इंदुमती गणेश
तरुण-तरुणी प्रेमात आकंठ बुडाले की, प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनं दिली जातात, माझं प्रेम जास्त की, तुझं याचे प्रतीक म्हणून शरीरावर कायमस्वरुपी टॅटू काढला जातो, आणि प्रेमभंग झाला की, हेच टॅटू काढून टाकण्यासाठी सहा महिने डॉक्टरांकडे फेऱ्या मारत बसण्याची वेळ येते. हौस-मज्जा म्हणून कोरले जाणारे हे टॅटू काढून टाकताना मात्र उपचारांच्या दिव्यातून जावे लागते, शिवाय येणारा खर्चही मोठा असतो. असे टॅटू काढून घेण्यासाठी तरुण-तरुणी डॉक्टरांकडे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे.
(Image : Google)
सध्या तरुण मुला-मुलींमध्ये हात, मान, मनगट, गळ्याच्या खाली, खांदा अशा शरिराच्या वेगवेगळ्या भागावर टॅटू काढून घेण्याची क्रेझ आहे. विशेषत: नुकतंच प्रेमात पडलेले, लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय काही दिवसांनी लग्न होणार आहे, अशा वेगवेगळ्या जोडप्यांसाठी हा टॅटू म्हणजे आपल्या प्रेमाचं प्रतीक असा समज आहे. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी टॅटू काढला जातो. पुढे मतं जुळत नाही, कौटुंबिक वाद किंवा अन्य काही कारणाने प्रेमभंग होतो, लग्न मोडतं, जुन्या आठवणी विसरायच्या असतात पण, शरीरावर कायमस्वरुपी गोंदलेल्या टॅटूचे काय करायचं? असा प्रश्न येतो. मुलं-मुली महाविद्यालयातील मित्र-मैत्रिणींचे टॅटू बघून स्वत: देखील काढून घेतात,पालकांना कळले की, अकांडतांडव होतो मग, तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन ट्रिटमेंट करावी लागते.
टॅटू काढून घेताना जेवढा खर्च येतो त्याच्या दुप्पट-तिप्पट खर्च तो काढून टाकण्यासाठी येतो, जो त्याच्या आकारावर ठरतो. टिकली एवढा टॅटू असेल तर, एकावेळी अडीच ते ३ हजार खर्च येतो. अशा रीतीने दोन महिन्यांच्या अंतरावर तीन ते चार वेळा उपचार करावे लागतात.
कोल्हापूरचे प्लास्टीक ॲन्ड लेसर सर्जन डॉ. उद्धव पाटील सांगतात..
पूर्वी टॅटू रिमूव्ह करताना त्वचा खरडून काढली जायची. त्यावरील जखम भरली तर, पुन्हा खरडायची असा प्रकार होता. त्यामुळे व्रण पडायचे. आता अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञान उपलब्ध आहे. यामध्ये टॅटूच्या कार्बनचा प्रत्येकवेळी बारीक भुगा केला जातो. तीन-चार वेळा उपचार केल्यानंतर त्वचा पूर्वीसारखी होते.