Join us  

प्रेमात पडणे चांगलेच, पण रोमँटिक होताना तुमचे हृदय काय म्हणते तेही ऐका, तज्ज्ञ सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 6:22 PM

प्रेमात पडा, पण तुम्हाला हृदयविकार असेल तर तज्ज्ञ काय म्हणतात तेही समजून घ्या...नाहीतर...

ठळक मुद्देज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी प्रेमात पडताना विचार करायला हवा, कारण मेंदूत तयार होणारे काही हार्मोन्स हृदयाची गती वाढण्यास कारणीभूत ठरतात. प्रेमात नसलेले लोक प्रेमात असलेल्या लोकांपेक्षा जास्त नकारात्मक असल्याने त्यांचे आयुष्य तुलनेने कमी असते

प्रेमात पडणे हे काही ठरवून होत नाही. एखादी व्यक्ती आतून कनेक्ट होणं, त्याच्यासोबत आयुष्य काढू शकतो असा विश्वास आणि कम्फर्ट निर्माण होणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सुरुवातीचे आकर्षण आणि त्याचे प्रत्यक्ष नात्यात रुपांतर होणे हा प्रवास म्हटला तर मोठा म्हटला तर अगदी सहज-सोपा असतो. आता हे सगळे ठिक आहे. आपण काय ठरवून कोणाच्या प्रेमात पडत नाही. ती आतून येणारी भावना आहे आणि तशा फिलिंग्स आपल्याला समोरच्याबद्दल वाटाव्या लागतात. नुकताच प्रेम साजरा करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे होऊन गेला. त्यानिमित्ताने जगभरात जोडप्यांनी हा दिवस अतिशय आनंदात साजराही केला. पण पुन्हा एकदा प्रेमाविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रेमाबाबत तज्ज्ञ म्हणतात, प्रेमात पडणे चांगलेच आहे...पण त्यावेळी तुमचे हृदय काय म्हणते तेही ऐकायला शिका.

(Image : Google)

त्याच्या म्हणण्यानुसार, प्रेमात पडणे तुमच्या तब्येतीसाठी चांगले असले तरी वय झालेल्या व्यक्तींमध्ये ज्यांना रक्तवाहिन्यांमध्ये गाठी आहेत किंवा हृदयविकाराची समस्या आहे अशांनी तब्येतीची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर एकट्याने व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणे योग्य नाही. नायजेरीयातील एका मोठ्या विद्यापीठातील समुपदेशनाचे प्राध्यापक असलेले रोतीमी याबाबत आपले मत व्यक्त करतात. प्रेम आणि मानसिकरित्या तुम्हा चांगले असणे यांचा एकमेकांशी संबंध आहे. त्यामुळे प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी केवळ व्हॅलेंटाईन्स डेचे निमित्त असावे असे नाही. 

जे लोक प्रेमात असतात किंवा एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात त्यांच्यात नैराश्याची भावना प्रेमात नसलेल्यांच्या तुलनेने कमी असते. प्रेमात नसलेले लोक प्रेमात असलेल्या लोकांपेक्षा जास्त नकारात्मक असल्याने त्यांचे आयुष्य तुलनेने कमी असते असेही रोतीमी सांगतात. प्रेमात असलेल्या लोकांमध्ये सकारात्मक भावना जास्त असल्याने ते दिर्घायुषी असण्याची शक्यता जास्त असते. आपण कोणावर प्रेम करतो किंवा आपल्यावर कोणी प्रेम करते तेव्हा आपल्या शरीरातील एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे चांगले हॉर्मोन्स वाढतात. या हॉर्मोन्समुळे मेंदूचे पोषण होते आणि आपली मानसिक स्थिती चांगली राहण्यास मदत होते.

(Image : Google)

पण जे लोक प्रेमात नसतात किंवा ज्यांच्यावर प्रेम केले जात नाही त्यांच्याबाबत याच्या एकदम उलटा परिणाम होतो आणि त्य़ाचा त्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. अशा लोकांमध्ये मानसिक विकार असण्याची शक्यता तुलनेने जास्त असल्याचेही आणखी एका तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे अशांनी प्रेमात पडताना विचार करायला हवा, कारण मेंदूत तयार होणारे अॅडर्नालिन, एपिनेफ्रीन आणि नोर्फिनेफ्रीन हे रक्ताच्या माध्यमातून वाहत असतात. या हार्मोन्समुळे हृदयाच्या ठोक्याची गती वाढते तसेच त्यावर दाब येण्याचीही शक्यता असते. हृदयाची गती वाढते तेव्हा त्याला जास्त ऑक्सिजनची आवश्यकता असते असेही त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपहृदयरोग