बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री बेबो आणि पतौडी घराण्याचा राजपुत्र अभिनेता सैफ अली खान हे कपल नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवरुन चर्चेत असते. या दोघांच्या लग्नापासून ते आता दोन मुलांचे पालक झाल्यानंतर त्यांची असलेली भूमिका याबाबत नेहमी काही ना काही बातम्या आपल्यापर्यंत येत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी कळत असतात. करीना आणि सैफ यांच्या एकमेकांवरील प्रेमाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दलही आपण काही ना काही वाचतो. त्या दोघांनी लग्न करायचे ठरवल्यानंतरही त्यांच्या वयातील अंतराबद्दल चर्चांना उधाण आले होते. या दोघांच्या वयात १० वर्षाचे अंतर असल्या कारणामुळे अनेकांनी करीनाला बराच काळ ट्रोल केलं. बऱ्याच जणांनी तिला वेगवेगळे सल्लेही दिले. आता इतक्या वर्षांनी ती या सगळ्याकडे कशा पद्धतीने पाहाते असा प्रश्न करीनाला ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला. यावेळी तिने याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो याबाबत अतिशय समर्पक उत्तरे दिली (Kareena Kapoor Says about age difference with husband saif ali khan).
करीना म्हणाली, वय ही गोष्ट कधीच इतकी महत्त्वाची नसते, त्याचा एवढा विचार आपण का करायचा. उलट मला आनंद आहे मी त्याच्यापेक्षा १० वर्षं लहान आहे, खरं टेंशन त्याला यायला हवं. आमचे विचार खूप मिळते जुळते आहेत आणि एखाद्या नात्यात हीच गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची असते.” असेही करीना म्हणाली. कोणत्याही नात्यात विश्वास, प्रेम, आदर असेल तर ते नाते दिर्घकाळ चांगल्या रितीने टिकण्यास मदत होते. पण या गोष्टी नसतील तर मात्र ते नाते तकलादू होत जाते. त्यामुळे वयापेक्षा या गोष्टींना आमच्या दोघांच्याही मते जास्त महत्त्व आहे.
हे सांगताना करीना हसत हसत म्हणाली, सैफकडे पाहून तो ५३ वर्षाचा आहे असं कोणीच म्हणणार नाही. कारण वयाच्या १८ व्या वर्षी तो जितका हॉट दिसायचा तितकाच हॉट तो आजही दिसतो. मला तो आताही चाळीशीत आहे असं वाटतं आणि दिवसेंदिवस तो जास्तच हॉट होत आहे असेही ती प्रेमाने म्हणाली. त्यामुळे लग्न करताना वयाच्या बंधनाला किती महत्त्व द्यायचे याबाबत करीनाने अतिशय महत्त्वाचे भाष्य केले. करीनाबरोबरच बॉलिवूडमध्ये वयात जास्त अंतर असणारी बरीच कपल्स आहेत. यात अगदी हेमा मालिनी आणि धम्रेंद्र यांच्यापासून ते रणबीर कपूर-आलिया भट, शाहिद कपूर-मीरा राजपूत, मिलिंद सोमण आणि अंकिता कोवर, प्रियांका चोप्रा- निक जोनास यांच्याशिवाय आणखीही बऱ्याच जणांचा समावेश आहे.