मानसी चांदोरकर
नातं कोणतंही असो नवरा बायकोचा असो, मुलांचं आणि पालकांचं असो, ऑफिस मधल्या सहकाऱ्यांबरोबरच असो, किंवा आणखी कुठलं. कोणतंही नातं मजबूत होण्यासाठी "विश्वास" हा या नात्याचा पाया असतो. जिथे "विश्वास" असतो तिथे प्रेम आपुलकी हे आपोआपच असते. आणि जिथे प्रेम आपुलकी असते तिथे "विश्वास" हा असतोच असतो. कोणतही नातं खुलण्यासाठी, बहरण्यासाठी, आणि त्या नात्याला योग्य तो न्याय मिळण्यासाठी त्या नात्यात दृढ विश्वासाला आढळ स्थान असतं. विश्वास जिथे असतो तिथे नात्यात वादविवाद असले तरी नात्याचा दोर घट्ट असतो. यात गैरसमजांना, अविश्वासाला जागा नसते (How Trust is Important in Any Relationship).
आपलं दैनंदिन आयुष्य मग ते वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक दृढ असण्यासाठी, आनंदी असण्यासाठी समोरच्याचा विश्वास मिळवणं आणि समोरच्याच्या विश्वासाला पात्र ठरणे हे दोन्हीही समान पातळीवर महत्त्वाचं असतं. नात्यातला विश्वास निर्माण करण्यासाठी आणि तो टिकवण्यासाठी आपला संवाद, आपली देहबोली, आपली कृती या सगळ्याला अत्यंत महत्त्व असतं. तसेच नात्यांमध्ये पारदर्शकता असणेही महत्त्वाचे असते. नात्यात पारदर्शकता असेल, मोकळा संवाद असेल, मन मोकळे करण्याला स्थान असेल, आपले ऐकून घेतले जाईल, आपली समस्या सोडवायला मदत केली जाईल, आपल्याला आहोत तसेच स्वीकारले जाईल. हा विश्वास वाटतो तेव्हाच ते नाते घट्ट होते.
जोडीदाराबरोबरचे नाते घट्ट दृढ करण्यासाठी हा विश्वासच अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्याला जे करावेसे वाटते, आपण जे करतो, ते प्रत्येक वेळीच बरोबर असते असे नाही. काही वेळा त्यात चुकाही होऊ शकतात. पण त्या चुका मान्य करणे आणि योग्य वेळी सुधारणे यामुळे नात्यातील विश्वास अधिक दृढ होतो. आत्ताच्या काळात पती-पत्नीच्या नातेसंबंधात "अविश्वास" हेच नातेसंबंध तुटण्याचे मोठे कारण असल्याचे जाणवते. त्यासाठी आजूबाजूच्या परिस्थितीतील अनेक घटक, अनेक व्यक्ती कारणीभूत असतात. असे असले तरी तुम्हा दोघांमधील मोकळा संवाद, या संवादात एकमेकांच्या खटकणाऱ्या गोष्टी, एकमेकांच्या आवडणाऱ्या गोष्टी, एकमेकांकडून अपेक्षित असणाऱ्या गोष्टी या साऱ्याचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो.
जर असा मोकळा संवाद साधण्याची तसेच निकोप संवाद घडवण्याची दोघांचीही तयारी असेल तर नातेसंबंधात अविश्वासाला स्थान उरत नाही. आणि मग अशा दृढ नाते संबंधात बाहेरील कोणतीही गोष्ट अविश्वासाला कारणीभूत ठरू शकत नाही. कोणतीही परिस्थिती, कोणतीही व्यक्ती, कोणताही घटक तुमच्यातील विश्वास कमी करू शकत नाही.
(लेखिका समुपदेशक आहेत)
संपर्क - 8888304759
इमेल आयडी - Cmanasib01@gmail.com