणाऱ्या तणावामुळे आपण , घरातले इतर सदस्य वैतागतात. हा वैताग कमी करण्याचा मार्ग म्हणजे भांडण टाळणं. भांडणं  करणं जितकं सोपं तितकं अवघड काम म्हणजे भांडण टाळणं.पण ते टाळता येतं. कोणत्याही कारणानं जोडीदारासोबत भांडणाच्या मोडमधे जाण्याआधी उपाय केलेत तर पुढे होणारं- वाढणारं भांडण टाळता येऊ शकतं, थोडक्यात मिटवता येऊ शकतं. यासाठी 4 उपाय आहेत.. हे उपाय आधी नीट समजून घेतले तर नंतर प्रत्यक्ष त्याचा अवलंब करण्यास सोपे जाईल.

Image: Google

.. तर भांडणं टाळणं शक्य आहे!

1. बोलता बोलता भांडण होतं, विकोपाला जातं, हे माहीत असतं, काही प्रमाणात अनुभवलेलंही असतं. पण मेसेज करता करताही भांडणं पेटतं. मेसेज करताना रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरले गेले तर त्यामुळे जोडीदार आणखी दुखावला जातो. बोलले शब्द हवेत विरुन जातात. पण लिहिलेला शब्द टिकतो आणि तो दुखावणारा असेल तर खुपतोही. तू असं बोलली होतीस, किंवा मी असं बोललीच नव्हते असं बोलण्याची सोय  मेसेजद्वारे भांडल्यास राहात नाही. आपण वापरलेले शब्द जोडीदार दाखवतो. यामुळे मतभेद आणि मनभेद आणखी वाढतात. त्यामुळे मेसज करुन वाद वाढण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात भेटू तेव्हा बोलू असं म्हणून भांडणाचा विषय तिथेच थांबवावा. यामुळे आपला  समजूतदारपणा, संयम जोडीदारास लक्षात येऊन राग/ भांडण / मतभेद निवळण्यास मदत होते.

Image: Google

2. जोडीदारनं आपल्याला अमूक बोलून आपलं मन दुखावलं म्हणून   आपण त्याच्या/ तिच्या मनाला लागेल असं टोकाचं बोलणं म्हणजे परतफेड करणं नव्हे. उलट दुखवाणऱ्या शब्दांची परतफेड करताना वापरले जाणारे शब्द हे जास्त घातक आणि नवरा बायकोच्या नात्यावफ परिणाम करणारे असतात असं तज्ज्ञ म्हणतात. त्यामुळे आपण जे शब्द वापरणार आहोत  ते वापरण्याआधी खरंच हे वापरण्याची गरज आहे का हे स्वत:ला  विचारावं. असं थांबून थोडं आत्मपरीक्षण केल्यास  घातक आणि वाईट शब्दांचा वापर करण्याचा धोका टळतो.

Image: Google

3. भांडण झालं तर ते पटकन थांबवता आणि विसरुन जाऊन पुढे जाता आलं पाहिजे. सकाळी झालेल्या भांडणाचा राग दिवसभर मनात ठेवणं, रात्री झोपतानाही जोडीदारासोबतच्या भांडणाचा राग मनात ठेवून झोपणं हे चुकीचं आहे. झोपण्याआधी जोडीदारासोबत भांडण झालं असल्यास, ते भांडण मनात ठेवून दुसऱ्या दिवशी उठून पुन्हा चालू ठेवल्याने नातं बिघडतं. ते टाळण्यासाठी भांडण विसरावं. मन शांत करुन झोपावं. तज्ज्ञ म्हणतात शांत झोपणं किंवा थोडा वेळ बाहेर पडुन चालून येणं हा भांडण थांबवण्याचा उत्तम उपाय आहे. या उपायानं भांडणं टाळून दोघांमधील प्र्श्न सोडवण्याचा मार्ग मिळाल्याचे पुरावे अभ्यासक आणि तज्ज्ञांकडे आहेत.

Image: Google

4. जोडीदाराला अनेकदा आपल्याला काय आवडतं, काय खटकतं याची कल्पना नसते. त्यामुळे नुसतं चिडून , रागवून भांडण करण्यापेक्षा आपल्याला भावनेच्या पातळीवर काय वाटतं हे  जोडीदाराला नीट उलगडून सांगावं, यामुळे जोडीदाराला राग, संताप, वाद याच्या कारणाचा उलगडा होतो आणि भांडण टोकदार होण्यापूर्वीच ते बोथट होवून थांबतं.जोडीदारासोबत सतत भांडण होत असल्यास , नेहमीच्या भांडणानं नात्यातलं  प्रेम आटत असल्याची भावना निर्माण झाल्यास दोघांमधले भांडणं वाढण्यापासून थांबवणारे  वरील 4 उपाय नक्की करुन पाहावेत. हे उपाय सहज जमतील असेच आहेत.. एकदा वापरुन तर पाहा!

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपपती- जोडीदार