Join us

पत्नीविरोधात तुमचे कान भरतात का कुटुंबातील लोक? जाणून घ्या कशी हाताळाल 'ही' स्थिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 19:22 IST

Husband Wife Relation: जर तुमच्या घरातील लोक तुम्हाला तुमच्या पत्नीविरोधात भडकवत असतील किंवा काही चुकीचं सांगत असतील तर स्थिती सांभाळणं सोपं नसेल.

Husband Wife Relation: प्रत्येक नात्यात सामंजस्य कायम ठेवणं सोपं काम नसतं. खासकरून तेव्हा जेव्हा कुटुंबिय आणि आपल्या जोडीदारात तणाव निर्माण होतो. भारतीय परिवारांमध्ये अनेकदा पाहिलं जातं की, पती आणि पत्नीच्या नात्यात घरातील इतर लोकांच्या लुडबुडीचा प्रभाव पडतो. जर तुमच्या घरातील लोक तुम्हाला तुमच्या पत्नीविरोधात भडकवत असतील किंवा काही चुकीचं सांगत असतील तर स्थिती सांभाळणं सोपं नसेल. पण जर योग्य विचार आणि समजदारपणा दाखवला तर ही समस्या सहजपणे दूर करता येईल.

१) ऐका, पण निष्पक्षपातीपणे

घरातील लोकांच्या गोष्टी ऐका, पण मनात काही पूर्वग्रह न ठेवता. त्यांची चिंता आणि सल्ले समजून घेणं गरजेचं ठरतं. अनेक काही गोष्टी तुमच्या भल्यासाठीही असतात. मात्र, हे देखील सुनिश्चित करा की, त्यांचा दृष्टीकोन एकतरफी नसावा.

२) पत्नीसोबत संवाद

अशा स्थितीमध्ये तुमच्या पत्नीलाही याची जाणीव झाली पाहिजे की, तुम्ही तिच्यासोबत आहात. पत्नीसोबत शांतपणे आणि समजदारपणे संवाद साधा. तसेच तिच्या भावना समजून घ्या आणि हे ठरवा की, वाद न होऊ देता तुम्ही दोघे मिळून ही समस्या दूर करणार. 

३) प्रेमाने-शांतपणे समजवा

आपल्या कुटुंबातील लोकांसोबत बोलताना आधी शांतपणे हे स्पष्ट करा की, तुमचं आणि पत्नीचं नातं तुमच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. त्यांना विनंती करा की, त्यांनी या नात्यात हस्तक्षेप करू नये आणि विनाकारण तुमचे कान भरू नये.

४) समस्येच्या मुळाशी जा

अनेकदा घरातील लोकांचा विरोध एखाद्या जुन्या गैरसमजामुळे किंवा जनरेशन गॅपमुळे निर्माण होतो. अशात समस्येच्या मुळाशी जाऊन समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा. जर शक्य असेल आणि वाद वाढणार नसेल तर घरातील इतर सदस्य व पत्नीला एकत्र  बसवून संवाद साधा.

५) संतुलन कायम ठेवा

कधीही कुण्या एका बाजूचं समर्थन करू नका. पत्नी आणि परिवार दोन्हीची तुमच्यावर जबाबदारी आहे. दोन्ही पक्षांना ही जाणीव झाली पाहिजे की, तुम्हाला सगळ्यांच्या भल्याची, विचारांची, मनाची काळजी आहे. शेवटी सत्य आणि योग्य बाजूचीच साथ देणं गरजेचं आहे.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप