नवीन वर्षात आपण काही ना काही नवीन संकल्प करतोच. प्रत्येक व्यक्तिगणिक हे संकल्प बदलत असतात. भिंतीवरच्या कॅलेंडरवर वर्ष जरी बदललं तरी आपल्या आयुष्यातील नाती तीच असतात. जसजसे वर्ष जातात तसे समोरच्या व्यक्तीसोबतचे आपले नाते जुने होत जाते. जितके नाते जुने तितकीच नात्यांची वीण मजबूत करणं हे खरं तर त्या दोन व्यक्तींवर अवलंबून असतं. यात नातं ही कल्पना फक्त नवरा बायको, प्रेयसी प्रियकर यांच्यापूर्ती मर्यादित न राहता ती सर्व नात्यांसाठी तेवढीच गरजेची आहे. तुमच्या आजुबाजुला असलेल्या अनेक नात्यांचे बंध तुम्हालाही मजबुत करायचेत ? हरवत चाललेली नात्यांची गंमत पुन्हा एकदा अनुभवायचीय ? सरत्या वर्षासोबत भूतकाळ मागे सारून येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या नात्यांतील एव्हरग्रीनपणा टिकवण्याची इच्छा आहे. मग नात्यातील वीण मजबूत करण्यासाठी खालील काही गोष्टी समजून घेऊयात(Relationship tips for New Year).
नवीन वर्षात नक्की काय करता येऊ शकत ?
१. जुनी भांडणे वादविवाद संपवा - 'शेवट गोड तर सारं काही गोड' असं म्हटलं जात ते खरं आहे. एखाद्या व्यक्तीसोबत जर तुमचे भांडण किंवा वाद झाला असेल तर सरत्या वर्षा सोबत ते विसरून जा. येणाऱ्या नवीन वर्षाकडे साकारात्मकतेने पाहा. तुम्ही दोघे एकत्र बसून जुन्या गोष्टी संपवू शकता. गेल्या वर्षात कितीही मोठे मतभेद झाले असतील तर ते विसरून पुढे जा.
२. चिंता, समस्यांबद्दल बोला - जर तुमच्या दोघांमध्ये दीर्घकाळ कोणतीही समस्या सुरू असेल तर तुम्ही दोघे बसून त्यावर उपाय शोधा. यामुळे नवीन वर्षात तुम्हाला पुन्हा अशा गोष्टींची चिंता करावी लागणार नाही. जर कोणती गंभीर समस्या असेल तर त्या समस्येवर न भांडता, एकमेकांच्या मतांचा विचार करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा.
३. एकमेकांना स्पेशल वाटू द्या - कोणत्याही समस्या, वादविवाद सोडवताना एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आदर करा. केवळ स्वतःच्या मतांचा हेका मिरवून स्वतःचेच खरे करण्याचा प्रयत्न करू नका. दोघांच्याही विचारांचा सुवर्णमध्य काढा. कोणत्याही विषयांवर बोलताना कुठलाच आडपडदा न ठेवता एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला.
४. नवीन वर्षाचे प्लॅनिंग करा - मागच्या वर्षातील जुने सगळे विसरून येणाऱ्या नवीन वर्षाचे दोघांनी मिळून प्लॅनिंग करा. नवीन वर्षात आपल्याला काय काय नवीन करता येऊ शकत. नाते फुलविण्यासाठी काही नवीन प्लॅनस करा, बाहेर जा आणि आनंदाचे क्षण जगा. यामुळे तुम्हा दोघांचे नाते आणखी घट्ट होईल.