Join us  

प्रेमात ‘ऑनलाइन’ व्हिलन? तुमचं ‘सीसीटीव्ही’ नातं तर नाही, जे जगण्याचा हिशेब मागतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 4:46 PM

प्रेमात पडल्यावर एकमेकांची सोबत असणं चांगलं पण आपल्यावर सतत कुणी वॉच ठेवतंय असं वाटू लागलं तर?

ठळक मुद्देआपल्या नात्यात असंच काही होतं आहे का याचा विचार करायला हवा.

सतत कनेक्टेड असण्याचे काही फायदे तोटे असतात. प्रेमात असताना, नवीन लग्न ठरलं, झालं आहे.. याकाळात तर सतत सोबत हवीशी वाटते. आता तर स्मार्ट फोनमुळे सतत कनेक्टेडच असतो. दर सेकंदाला बोलणं, फेसटाइम यामुळे सतत जवळच असतो. मात्र इतके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन असं तर होत नाही? अती कनेक्टेड राहिल्याने तर भांडणं होत नाहीत?आठवून पहा, फोन खूप वेळ वेटिंगवर असणे, खूप वेळ मॅसेज व्हॉट्सॲपवर न पाहणे, निळी टीक दिसत असूनही उत्तर न देणे, ऑनलाइन असतानाही मेसेजला रिप्लाय न देणे यावरुन तुमची भांडणं होतात का? प्रत्येक कम्युनिकेशनमध्ये मला कसं वागवलं, नीट भाव दिला की नाही, नीट वेळ दिला की नाही, यावर आपलीच मतं, नात्यातली गणितं, हेवेदावे, शंका- कुशंका हे सारं चक्र सुरु होतं. बोलायचं असतं वेगळं पण तोंड उघडलं की भांडणच होतं. त्यातून गैरसमज, राग-चीड, रडणं सगळं येतंच.

(Image : google)

पण मुख्य म्हणजे वाढतो स्ट्रेस.आपल्या मेसेजला चटकन रिप्लाय का आला नाही याची इतकी गणितं डोक्यात होतात की कामात असेल, नंतर करेल, वेळ नसेल हे साधंही लक्षात घेतलं जात नाही. यासाऱ्यापलिकडे असं काय आहे जे आपल्याला नातं टिकवण्यासाठी महत्त्वाचं आहे याचाही विचार केला जात नाही.  नेमकी काय आहे आपली प्रेमाची व्याख्या? पक्का विश्वास का वाटत नाही समोरच्यावर? नात्यात स्पेस आहे की सतत सीसीटीव्ही सारखं लक्ष आहे आपल्या जगण्यावर? सोबत हवी आहे की सक्ती? यासाऱ्याचा विचार केला नाही तर नाती तुटणार, गैरसमज होणार, आनंद हरवणार..आपल्या नात्यात असंच काही होतं आहे का याचा विचार करायला हवा.

टॅग्स :रिलेशनशिप