सेक्स एज्युकेशन हा आपल्याकडे आजही बऱ्याच प्रमाणात दुर्लक्षित राहिलेला विषय. ज्या वयात मुलांना लैंगिकतेविषयी उत्सुकता असते किंवा प्रश्न पडण्यास सुरुवात होते तेव्हा या विषयाकडे काहीतरी वेगळे म्हणून पाहिले जात असल्याने त्याबद्दल मनात आढी निर्माण होते. तसेच कुटुंबात, समाजात, शाळेत सगळीकडे लैंगिक गोष्टींबाबत दबक्या आवाजात बोलले जात असल्याने हा विषय म्हणजे काहीतरी वेगळं हे मुलांच्या अडनिड्या वयाला समजतं. पण हे वेगळं म्हणजे नेमकं काय, त्याबाबत खुलेपणाने का बोलायचं नसतं असे मोठ्यांना न पडणारे प्रश्न त्यांच्या वयात पडतात आणि मग खरा गोंधळ इथेच सुरू होतो. प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिने नुकतेच शालेय वयातील लैंगिक शिक्षण याविषयी आपले मत व्यक्त केले.
रकुल प्रीत म्हणते, "आपल्याकडे शाळेत सगळे विषय मुलं आणि मुली यांना एकत्र शिकवले जातात. हृदयाचे कार्य कसे चालते हे सांगताना एकत्र सांगितले जाते पण पण लैंगिक शिक्षणाबाबत बोलायचे झाल्यास मुलांना आणि मुलींना वेगळे केले जाते. पण प्रजनन किंवा पुनरुत्पादन ही गोष्ट मुलं आणि मुली अशा दोघांशी संबंधित असून ती एकत्र शिकवण्यात किंवा सांगण्यात कोणती अडचण असते. उलट मुलांना या विषयापुरते असे वेगळे केल्याने त्यांच्या मनात या विषयाबाबत जास्त उत्सुकता निर्माण होते. लैंगिक शिक्षण किंवा पुनरुत्पादन ही आपल्या शरीराची बायोलॉजी असते हे नाकारुन चालणार नाही.” मग जीवशास्त्र या विषयाबाबत असा भेदभाव आपल्याकडे का केला जातो असा प्रश्नही रकुल प्रीत काहीशा संतापाने विचारते.
लैंगिक शिक्षण हे एकप्रकारचे शास्त्र असून आपण नाकाला नाक म्हणत असू तर गर्भाशयाला गर्भाशयच म्हणणार. मी शाळेत असताना आम्हाला जेव्हा लैंगिक शिक्षणाचा तास झाला तेव्हा आम्हीही लाजत होतो, हसत होतो. कारण आपल्याकडे या विषयाबाबत तशाप्रकारचे वातावरण तयार केले जाते. पण असे करणे योग्य नसून ही गोष्ट अतिशय सामान्य आहे असे वातावरण आपल्याला येत्या काळात आजुबाजूला तयार करायला हवे अशी कळकळ रकुलप्रितच्या बोलण्यातून जाणवते. या गोष्टीसाठी प्रत्येकाला आपल्या कुटुंबापासून, शेजारपाजार, आपण वावरत असलेला समाज या ठिकाणांपासून सुरुवात करावी लागेल. पण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असून त्यावर मोकळेपणाने बोलले जायला हवे.