Lokmat Sakhi >Relationship > दोघांपैकी एकजण जग आधी सोडून गेला, तर दुसऱ्यानं जगायचं कसं? दु:खातून सावरायचं कसं?

दोघांपैकी एकजण जग आधी सोडून गेला, तर दुसऱ्यानं जगायचं कसं? दु:खातून सावरायचं कसं?

जन्माचे साथीदार, पण एक आधी जगाचा निरोप घेतो. एकटेपणाचं दु:ख छळतं अशावेळी काय करायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2024 10:00 AM2024-01-26T10:00:00+5:302024-01-26T10:00:02+5:30

जन्माचे साथीदार, पण एक आधी जगाचा निरोप घेतो. एकटेपणाचं दु:ख छळतं अशावेळी काय करायचं?

if you loss your life partner? how to deal with loneliness and grief after death of your spouse? how to live life? | दोघांपैकी एकजण जग आधी सोडून गेला, तर दुसऱ्यानं जगायचं कसं? दु:खातून सावरायचं कसं?

दोघांपैकी एकजण जग आधी सोडून गेला, तर दुसऱ्यानं जगायचं कसं? दु:खातून सावरायचं कसं?

Highlightsसमाजाने सुद्धा जोडीदार नसणाऱ्या लोकांकडे समजुतीच्या नजरेने बघायला हवे

अश्विनी बर्वे (मुक्त पत्रकार)

जीवनसाथीचा वियोग या विषयावर लििहणं आणि त्याविषयी विवेकाने काही विचार करून स्वतःच स्वतःला मदत करणं. यावर समाजात किती उलटसुलट बोलले जाईल याची आपण चांगलीच कल्पना करू शकतो. कारण मृत्यू हा कितीही अटळ असला तरी त्यावर बोलणं अशुभ समजले जातं. आणि त्यात स्वतःच्या पतीच्या/ पत्नीच्या मृत्यूनंतरचा विचार म्हणजे तोबातोबा. खरंतर अनेक स्त्रिया पती गेल्यानंतर जे दुःख सहन करतात त्यापेक्षाही समाज त्यांना ज्या पद्धतीने वागवतो ते अधिक दुःखदायक आहे.

पती नसलेल्या स्त्रीला कोणत्याही सण समारंभात पुढाकार घेऊ दिला जात नाही, बोलावलं जात नाही.अजूनही अशा अनेक गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख अलका काकडे यांनी आपल्या “जीवनसाथीचा वियोग आणि विवेकनिष्ठ विचारसरणी” या पुस्तकात केला आहे. ते वाचल्यावर वाटते की अजूनही आपल्याला खूप मजल गाठायची आहे,प्रबोधनाची अजूनही गरज आहे. या स्त्रियांची काही स्वप्नं असतील,त्यांनाही चांगलं रहावं हौसमौज करावी असं वाटत असेल.पण त्यांनी स्वतःला सावरत काही करायचं ठरवलं तर समाज त्यांना टोचत राहतो,काहींना ती एकटी आणि उपलब्ध आहे असं वाटत राहतं. पण भयानक असतो तो एकटेपणा. दिवस कितीही माणसांत घालवला तरी आपल्याला जे सांगायचं आहे ते कोणाला सांगायचं. रात्री आपण आपल्या घरात/खोलीत एकटं असणार आहोत याची भीती वाटू लागते. या सर्व मुद्दांवर लेखिकेने लिहिलं आहे. त्यामुळे हे पुस्तक आपल्याला समाजाचा आरसा दाखवतो. अलका काकडे या स्वतः मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आहेत. त्यामुळे त्यांनी फक्त समस्या सांगितल्या नाहीत तर त्यावर उपाय काय करायचा याचेही विवेचन पुस्तकात केले आहे.

(Image :google)

जगात आपण एकटे येतो,जातांना एकटे जातो हे जरी खरे असले तरी त्या येण्या-जाण्याच्या मधला संपूर्ण प्रवास आपण अनेक माणसांच्या संगतीने करत असतो.त्या प्रवासात आपल्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार भेटतो. त्याचं स्थान आपल्या आयुष्यात जन्मभर असतं,काळाबरोबर नात्याची वीण घट्ट होते. पण एक ना एक दिवस एकजण मागे राहतो आणि मागे राहिलेल्याला समाजाच्या परीक्षांना तोंड द्यावे लागते. या परीक्षा स्त्री आणि पुरुषांसाठी वेगळ्या असतात, त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात अजूनही फारसा बदल झालेला नाही. म्हणूनच जोडीदारानंतर आपण मागं राहिलो तर काय काय घडू शकतं,त्या परिणामांना कसं तोंड द्यायचं या गोष्टींचा विचार करायला हवा.

 जोडीदार गेल्यावर तीव्र दुःखाची भावना निर्माण होऊन हरवल्यासारखं वाटायला लागतं,अपराधीपणाची भावना निर्माण होते,हतबलता,अगतिकता येते,भीती वाटते. लोकांना तोंड देता देता थकवा येवू लागतो. अशावेळी मनात नकाराची भावना घर करू लागते. त्यावेळी नक्की काय करा,कसा विचार करा, “ हे झालं तर?” या संज्ञेचा वापर कसा करायचा? मुख्य म्हणजे मन दुबळे पडणार नाही यासाठी काय करायचं.हे विविध मार्गाने अलका काकडे यांनी सांगितले आहे. त्या स्वतः या वियोगाच्या दुःखातून गेल्या आहेत. त्यांनी स्वतःला कसं सावरलं असेल हे त्यांनी सांगितलेल्या अनुभवातून लक्षात येतं.

(Image :g00gle)

स्वतःला वेगवेगळ्या परिस्थतीशी जुळवून घेण्यासाठी तयार करणं आजच्या काळात किती आवश्यक आहे. त्यासाठी बदलाला सामोरं जाण्याची सवय ठेवायला हवी. खोलवर विचार करून कृतीकडे जाण्याची सवय आपण विकसित करून घेतली तर आपण आपत्तीजनक परिस्थितीतून वाट काढू शकू. वियोगाचा विचारसुद्धा विवेकाने करायला हवा. समाजाने सुद्धा जोडीदार नसणाऱ्या लोकांकडे समजुतीच्या नजरेने बघायला हवे.
 

Web Title: if you loss your life partner? how to deal with loneliness and grief after death of your spouse? how to live life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.